बुडत्याला काठीचा आधार
बुडत्याला काठीचा आधार
गुहागरचा समुद्रकिनारा. जोरदार भरती आलेली होती. का कोण जाणे पण मला गुहागरचा समुद्र कायमच उसळलेला वाटतो. वातावरण मात्र आल्हाददायक होतं. सकाळचं कोवळं ऊन अंगावर पडत होतं. आम्ही चार जण काहीही काम नसल्यासारखे वाळूवर चालत होतो. निरनिराळ्या प्रकारचे लहान खेकडे आमची चाहूल लागल्यावर बिळाकडे लगबगीनी जात होते. हे लहान खेकडे इतक्या चपळाईनी आडवे जायचे आणि एकदम थांबायचे. वाळूच्या रंगात त्यांचा रंग इतका मिसळून गेला होता की डोळे फिरायला लागायचे शोधता शोधता. चालताना विविध प्रकारचे शंख-शिंपले आणि रंगीबेरंगी दगड इतस्ततः पडलेले दिसत होते. उगाचच शंख शिंपले उचल आणि उगीच लांबवर भिरकाव, landscape चे फोटोच काढ, कॅमेऱ्याला डोळा लावून काहीतरी नजरेला पडतंय का बघ असे उद्योग चालले होते. आमच्यातले दोघं जण एकदम समुद्राच्या दिशेनी धावले आणि खाली वाकून काहीतरी बघत होते. मी पण तडक तिथे गेलो. एक खेकडा पुर्णतः वाळूत एकरूप झाला होता. तो आम्हाला दिसला हेच नवल होतं. दोन माणसं आपल्या दिशेनी धावत येत आहेत म्हटल्यावर त्यानी त्याच्या नांग्या ताणून पुढे रोखल्या होत्या. पूर्ण attacking position मध्ये. नांग्यांच्या वर अजून दोन नांग्या वाटाव्यात असं काहीतरी होतं. कळलं नाही काय होतं ते. आम्ही यथेच्छ त्याचे फोटो काढले आणि व्हीडिओ काढायला घेणार तेवढ्यात त्यानी स्वतःला दोन सेकंदात वाळूत गाडून घेतले. तो नजारा जर कॅमेऱ्यात आला असता तर असा विचार करत असताना अजून एक मोठी लाट आली आणि होती नव्हती ती आशा पण धुळीस मिळाली. परत उलट्या दिशेने येत असताना अतिशय नाजूक अशी एक हालचाल पाहायला मिळाली. आत्ता जी एक मोठी लाट आली होती त्या लाटेमध्ये एक चतुर नखशिखांन्त भिजला होता. मी जवळच असलेली एक काठी घेतली आणि त्या चतुराजवळच्या वाळूत खोचली आणि त्या वाळूसकट त्याला वर उचलले. याला जर उचलला नसता तर तो नक्कीच वाळूत गाडला गेला असता. त्याचे पंख चिकटले होते. आम्ही फुंकर घालून ते मोकळे करण्याचा प्रयत्न केला. त्या जिवाच्या दृष्टीनी समुद्रावरचा वारा पुष्कळ होता. काही मिनिटातच त्याचे पंख मोकळे झाले. तो डोक्यावरून पुढचे पाय सतत फिरवत होता. नक्की काय करत होता देवच जाणे. पुढच्या काही मिनिटातच त्याला त्याची शक्ती परत आल्याची जाणीव झाली असावी आणि पुढच्या क्षणाला तो भुर्रर्र दिशी उडून गेला. काही वेळापूर्वी आम्ही त्या खेकड्याला फोटोसाठी घेरलं होतं, त्रास दिला होता. शेवटी कंटाळून तो वाळूत शिरला तर आत्ता एका जीवाला आम्ही वाळूत गाडून मरण्याआधी वाचवलं होतं, जीवदान दिलं होतं. इथे प्रश्न पाप पुंण्याचा नाही पण आज इथे आम्हाला नशिबानी संधी दिली होती त्याला आधार देण्याची. खरंतर आधार त्याला काठीनीच दिला होता... आम्ही फक्त नाममात्र ठरलो.

Reviewed by Amol
on
August 20, 2017
Rating: 5