गायबगळे
सकाळी खाडीवरती सकाळी साडे सहाच्या सुमारास वेगवेगळ्या बगळ्यांनी खूप सुखद अनुभव दिला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस आज बगळ्यांनी अतिक्रमण केलेले दिसत होते. परवा इथेच बसलेल्या टिटव्या आज कुठेच दिसत नव्हत्या, ना त्यांची पिल्लं दिसत होती. त्याच दिवशी बहुतेक शेकाट्या पक्ष्यांची त्यांचा डाव साधला असावा. आज चित्र पूर्ण पालटलं होतं. टिटवी, तुतारी, ढोकरी यांच्या ठरलेल्या ठिकाणी आज बघू तिथे फक्त बगळे होते. छोटे बगळे, मध्यम बगळे, मोठे बगळे, गाय बगळे, राखी बगळे असे सगळे नेमून दिलेल्या जागी पाण्यात खाद्य शोधण्यात गर्क होते. त्यामुळे जवळपास हमखास दिसणारी पाणकोंबडी आणि तुतारी दूरवर काहीतरी टिपत होती. या पाणथळीच्या जवळच एका ढिगाऱ्याजवळ काहीतरी पडले होते. त्यावर भटकी कुत्री ताव मारत होती आणि त्यांच्या आसपास काही गायबगळे घुसण्याचा प्रयत्न करीत होते. पण ती कुत्री काही त्यांना दाद लागून देत नव्हती. माझी चाहूल लागल्यावर ती जरा दूर झाली. लगेच बगळ्यांनी त्याचा ताबा घेतला. डोळ्याला दुर्बीण लावल्यावर लक्षात आलं की, लांबवर एक म्हैस मरून पडली होती. माझ्या मते त्यातला एखादा ऐवज कुत्र्यांनी पकडून आणला असावा आणि त्यासाठी हि सर्वांची लगबग चालली होती. ढिगाऱ्याच्या पलीकडे ते खात असल्याने मला नक्की काय खात होते हे दिसत नव्हतं. सर्वजण गुण्या गोविंदानी पण अधाशासारखे खात होते. त्यांच्या या अकाग्रतेमुळे मला काही अप्रतिम फोटो मिळाले. थोडं ऊन वर आल्यावर तीरचिमणी, खाटीक, वेडा राघू हे सुद्धा त्याच ठिकाणी उड्या मारत होते. गाय बगळे मात्र आपली मक्तेदारी असल्याप्रमाणे वागत होते. कदाचित असे तर नसेल की ज्या गाई-म्हशींना हे गायबगळे सतत सोबत करतात त्यांना मेल्यावरही ते सोबत करत असतील?