कर्णावतार

23 नोव्हेंबर 2014. पिपरिया रेल्वे स्टेशन. सातपुड्याची चार सफारीची टूर संपवून आम्ही मढईहुन रात्री 10:30 ची ट्रेन पकडण्यासाठी चाललो होतो. सलीम स्वतः आम्हाला सोडायला आला होता. आम्ही खूप आधी म्हणजे साठे आठच्या सुमारासच पोचलो होतो. बराच वेळ होता आमच्याकडे. कमालीची थंडी होती. याभागात नेहमीच कडाक्याची थंडी असते. आम्ही सगळे आमच्या सामानासकट प्लॅटफॉर्मवर उतरलो होतो. प्लॅटफॉर्म तसा रिकामाच होता. Snacks किंवा चहाचे स्टॉल्स पण त्यामानानी कमीच होते. एक दोनच असतील. एकच मोठा घोळका होता. बहुतेक लांबच्या प्रवासाला निघाला असावा. पाच-सहा गाठोडी, एक दोन बॅगा त्यावर रंगीबेरंगी कव्हर आणि ते सांभाळत खालीच बसलेल्या लाल-पिवळ्या साड्या नसलेल्या, डोळ्यावरून पदर घेतलेल्या त्यांच्या बायका. प्रत्येकीच्या मांडीवर एक आडवं पडलेलं पोरगं. नेमून दिल्याप्रमाणे त्यातलं एक एक ठराविक मिनिटांनी टाहो फोडत होतं. त्या थंडीत सुद्धा तो घोळका icecream खात होता. प्रत्येकाच्या हातात एकेक कप आणि त्या आया पोरगं उठलं की त्याच्या तोंडात एक icecream चा चमचा खुपसत होत्या. रेल्वे इंजिन्स उगीच मोठ्यांदी आवाज करत जात येत होती. तेवढ्यात समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन येऊन थांबली. लांबून आली असावी कारण त्यातून बऱ्याच संख्येनी माणसं उतरली आणि जिन्याकडे जात होती. त्या जिन्याच्या डावीकडे अतिशय कळकट अवस्थेत एक भिकारी उकिडवा बसला होता. तो ज्या ठिकाणी बसला होता तो कोपरा कमालीचा अस्वच्छ होता. कुणीही त्याकडे पाहू इच्छित नव्हतं. मी हे असं निरीक्षण करत असताना आमच्यातला एकजण तोंड पाडून आला. विचारलं तर असं कळलं की ट्रेन तब्बल साडे चार तास विलंबित झाली होती. AC waiting room मध्ये जाऊ म्हटलं तर ती अजून भयानक होती. प्रत्येक कोपरा रंगलेला होता, रूम मध्ये अंधार होता आणि तिथे डासांचं साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे आम्ही जिथे होतो तिथे बसणं पसंत केलं. बाकडी तशी बरीचशी रिकामी होती त्यामुळे बसायला खूप जागा होती. प्रत्येकानी झोपायचं म्हटलं तरी शक्य होतं. मी एक जागा फिक्स केली आणि निरीक्षण परत सुरू केलं. समोरच्या प्लॅटफॉर्मवर चा तो भिकारी एव्हाना उठला होता आणि जिना चढायला लागला होता. जिना चढताना तो भेळकांडत होता. कदाचित प्यायला असावा किंवा अंगात चालण्या इतकही त्राण नसावं त्याच्यात. मजल दरमजल करत तो आम्ही होतो त्या प्लॅटफॉर्मवर आला. हळू हळू चालत, भेळकांडत येत होता. जसा जवळ यायला लागला तसं जाणवलं की तो काहीतरी तोंडानी पुटपुटत होता. अधिक जवळ आला तर लक्षात आलं की तो चक्क हिंदी गाणं म्हणत होता. राजा हिंदुस्थानी मधलं "परदेसी परदेसी जाना नहीं" या गाण्यावर तो चक्क नाचायला लागला. नंतरच्या अविर्भावरून कळायला लागलं की तो भिकारी बहुतेक वेडा असावा. परत परत तेच तेच गाणं म्हणून झाल्यावर तो तसेच अंगविक्षेप करत जमिनीवर, बाकडयामागे, कचराकुंडी मध्ये काहीतरी शोधायला लागला. त्याला जर एखादं खाण्याची रिकामी बॅग किंवा रिकामं wrapper मिळालं की रागानी अर्वाच्य शिव्या द्यायचा. तो मागचचा icecream खाणारा घोळका train ची announcement झाल्यामुळे पुढे सरकला होता. त्यातल्या एका माणसानी icecream चा खोका पिपरिया या पाटीच्या खाली सरकवला होता. त्या भिकाऱ्याला तो बरोबर दिसला. लगेच घायकुतीनी त्यानी तो उघडला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य उमटलं. मला कळेना काय झालं ते. मी अजून कुतुहलाने पाहायला लागलो. त्या खोक्यामध्ये एक कप अर्धा icecream नी भरलेला होता. त्यानी तो कप उचलला तसे बाकीचे पण उचलून पाहिले आणि इतर कपामधले उरलेले icecream त्यानी बोटानी पुसून त्या अर्ध्या भरलेल्या कपात एकत्र केले. आसपासची लोकं अक्षरशः किळसवाण्या नजरेनी हे दृश्य पाहात होती. मग त्या भिकाऱ्यानी आपली बोटं चाटून साफ केली आणि तो जो अर्धा भरलेला कप होता तो हातात घेऊन खायला सुरवात केली. त्याला कसलीच पर्वा नव्हती. अतिशय आनंदानी तो ते icecream खात होता. प्रत्येक घासागणिक त्याच्यावर चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत होता. तो परत त्यात बोट घालणार तोच त्याच्या मागे एक कुत्रा आला आणि अपेक्षेनी व्याकुळ होऊन बघायला लागला. त्या भिकाऱ्यानी त्याला पाहिलं आणि कपात घातलेलं बोट तोंडात न घालता गोल गोल फिरवून icecream जितकं पाणथळ करता येईल तितकं केलं. शेजारीच मोकळा केलेला एक कप उचलला आणि त्यात ते पाणथळ icecream त्यात ओतलं. त्या कुत्र्याच्या गळ्यात हात घालून त्याला जवळ ओढलं आणि तो अर्धा भरलेला कप त्याच्या समोर ठेवला. त्या कुत्र्यानी तो कप हाहा म्हणता संपवला. त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. तो कुत्रा त्याच्याच जवळ अगदी चिकटून झोपला आणि तो भिकारी सुद्धा मागे भिंतीला टेकून त्याला कुरवाळत पडून राहिला.
मी मात्र हे सगळं बघून हतबुद्ध झालो. एक यकश्चित भिकारी ज्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, ज्याची रोजची खायची भ्रांत आहे तो एका कुत्र्यासाठी स्वतःला मिळालेल्या वाट्यातला एक भाग देऊ करतो? कोण आहे हा? भिकारी नक्कीच नाही. हा कलियुगातला कर्णच असू शकतो. एखाद्यानी त्या कुत्र्याला लाथ घातली असती. मला तरी हे असं काहीतरी करायला जमलं असतं का? उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तो त्या कुत्र्याला तो कप देत असताना मी नवीन कप त्याला घेऊन देऊ शकत होतो. पण मला जमलं नाही ते. का नाही जमलं? लोक काय म्हणतील, आपल्याकडे काय नजरेनी बघतील याचाच विचार फक्त मनात आला असता. मला त्यांच्या आनंदापेक्षा, त्यांच्या भुकेपेक्षा माझी image महत्वाची वाटली. मला माझी स्वतःचीच लाज वाटली आणि मी तिथून उठलो. एका वेड्या माणसानी एका शहाण्या माणसाला एक धडा शिकवला होता आणि तेही गप्प राहून.....

Powered by Blogger.