गवताळ प्रदेशाची भटकंती
गवताळ प्रदेशाची भटकंती:
बोपदेव घाटातून भल्या सकाळी सासवडच्या दिशेनी चाललो होतो. हवा बऱ्यापैकी गार होती. नाही म्हणायला थोडं धुकं पण दिसत होतं. पक्षीनिरीक्षण हाच खरा हेतू असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. घाटाच्या मध्यभागी आल्यावर समोर अस्ताव्यस्त पसरलेलं पुणे शहर दिसायला लागलं. शहराचा आवाका पाहिल्यावर काही दिवसांनी घाटातल्या रस्त्यावर सुद्धा बांधकाम सुरु होईल कि काय, असा विचार मनाला चाटून गेला. या घाटात अनेक शिकारी पक्षी पहाटेच्या वेळेस निवांत दगडावर बसलेले दिसतात. बोपदेवाचं मंदिर मागे सोडून आम्ही घाट उतरायला लागलो. घाट उतरल्याबरोबर दोन्ही बाजूनी हिरवीगार शेतं दिसायला लागली. एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो. तिथे एका झाडावर चिमण्यांनी जणू काही शाळाच उघडली होती. त्या हॉटेलात कर्णकर्कश्य आवाजात गाणी लावली होती. ती आम्ही त्यांना बंद करायला सांगितली आणि चिमण्यांचा कलकलाट ऐकू लागलो. त्या गाण्यांपेक्षा हा आवाज खूपच सुसह्य होता. चहा पिऊन झाल्यावर आम्ही सासवडच्या दिशेनी जायला लागलो. का कोण जाणे पण मला तिथल्या गवती कुरणांमध्ये भटकायला खूपच आवडतं. यावेळेस तर पाऊसही दमदार झाला होता त्यामुळे गवताला एकप्रकारचा ओलसरपणा होता. त्याला निराळाच सुगंध असतो. आपल्याकडे बऱ्याच लोकांना असे गवताळ प्रदेश म्हणजे नुसती पडीक जमीन वाटते. नापीक जमीन वाटते. अशी मोकळी जागा वाटते जिथे खूप विकास होऊ शकेल. विकास म्हणजे सिमेंट वापरून केलेला. पण अशा प्रदेशांच्या परिसंस्थेचा (Ecosystem) कुणीच विचार करत नाही. किंबहुना माहित करून घेत नाहीत. या परीसंस्थेमध्ये जगणारे वेगळ्या प्रकारचे जीव जंतू आहेत. त्यांच्यावर आपला उदरनिर्वाह करणारे अनेक सस्तन प्राणी आणि पक्षी आहेत जे फक्त इथेच दिसू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कुरणांमध्ये जितका बायोमास टिकून राहू शकतो तितका कशातच टिकून राहू शकत नाही. कदाचित फारसं कुणाला माहित नसेल पण या कुरणांच्या बळावर धुळे जिल्ह्यातलं एके काळचं दुष्काळग्रस्त गाव मुक्त झालं आहे. आता तिथे पाणी टंचाई हा प्रश्नच उद्भवत नाही कधी. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हि कुरणं उपयुक्त ठरतात.
सासवडच्या पुढे सिंगापूर नावाचं गाव लागलं. तिथे एका पडक्या विहिरीजवळ सुगरणीनी खूप घरटी केली होती. त्यांचा विणीचा हंगाम सुरु होता. अशा गवताळ भागात सुगरण, लावा, मुनिया, मनोली, वटवट्या, चंडोल, गप्पीदास, भारीट, चीरक हे पक्षी मुबलक प्रमाणात दिसतात. याठिकाणी मुख्यत्वे दिसणारा पक्षी म्हणजे माळढोक (Great Indian Bustard). अत्यंत देखणा असतो हा पक्षी. पूर्वी सुप्याजवळ असलेल्या मयुरेश्वरच्या अभयारण्यात हे पक्षी दिसायचे. हा पक्षी तसा बरेच कीटक खातो पण याचे मुख्य अन्न म्हणजे नाकतोडे. धनगर आपल्या शेळ्या-मेंढ्या अशा गवताळ भागात चरायला सोडायचे किंवा मेंढपाळ इथले गवत कापून घरी न्यायचे. याचे प्रमाण इतके वाढले कि गवताला वाढायला पुरेसा काळ मिळेना त्यामुळे डोंगरच्या डोंगर बोडके दिसायला लागले. पाऊस पडला तरी पाणी साठून राहणार तरी कुठे. सगलं पाणी पाहून जायला लागले. याआधीच जर अशा प्रकारे अनिर्बंध होणारी चराई आणि कटाई जर रोखली गेली असती तर आज माळढोकांचा अधिवास टिकून राहिला असता आणि त्यावर नामशेष होण्याची नामुष्की आली नसती. आता गवतात भरपूर आहेत नाकतोडे पण त्यांना खायला माळढोकच नाहीत. अशा कीटकांना संपवण्याची जबाबदारी चंडोल, गप्पीदास यासारख्या पक्ष्यांवर आली. पण हे त्यामानानी लहान पक्षी आहेत. आम्हाला या लहान पक्ष्यांबरोबर जर माळढोक आणि तणमोर यासारखे पक्षी दिसले असते तर किती मजा आली असती असा विचार करत आम्ही पुढे निघालो. अनेक प्रकारची गवतं, त्यावर जगणारे विविध कीटक, त्या किटकांवर जगणारे अनेक पक्षी, या छोट्या पक्ष्यांवर भूक भागवणारे मोठे शिकारी पक्षी, त्यात मध्ये सरपटणारे आणि सस्तन प्राणी आहेतच कि जसे घोरपड, साप, ससे, मुंगुस. हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. एक वेगळीच अन्नसाखळी दिसते इथे आपल्याला. या साखळीच्या उच्च स्थानी बसलेले आहेत मुख्य भक्षक म्हणजेच कोल्हा, लांडगा आणि तरस. हे खास अशा गवताळ भागातच गुहा करून राहतात. त्यांचे प्रमुख अन्न म्हणजे ससे, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या. यावर ते आपली गुजराण करतात आणि तरस सफाई कामगार . कुठलाही कुजलेला किंवा मरून पडलेला प्राणी तरस फस्त करून टाकतो. पक्ष्यांमध्ये हेच काम गिधाडं करतात. अशा या त्रयीला आम्ही खूप शोधायचा व्यर्थ प्रयत्न केला. त्यांचा रंग हा त्या गवतामध्ये/ जमिनीमध्ये इतका एकरूप होतो कि उघड्या डोळ्यांना ते दिसतीलच याची खात्री देता येत नाही. दुसरं म्हणजे यांना शोधायचं म्हणजे डोंगर खोऱ्यात शोधावं लागतं आणि आपली चाहुल लागताच ते धूम ठोकतात. त्यांचा पाठलाग अशक्य असतो. त्यामुळे त्यांच्या मागे लागण्याचा विचार आम्ही सोडून दिला आणि दुसऱ्या दिशेनी निघालो.
अशा या परिसंस्थेमधे सर्व घटक आपापली जबाबदारी समजून त्यांची कामे करत असतात आणि समतोल टिकून राहतो. परंतु शहरांमधे सर्रास माती असलेल्या जागा नष्ट करून तिथे सिमेंटीकरण चालताना दिसते. त्या सिमेंटचा उपयोग कोणालाही होतं नाही. ना पक्षांना ना फुलपाखरांना ना आपल्याला. मुद्दाम काही मातीच्या जागा राखून ठेवाव्यात. ज्या मातीत पक्ष्यांना अंगावरचे कीटक काढण्यासाठी mud bath घेता येईल. फुलपाखरांना त्यातून त्यांची पोषक द्रव्य घेता येतील. त्यात असणाऱ्या कीटकांमुळे बेडूक, सरडे आणि इतर सस्तन प्राणी उपजीविका करू शकतील आणि हो काही पक्षी अशा मातीत किंवा त्यावर आलेल्या गवतात सुद्धा घरटी करतात हे लक्षात असू द्या. या एवढ्या मुलभूत गोष्टी जर आपण ठरवल्या तर नक्कीच करू शकू. माणसाचा विकास हा होतच राहणार आहे हो पण तो विकास जर कोणाच्या मुळाशी घाव घालणार असेल तर असा ‘अंध’ विकास काय कामाचा, नाही का?
अमोल बापट
amolbapat@gmail.com

Reviewed by Amol
on
September 26, 2017
Rating: 5