फुगे

पावसाची जोराची सर येऊन गेली होती. रस्ते ओलेचिंब झालेले होते. उगीचच रहदारी खूप वाटत होती. गाड्या कशाही आडव्या येत जात होत्या. लोक डोक्यावर हात घेऊन चष्माच्या काचेवर पाणी न येऊ देता लगबगीनं जात होते. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर सुबाभुळीच्या शेंगा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्या होत्या, त्याच बरोबर त्याच्या पानांचाही सडा पडला होता. काही ठिकाणचे दिवे गेल्यासारखे वाटले. त्यामुळे बऱ्यापैकी अंधार जाणवत होता. त्या मिणमिणत्या प्रकाशात सांडलेल्या  शेगांमधल्या बिया चमकत होत्या. हे सगळं पाहात मी कारमध्ये बसलो होतो कुणाशीतरी बोलत. बोलण्यात गर्क असताना बाहेर कुणीतरी थांबलं आहे असं मला वाटलं. अर्थात गाडीच्या काचा बंद होत्या. मी बाहेर काय आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होतो, खरंतर त्याचं  काहीच कारण नव्हतं. आपण जेव्हा मुद्दाम ठरवून एका विशिष्ठ ठिकाणी जर पाहात नसलो ना की कायम तिथे काहीतरी घडतंय असंच वाटत राहतं. म्हणून न राहवून शेवटी मी माझे डोळे त्यादिशेला फिरवले. काचेच्या पलीकडे सायकलवर एक फुगे विकणारा माणूस मला काहीतरी सांगू पाहात होता. माझं सगळं लक्ष फोनमधून बोलणाऱ्या आवाजाकडे असल्यामुळे तो काय बोलतोय याकडे मी लक्ष दिलं नाही. तो बराच वेळ काहीतरी सांगत राहिला अन शेवटी नाद सोडून पुढे जायला लागला. पुढे गेल्यावर मात्र मला त्या सायकलवर मागे बसलेली त्याची लहान मुलगी दिसली. सहा सात वर्षांचीच असावी. तिला पाहिल्यावर चटकन मला माझ्याच वागण्याचा राग आला. आपण इतकी माणुसकी विसरलो की साधी काच खाली घेऊन तो काय म्हणतोय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची इच्छा होऊ नये. दर वेळेला जरुरी नाही की या लोकांना पैसेच हवे असतील. त्या लहान मुलीला काहीतरी हवे असेल कदाचित जे तो घेऊन देऊ शकत नसेल. मी तात्काळ माझा फोन बंद केला आणि त्या माणसाच्या दिशेनी कार पिटाळली. न जाणो त्या अंधारात एकदम कुठे वळला आणि गायब झाला तर. मी त्याला गाठलं आणि शेजारी जाऊन गाडी बंद केली, विचारलं काय रे बाबा काय म्हणत होतात तू मगाशी?
तो चिंब भिजला होता आणि त्याची मुलगी सुद्धा. तो म्हणाला, सायब ह्यो पाऊस पडला आणि समदी पोरं घरला गेली बगा. एक बी फुगा इकला गेला नाही आज. आता काय खाऊ? म्हणून तुम्हाला एकतरी फुगा घ्या म्हनत हुतो.
मी त्या सायकलवर उभ्या केलेल्या काठीवर पाहिलं. खरंच भरपूर फुगे लटकलेले दिसत होते. मला सुचेचना यावर काय बोलावं ते. मी किमान एक फुगा विकत घ्यावा अशी त्याची माझ्याकडून अपेक्षा होती आणि तेव्हा ते ऐकण्याची माझी मगाशी तयारी नव्हती. वीस रुपयांचा एक फुगा, त्या वीस रुपयांमधे तो काय विकत घेऊन खाणार होता कुणास ठाऊक. मी काहीच बोलू शकलो नाही. मी चटकन पाकीट काढलं, त्यातून शंभराची नोट काढली, म्हणालो हे घे आणि मला फक्त दोनच फुगे दे. बाकीचे जे पैसे उरतील त्यामधे या तुझ्या मुलीला काहीतरी खाऊ घे खायला. ती मुलगी खूप गोड हसली माझ्याकडे पाहून, खूप आनंद झाला होता तिला हे ऐकूनच. मग मात्र मी तिथे थांबलो नाही आणि थेट घरी आलो. घरी माझी मुलगी वाट बघतच होती, तिला आल्या आल्या ते फुगे दिले. तिनी एकदाच 'बाबा फुगा' असं म्हणून ते उडवले. तिच्या डोळ्यातला आनंद बघून मला माझे उरलेले पैसे मिळाले.

© अमोल बापट

 

Powered by Blogger.