फुलपाखरू
दुपार नुकतीच ओसरून गेली होती. उन्हं अधून मधून ढगातून डोकावयाचा प्रयत्न करीत होती. खरंतर आज वरुण राजानी त्यांना वावच दिला नव्हता. दुपारची वेळ टळून गेली म्हणून संध्याकाळ झाली असंच म्हणावं लागेल. मी ताम्हाणी घाटात गाडी चालवत पुण्याकडे निघालो होतो. नजर आणि कान समोर नव्हतेच म्हणा ना! अहो कसे असणार? समोर निसर्गाने सौंदर्याचा पेटारा उघडून ठेवला होता. डांबरी रस्ता सतत पाऊस पडल्याने काळाकभिन्न दिसत होता. सभोवारची वनराई हिरव्याचार रंगानी नटली होती. रस्त्याच्या शेजारी अक्षरशः लॉन लावल्याप्रमाणे गवत उगवले होते. त्या गवतात मधूनच काही रंगीत पण अगदी लहान फुले डोकावत होती. प्रत्येक डोंगरामधून किमान दोन छोटे आणि एक मोठा असे धबधबे वाहात होते. ते जसे खळाळत होते ना त्याचे वर्णन करणे माझ्या लेखनशक्तीच्या बाहेरचे आहे. अशा या अदभुत ठिकाणी मलबार शीळ कस्तुर आपल्या सुमधुर आवाजांनी वातावरण मंत्रमूग्ध करत होता. मी बरोबर आणलेल्या चहाचे घोट घेत घेत मनात विचार करत होतो की आपण का नाही बरं या सगळ्याचा एक भाग? आपण नुसतेच नाममात्र. असे काहीसे विचार घोळत असताना माझे लक्ष समोरच्या डांबरी रस्त्याकडे गेले. एक कोतवाल आणि दोन वेडेराघू कशाच्या तरी वर सारख्या घिरट्या घालीत होते. नाही म्हणायला आसपास काही फुलपाखरे होती. मी चहाचा कप गाडीच्या टपावर ठेवून थोडा पुढे गेलो तर एक फुलपाखरू रस्त्याच्या मधोमध बसले होते. मी थोडं जवळ जाताच ते उडले पण आसपासच. नीट पाहिलं तेव्हा कळलं की खाली अजून एक फुलपाखरू आहे ज्याला चट्कन उडता येत नाहीये. मी तत्परतेने पुढे गेलो नाहीतर कोतवाल होताच तिथे फरशा पाडायला. मी अलगद हातानी त्या फुलपाखराचा चिकटलेला पंख मोकळा केला आणि त्या क्षणी ते त्याच्या सख्या बरोबर अगतिकपणे वर उडाले. मला माहित नाही मी योग्य केले की अयोग्य पण नकळत मी जंगलाचा नियम भंग केला होता. जंगलामध्ये जर एखादा वाघ हरणाची शिकार करण्याच्या प्रयत्नात असेल तर आपण मध्ये पडू का? निश्चित नाही पडणार किंबहुना ती हिम्मत आपल्यात नाही. मी अगदी तसाच प्रकार त्या कोतवाल आणि वेड्या राघुंबाबत केला. आज त्यांच्या भक्ष्याला मी जीवदान दिले. कदाचित मी तिथून गेल्यावर त्यांच्या पैकी एकानी त्याला गट्टम केलेही असेल पण त्याआधी त्यांच्या मेहनतीवर मी नक्कीच पाणी फिरवले होते. मला कोणाचीच अगतिकता ओळखता आली नव्हती. ना कोतवालची ना वेड्या राघूची. ते भक्ष्य शोधायला कधी बाहेर पडले असतील, पाऊस आधी किती वेळ पडला असेल, जर खूप वेळ पडला असेल तर त्यांची पिल्लं किती वेळ भुकेली असतील... काही नाही. मला फक्त ते फुलपाखरू संकटात दिसले आणि मी बाकी कुठलाही विचार न करता त्याला मुक्त केले. खरंच किती जण हा असा विचार करत असतील बरं? मात्र निसर्गाने अगदी नकळत मला एका क्षणात नायकही केले आणि खलनायक ही...