गिधाडे भाग १
टळटळीत दुपारची दीड ची वेळ. तळपता सूर्य. ना कोणी जाताना दिसत होतं, ना येताना, ना कोणी गप्पा मारत थांबलेलं. एकदम सुनसान रस्ता. नाही म्हणायला एक -दोन खाजगी गाड्या दिसत होत्या. खाडीमधले पाणी स्थिर होते. इतके स्थिर कि झाडा-झुडपांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसावे. पुलाचे लोखंडी खांब तापून गरम झालेले. बहुतेक सगळे लोक सकाळी लवकर किंवा थोडी उन्हं उतरल्यावर निघणं पसंत करतात. मीच आपला दुपारी वेड्यासारखा पुण्याच्या दिशेनी गाडी हाकत जात होतो. नजर पाण्याकडे होतीच काही दिसतंय का याकडे. बहुदा पक्ष्यांना पण त्याचा त्रास होत असावा कारण सगळे त्यातल्या त्यात मिळणाऱ्या झुडपांच्या सावलीत स्तब्ध उभे होते. खाडीवरचा पूल ओलांडून पुढे गेलो. रस्त्याच्या दोहो बाजूस असलेला गवताळ भाग भकास वाटत होता. दूर दूर पर्यंत कुणीही नव्हते. हमरस्त्याच्या जवळच काही काळ्या खडकांची रास पडलेली दिसली. अरे, सकाळी तर ही रास इथे नव्हती. अचानक कशी काय आली. थोडं अजून जवळ गेल्यावर त्यावर थोडी हालचाल दिसली. मला काही कळेना. मी चक्रावून पाहायला लागलो. नीट बघतो तर काय.. ती खडकांची रास नसून चक्क आठ गिधाडे आकाशाकडे डोळे लावून बसली होती. त्यांच्या पासून काही अंतरावर एक गाय आणि एक म्हैस मरून पडली होती. म्हैस सकाळी मी पहिली होती. त्यावरच गायबगळे सतत बसून होते. गाय मात्र नव्यानेच कुणीतरी आणून टाकली होती. नंतर तिच्याच जवळ एक वासरू पण आणून टाकल्याचे लक्षात आले. याची वर्दी लागताक्षणीच पर्यावरणाचे हे सफाई कामगार हजर झाले होते. माझ्या समोर जमिनीवर आठ गिधाडे होती आणि आकाशात काही उडत होती. त्यातली काही खाली यायच्या मार्गावर होती. पण त्यांना बहुदा माझी चाहूल लागली होती. त्यातली एक दोन उडण्याच्या तयारीत दिसली. एव्हाना मी गाडीचं दार हळूच उघडून शक्य तितक्या जमिनीच्या रेषेत आलो होतो आणि त्याचे फोटो काढत होतो. आपण माणसं जसं एखादं काम करण्याआधी सल्ला मसलत करतो ना तशीच हि गिधाडं त्या शवांच्या ठराविक अंतरावर उभी राहून एकमेकांशी मसलत केल्यासारखी भासत होती. त्यात काही पिल्लं पण होती. बहुदा त्यांना प्रशिक्षणाला आणले असावे. पण ते देणार कोण? कारण शवां जवळ कोणीच जात नव्हतं. सगळे आपले येरझाऱ्या घालत होते. काही मान खाली घालून होते तर काही पंखात चोच घालून सफाई करत होते, काही चालत होते तर काही आभाळाकडे पाहत होते. समोर पंचपक्वान्नाचं ताट आणि हात बांधलेले अशी गत झाली होती त्यांची. कारण ती कातडी फाडण्याचे कसब कुणाकडेच नव्हते. त्यामुळे ती सतत वर बघताना सारखे असे वाटत होते की ते त्याच्या सांकेतिक भाषेत कुणाला तरी निरोप देत आहेत. त्याकरता काही तास .. नव्हे कदाचित एक पूर्ण दिवस सुद्धा त्यांना राजाची वाट बघणं हे क्रमप्राप्तच होतं.