सातपुडा डायरी
मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांत सातपुड्याला जाण्याचा योग आला आणि intuition किंवा sixth sense असं काहीहि झालेलं नसताना अभूतपूर्व असा अनुभव प्रत्येक सफारीत आला. २९ तारखेला साधारण अकरा च्या सुमारास आम्ही मढई रेसोर्टला पोचलो. वेळ तसा बराच हातात होता. त्यादिवशी आमची बोट राईड आणि नाईट सफारी होती. १२ नंतर तापमान इतकं वाढत होतं कि बाहेर पाउल टाकणं शक्य नव्हतं. इथे येता येता सलीमनी (आमचा driver) पहिला बॉल टाकला “ साहब, sighting अच्छी चल रही है पर कल यहां जोरो कि बारीश हुई, तुफान आया था|” मी मनातल्या मनात पावसाला शिव्या घालत होतो. पाऊस काय माझी वाट बघत असतो कि काय. बघू तेव्हा आपला मी पोचायच्या आधी हजर. मी माझ्या कर्माला दोष देत होतो. सातपुड्यात मी आत्तापर्यंत कायम थंडीत गेलो होतो त्यामुळे हा उन्हाचा चटका मी प्रथमच अनुभवत होतो. पूर्वी ज्या zone मधून मी गेलो होतो ते zone वाघाच्या नवजात पिल्लांकरता बंद केले होते. एकंदरीत सगळंच नवीन होतं. दुपारचं जेवण झाल्यावर सर्वजण वामकुक्षी घेऊन बोट राईडला तयार झाले होते. सव्वा चारच्या सुमारास पण बऱ्यापैकी उन जाणवत होते. एका तासाच्या या राईडमध्ये आम्ही खूप पाण्यातले पक्षी बघितले. पाणचिरा (Indian Skimmer) नावाचा एक देखणा पक्षी आपल्या पिल्लांबरोबर होता. जसजशी बोट जवळ येत होती तसतसे ते दूर होत होते. तिथे काही नदीसुरय पक्ष्यांनी (Rivertern) घातलेली अंडी तसेच पिल्लं पण होती त्यामुळे त्यातले काही आमच्या डोक्यावर सतत आवाज करत आम्हाला तिथून घालवत होते. त्याच्याच आसपास चित्रबलाक (Pained Stork) पक्ष्यांचा मोठा समूह खाण्यात गर्क होता. त्याच घोळक्यामध्ये काही चमचेही (Eurasian Spoonbill) होते. पाणकावळे उगीच दाटीवाटीत बसले होते. आपलं लक्ष नाही असं भासवत होते आणि आमची प्रत्येक हालचाल टिपत होते. तिथे एका मगरीनी सुद्धा आम्हाला दर्शन दिले. जसा एक तास संपत आला तसं आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आता परत एका तासातच night safari ला निघायचं होतं. रेसोर्ट वर आलो. तिथे मस्तपैकी चहा आणि कांदा भजी हाणली आणि साडे सहाच्या सुमारास बाहेर gypsies मध्ये जाऊन बसलो.
हरीलाल हा आमचा नेहमीचा विश्वासू guide, तो म्हणाला : “सर आज हम सेहरा सें चलेंगे| आजकाल वहीपे अच्छी sighting हो रही है|” तु म्हणशील तिथे असं त्याला म्हणत आम्ही निघालो. Night safari चं कायमचं सगळ्यांना अप्रूप वाटत असतं. कधी कधी फार भारी काहीतरी दिसतं, कधी कधी फक्त हिंडणं होतं पण तरी छान वाटत. सगळ्यांना रात्री बिबट्या पाहायचा असतो. तो सहसा संध्याकाळी बाहेर पडतो. आता आमच्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे पाहायला आम्ही जंगलामध्ये शिरलो. साधारण एका तासात आम्हाला रानगवा, सांबर, चितळ आणि लंगुर दिसले. पण सगळे काहीतरी exciting पाहण्यासाठी उत्सुक होते. हरीलालनी driver ला गाडी हळू घ्यायला सांगितली आणि आम्ही दोघं एका ठिकाणी टोर्च मारू लागलो. पाहिलं तर एक ससा. काहीतरी शोधात चालला होता पण बघता बघता गडप झाला. हरीलाल खालच्या आवाजात म्हणाला “ सर जी खर्गोश तो गया लेकीन ये क्या है? ये कुछ अलग लग रहा है|” आधी मला तो जिथे टोर्च मारत होता तो मला एक दगड वाटला होता. मग मी टोर्च दुसऱ्याच्या हातात देऊन कॅमेरा हातात घेतला आणि म्हणालो “ जंगल कॅट तो नही है?” हरीलाल पण विचार करत होता. तेवढ्यात तिनी हालचाल करायला सुरुवात केली आणि हरीलाल माझ्याकडे बघत म्हणाला “सरजी, ये बढीया sighting है| ये Rusty Spotted Cat है|” तो हे बोलेपर्यंत माझ्या कॅमेऱ्यामध्ये फोटो आला होता. शंकेला बाबच उरली नव्हती. भल्या भल्या लोकांना शोधून सुद्धा सापडत नसलेली हि कॅट आम्हाला लीलया दिसली होती. मनसोक्त फोटो काढून घेतले आणि मग आम्ही विजयी मुद्रेने बाहेर पडलो. ज्यांना यातली फारशी माहिती नाही ना त्यांना यातली गम्मत नाही कळणार. अशा प्रकारे सफारी संपवून रेसोर्ट वर परत आलो. रात्री जेवण झाल्यावर झालेल्या गप्पांना अंत नव्हता. पण आता उद्यापासून खरी मजा होती. सलग तीन सफारी होत्या त्यामुळे सकाळी लवकर उठायचं होतं. त्यामुळे नाईलाजामुळे सगळे झोपायला गेले.
रात्री साधारण दोन च्या सुमारास अचानक जाग आली. AC आणि पंखा बंद झाला होता. गरम व्हायला लागले होते. मिट्ट अंधार पसरला होता आणि भयाण शांततेमुळे बेचैन होऊ लागलं होतं. मी खिडक्या उघडायला चाचपडू लागलो. bag मधून मी माझा head lamp काढून डोक्याला लावला. खिडकीची कडी ओढली. बाहेर बघतो तर जोराचा वारा सुटला होता. समोरचा झोपाळा अव्याहत पणे हलत होता. महुआचे झाड आता मोडून पडते कि काय इतके वाकले होते. वरच्या मजल्यावरचे कुठले तरी दार किंवा खिडकी बहुदा उघडी राहिली होती. ती जोरजोरात वाजत होती. मला आता पुढे काय होणार ते कळल आणि त्याप्रमाणे काहीच मिनिटामध्ये विजा कडाडू लागल्या. मी खिन्नपणे खिडकीच्या गजांना टेकून हे जे काही बाहेर थैमान चालू होतं ते पाहात होतो. कपाळावरून घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या. मी hopes सोडले होते. आता उद्या sighting तर सोडाच, सफारीला जाता येतंय कि नाही याचीच शाश्वती नव्हती. पण अचानक काय झालं कुणास ठाऊक पण मगाचचा जो सोसाट्याचा वारा होता तो खूपच कमी झाला होता. विजाही थांबल्या होत्या. पावसाचे काही किरकोळ थेंब सोडले तर बाकी काहीही झालेलं नव्हतं. खोलीतला AC आणि पंखा सुरु झाला आणि माझ्या जीवात जीव आला. सगळेच परीक्षा बघत होते वाटत माझी. नकळत माझे हात जोडले गेले आणि बेडवर पाठ टेकली. मला आता उद्याचे वेध लागले होते.
दिवस दुसरा:
सकाळी साडे पाच ला सफारी सुरु होणार होती. आमचा चहा पावणे पाच ला तयार होता. सव्वा पाचला मोटरबोट पाशी सर्वजण आले. हरीलाल आणि मी सफारीची पूर्वतयारी करून आलो. बोटीनी समोरच्या तीरावर गेलो. Gypsy तयार होत्या. आज आमची केरिया round होती. सध्या इथे leopard sighting चाललंय असं कळलं. आम्ही मुख्य गेट पासून फारतर एक किलोमीटर अंतरावर असू. काही गाड्या थांबलेल्या दिसल्या. ते सांबरांचे फोटो काढत होते. त्याच बाजूनी पण थोडं आत एक अस्वल येताना दिसलं आणि सगळेजण सांबर सोडून अस्वलाची road cross ची वाट बघायला लागले. दहा मिनिटाच्या आत ते रोड जवळ आलं. आसपास बऱ्याच gypsy पाहून थोडं बिचकल आणि धावत रस्ता पार करून चढ चढायला लागलं. सगळ्या gypsy ची पांगापांग झाली आणि आम्ही दुसऱ्या वाटेला गेलो. आम्ही पक्षी पाहात भटकत असताना परत अजून एक अस्वल जमीन खणून काहीतरी खाताना दिसले. बहुदा मुंग्या किंवा वाळवी खात असावे. फोटो काढण्यात काही अर्थ नव्हता कारण तसं ते बरंच लांब होतं. हरीलाल नी आम्हाला विचारलं “ सर अगर हम बीस मिनिट तक रुके तो तबतक ये रोड पे आयेगा. हम रुक भी सकते है| नही तो एक round मारके फिरसे यहिंपर आयेंगे|” आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. दहाव्या मिनिटाला ते असंच चरत चरत समोर आलं. तेवढ्यात समोरून अजून एक gypsy आली आणि त्या अस्वलाला त्याची चाहूल लागली आणि त्यानी आमच्या बाजूनी मोर्चा वळवला. आता ते अगदीच आमच्या समोरून येणार होतं. आम्ही पूर्ण तयारीत. आमच्या गाडीपुढे एक टेकाड होतं. त्या टेकडा मागून ते वर आलं. आमच्याकडे हळूच नजर टाकून टेकडीच्या दिशेनी गेलं. हरीलाल म्हणाला ” अभी हम उस तरफ जायेंगे| वो नीचे आते हुये फोटो खींच लेना “ गाडी पलीकडे जाऊन थांबवली आणि ते अस्वलं टेकडी उतरताना आम्हाला दिसलं आणि आमच्या गाडीपुढून पुढे झाडात गेलं. तेव्हा खूप छान फोटो मिळाले. मग त्या अस्वलाला सोडून आम्ही पुढे निघालो. अर्ध्या तासात दोन अस्वलं दिसणं हे फारच उत्साह वाढवणारं होतं. एरवी असं काही फार लवकर दिसलं कि नंतर अजून विशेष काही दिसत नाही असा माझा अनुभव होता त्यामुळे आम्ही भटकत राहिलो. काही छोट्या पक्ष्यांचे आवाज सोडता सगळीकडे शांतता होती. काल रात्री जोरदार वादळ झालं होतं. त्यामुळे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. एका अर्थी ते आम्हाला बरं वाटलं. उन तरी लागतं नव्हतं. आसपास काही सांबर आणि माकडे होती. वेळ भरपूर होता म्हणून मग आम्ही meadows च्या दिशेनी पुढे जात होतो आणि तेवढ्यात हरीलालनी "अरे कॉल आ रही है। ठहरो ठहरो" असे म्हणे पर्यंत आमच्या शेजारच्या समांतर पायवाटेवरून एक बिबट्या वेगाने पळत पुढे गेला. तो बहुदा शिकारीच्या बेतात होता. माकडाच्या दिशेनी त्याचा होरा दिसला. थोडा पुढे गेला, जाऊन झाडावर पाहात उभा होता. आमची gypsy एव्हाना त्याच्या समोर पोचलेली होती. अंदाजे वीस फूट. अधून मधून आमच्याकडे पाहात तो शिकारीचा डाव साधत होता आणि आम्हाला वेगवेगळ्या लकबी करून दाखवत होता. आम्ही त्याच्या लवचिक अंगाकडे पाहून हरखून गेलो होतो आणि सुधारत नव्हतं की याला डोळे भरून पाहू की फोटो काढू. तुकतुकीत फिकट पिवळा रंग, त्यावर काळे ठिपके (Rosettes), गळ्याखालचा आणि पोटाचा पांढरा रंग म्हणजे अगदी स्वच्छ पांढरा, त्यावरचे काळे ठिपके तर अगदी रंगवल्यासारखे दिसत होते. डौलदार गोल झालेली शेपूट आणि भेदक नजर हे सारं काही नजरेत साठवत होतो. त्याला आम्ही जवळ असल्याची फिकीर नव्हती. चार ते पाच येरझाऱ्या घालून नंतर त्याच्या लक्षात आलं की आत्ता काही शिकार हाती येईल असं वाटत नाहीये. म्हणून त्यानी परतीचा रस्ता धरला. हरीलाल नी तेवढ्यात प्रसंगावधान राखून गाडी मागे घेतली आणि दुसऱ्याच दिशेनी गाडी पिटाळली. आम्हाला म्हणाला "सरजी, अभी देखीये ये उस रास्तेसे आयेगा। हम आगे जाके उसकी राह देखेगें। एकदम head on photo मिलेगा आपको।" आम्हाला आधीच इतके अप्रतिम फोटो मिळाले होते की आता बिबट्या समोरून येताना दिसणार हे ऐकूनच वेडे झालो होतो आणि बघता बघता अगदी बोलावण पाठवावं तसा तो त्याच रस्त्यानी आला. अगदी catwalk करत. भान हरपलं होतं, छातीचे ठोके क्षणाक्षणाला वाढत होते आणि हाताला किंचितसा कंप सुटला होता. चालता चालता तो काही फुटांवर येऊन थांबला. आमच्या gypsy च्या मागे काही अंतरावर दोन रानगवे होते. त्यांच्या निरीक्षणात बिबट्या मग्न असतानाचे क्षण आम्ही कॅमेराबद्ध केले. बराच माणसाळलेला वाटत होता तो बिबट्या. या जागेवर आधी जी काही माकडे आणि सांबर होती ती दिसेनाशी झाली होती. साहजिकच आहे म्हणा, बिबट्यासारखा चतुर आणि चाणाक्ष शिकाऱ्याची चाहूल लागल्यावर कोण स्वतःचा जीव धोक्यात घालणार? शेवटी तो gypsy च्या इतक्या जवळ आला की मला कॅमेरा ठेवून mobile मधून व्हीडिओ काढावा लागला आणि मग आम्हाला वळसा घालून तो टेकडी चढायला लागला. हरीलाल म्हणाला " आप संभलकर बैठीये। ये अभी पहाडी चढकर उस तरफ जायेगा। हम वही चलेंगें।" परत आम्ही एक नागमोडी वळण घेऊन टेकडीच्या दुसऱ्या बाजूला पोचलो आणि आला की बिबट्या परत. तिथे त्यानी थोडा अंदाज घेतला आणि एका दगडावर थांबुन जांभया दिल्या. तिथे शेजारीच एक गुहा होती. तिच्या तोंडाशी गेला, तिथे बसणार तोच परत मोर्चा आमच्या दिशेनी. आम्हाला कळेना, हे काय लावलंय यानी.. तो परत आमच्या gypsy च्या मागून येऊन, तिथे एक मिनिटभर थांबला आणि खाली असलेल्या पाणवठ्याजवळ जाऊन नंतर दाट झाडीत घुसला. मग पुढून अजून दोन गाड्या आल्या. तोवर फक्त आम्हीच होतो. त्या नवीन गाड्यांना मार्गदर्शन करत आम्ही परत पुढच्या समांतर रस्त्याला उभे राहिलो कारण हरीलालच्या मते बिबट्या परत क्रॉस करणार होता. असे आम्ही आपापसात बोलत असताना परत तो आम्हाला वाळलेल्या पानांवर बसलेला दिसला. आम्ही मनसोक्तपणे हे सगळं आधी अनुभवल्यामुळे आम्ही इतरांना पुढे जाण्यास संधी दिली. तोपर्यंत अजून चार gypsies आल्या होत्या. मग त्या सावध पण निडर बिबट्यानी सावकाश पावले टाकत रस्ता ओलांडला आणि मग मात्र आतल्या रानात गडप झाला. तब्बल एक तास आमच्याभोवती हे नाट्य घडत होतं. सगळ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या. पहिल्याच सफरीमध्ये मनसोक्त दर्शन झालं होतं आणि तेही बिबट्याचं! एकच गोष्ट चटका लावून गेली ती म्हणजे आमच्याच ग्रुप मधली दुसरी gypsy कुठेही दिसली नाही त्यामुळे ते मात्र या घटनेला मुकले. आम्ही सफारी संपवून जेव्हा बाहेर आलो तेव्हा कळलं कि ते केव्हाच मढई रेसोर्ट ला गेले पण. सगळ्या ताज्या आठवणींना उजाळा देत आम्ही बोटीच्या दिशेनी निघालो. अजून दोन सफारी शिल्लक होत्या. काही तासातच परत दुपारच्या सफारीला यायचंच होतं. रेसोर्टला जाऊन नाश्ता, दुपारचं जेवण आणि छोटीशी विश्रांती झाल्यावर पुढच्या सफारीला तयार झालो. हवेत उष्मा बराच असल्यामुळे काही कुठे हालचाल जाणवत नव्हती. आता आमची दुसऱ्या gypsy ला बिबट्या दाखवण्याची धडपड चालू झाली होती. सकाळी जिथे बिबट्या गेला होत्या तिथे आमचं शोधकार्य सुरु झालं. दीड तास झाला तरी काहीही घडत नव्हतं. एकाएकी काही मोर अचानक ओरडू लागले आणि त्यापाठोपाठ सांबराचा call ऐकू आला. आमची खात्री पटली कि सकाळी जिथे बिबट्या गेला होता तिथून आता तो बाहेर पडत असणार., आम्ही आवाजाच्या दिशेनी आमच्या गाड्या नेल्या आणि बिबट्या आत चालत असलेला आम्हाला दिसला. तो रस्त्याच्या दिशेनीच येत होता. रस्त्याच्या अगदी जवळ येऊन त्यानी बाहेरचा अंदाज घेतला, दबकत पुढे आला आणि योग्य वेळ आली असं वाटताच पलीकडच्या बाजूला धूम ठोकली. यानंतर विशेष असं काही झालं नाही. नाही म्हणायला रानगव्यांचा खूप मोठा कळप दिसला. किमान ३० तरी असतील. हळूहळू उजेड कमी व्हायला लागला आणि आम्ही आमच्या रेसोर्टच्या दिशेनी मार्गस्थ झालो.
दिवस तिसरा:
आता आम्ही घाटाची खडी चढण चढायला लागलो होतो. आत्ताची आमची round केरिया, चूटकिदेव आणि लगदा अशा तिन्ही भागातून जाणार होती. घाटरस्ता लागण्यापूर्वी आम्हाला रावण वाघाच्या पावलांचे ठसे दिसले. पण ते कालचे होते. त्या पावलावरून त्याच्या भक्कम शरीरयष्टीची कल्पना येत होती. रावण मात्र काही दिसला नाही. सगळा घाटरस्ता हा मोठ मोठ्या खडकांनी भरला होता. याठिकाणी आम्हाला Rock agama जातीचा सरडा दिसला. लाल काळा रंगाचा तो सरडा दगडावर खूपच उठून दिसत होता. घाट 4 x 4 gypsy चा अंत पाहात होता. एकदाचा तो घाट संपला आणि आम्ही एका छोट्या पठारावर आलो. तिथून सोनभद्रा आणि धेनवा नदीचं विहंगम दृश्य दिसत होतं. खूप उंचीवर आल्यामुळे ऊन भाजत होतं त्यामुळे तिथे फार वेळ न थांबता आम्ही viewpoint च्या दिशेनी निघालो. घाट संपल्यावर लगदा झोन सुरु झाला. Viewpoint अतिशय सुंदर आणि नयनरम्य जागा आहे. इथे मत्स्यघुबड आणि राखाडी डोक्याचा मत्स्यगरुड याचं कायमचं वास्तव्य आहे. हिवाळ्यात इथे Black capped kingfisher सुद्धा दिसतो. पाणी बऱ्यापैकी आटलं होतं तरी बऱ्यापैकी होतं. मुख्य म्हणजे याठिकाणी आपण उतरू शकतो. काही लोकांना इथे जमिनीवर उभं राहून पाण्यात असलेला वाघ पोहताना पण दिसलेला आहे. सफारी संपत आली होती त्यामुळे आम्ही परतीच्या वाटेला लागलो. सर्वांची सर्व अर्थानी trip परिपूर्ण झाली होती. सातपुड्याच्या जंगलानी आमची आठवणींची थैली गच्च भरून दिली होती आणि आम्ही Memory cards भरली होती. असो... आता परत सफारी नाही याची थोडी खिन्नता आली आणि आलेल्या सगळ्या सुखद प्रसंगांची आठवण काढत मोटरबोट गाठली.