उदमांजर
आज सकाळी आभाळ जरा भरून आल्यासारखं वाटत होतं. पावसाळी वातावरण झाले होते. एकप्रकारची मरगळी आली होती. हातात चहाचा कप होता. कितीही गरम होत असलं ना तरी चहा पाहिजेच. हातात कप होता आणि नजर आसपासच्या झाडांवर होती. कुठे काही दिसतंय का याचा शोध घेत होती. पण म्हणावी तशी काही हालचाल दिसली नाही कुठे. नाही म्हणायला एक दोन सुतार पक्षी, दयाळ, भारद्वाज -तो असतोच कायम, काही शिंजिर पक्षी येत जात होते. झोपळ्या खालून मांजरी उगाच भटकत होत्या. एकंदरीत सुस्तता होती. तेवढयात मांडवावर धावल्यासारखा आवाज झाला आणि पाठोपाठ कावळ्यांचा गलका ऐकू आला. मनात म्हटलं, आता कुणाच्या मागे लागले हे कावळे? म्हणून पुढे झालो तर एक विचित्र चेहेरा खाली डोकावला. मला अंदाज आला काय आहे ते, याच प्राण्याने मला काल पुसटसे दर्शन दिले होते. मी लगेच आत धावलो. कॅमेरा घेऊन बाहेर आलो आणि त्वरित अंगणाच्या दिशेनी धावलो.
बघतो तर काय, माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. एक उदमांजर/ काळमांजर/ कांडेचोर (Palm Civet) पोफळीवर चढता चढता कावळ्यांना तोंड देत होतं. पोफळीवर उडी मारताना दोन कावळ्यांनी त्याच्या चेहेऱ्यावर हल्ला केला होता. त्याचा पोफळीवरुन तोल गेला आणि परत कौलांवर येऊन पडलं. त्याचं कौलांवर पडणं मला काहीसं खटकलं. नक्की काय झालं मला कळेना पण आता त्याच्या चालण्यात थोडा फरक पडला होता. उदमांजर चालत चालत परत टोकाशी आलं आणि पूर्ण एक मिनिटं स्तब्ध उभं राहिलं. तेवढा वेळ मला फोटो काढायला पुरेसा होता. तेव्हा मला कळलं की त्या कावळ्यांनी त्याचे डोळे फोडले होते. एका लुकलुकट्या डोळ्यानी ते माझ्याकडे केविलवाण्या नजरेनी पाहात होतं. मी तिथेच असल्याने कावळे नुसतेच झाडावर बसून ओरडत होते. ते उदमांजर कौलांच्या सावलीत निपचीत पडून राहिले होते. आता काय होते याकडे माझे लक्ष लागून राहिले होते. तसा परत मांडवावर पावलांचा आवाज झाला, तर आमच्याच घरी काम करणारी एक बाई आमसुलं पाहायला आली होती. तिची चाहूल लागताच ते आतल्या सावलीमधून दबकत पुढे गेलं आणि पाईपवरून खाली उतरत नारळी-पोफळीच्या बागेत गायब झालं. त्याचा एक डोळा पूर्णतः निकामी झाला होता. आज परत एकदा अस्तित्वासाठी घडलेल्या झुंजीचा मी साक्षीदार ठरलो आणि Survival of the fittest या वाक्याची खात्री पटली.