ते बादशाही दिवस
** ते बादशाही दिवस **
लग्न झाल्यानंतर बायकांना माहेरची जशी आठवण येते अगदी तशीच भावना माझी टिळक रस्त्यावरच्या बादशाही खानावळीबद्दल आहे. १० वी झाल्यानंतर शिकायला म्हणून पहिल्यांदा मी पुण्यात आलो. काही काळ पुण्यात होतो. नंतर दोन वर्ष वसईला काढून जो पुण्यात आलो तो पुणेकर झालो. तेव्हा आमचा टिळक रस्त्यावर बंगला होता. माझा मोठा भाऊ, आशिष आधीच पुण्यात आला होता. त्यामुळे मला कसलीच तजवीज करायची नव्हती. सामान घेऊन फक्त यायच होतं. याआधी पण आम्ही जेव्हा पुण्यात यायचो तेव्हा जेवायला कधी कधी बादशाहीत जायचो. त्यामुळे बादशाही मला नवी नव्हती. पण हीच खानावळ माझ्या मनात कायमचं घर करून बसेल याची मला कल्पना नव्हती. मी आणि आशिष रोज जेवायला तिथेच जायचो. दिवसामागून दिवस गेले. भाऊ कायमचा अमेरिकेत गेला आणि मी कायमचा पुण्यात आलो. आशिष भारतात आला कि काही ठिकाणी आम्ही जातोच, अगदी नक्की. बादशाही त्या पैकीच एक.
काहीच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. ठरवल्या प्रमाणे आम्ही दोघं टिळक रोडवरच्या बादशाही खानावळीत गेलो. बादशाही म्हणजे आमचे एके काळचे दुसरे घरचं म्हणा ना. अगदी बाहेरच्या counter पासुन ते भटारखान्यापर्यंत आमचे अगदी यथेच्छ लाड व्हायचे. आत जेवायला बसलो. पहिला घास घेणार तोच एकदम वामनरावांची आठवण झाली. वामनराव छत्रे.. एक धीरगंभीर व्यक्तिमत्व. गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळेस पुण्यात आलेले. त्यांनी याची कहाणी मटार सोलत असताना निवांतपणे सांगितली होती. त्यांच्याकडे वर वर बघून कोणालाही असेच वाटेल कि हा माणूस म्हणजे अत्यंत कडक स्वभावाचा असेल. पण वास्तविक ते अत्यंत प्रेमळ आणि मृदू होते. खणखणीत आवाजात ते लोकांना पुकारायचे. त्यांच्या आठवणीनी घास खाली जाईना. डोळे भरून आले. मधल्या दारात उभे राहून ते कायम “ शांताराम... बापटांना अजून भात वाढा “ असे म्हणत आणि आत हळूच डोकावत पुढे जात. आम्हा दोघांवरही ते अतोनात प्रेम करत. आमचा दोघांचा खाण्याचा आवाका बराच होता त्यामुळे प्रसंगी ३-४ मुदी भातहि सहज खायचो. आधी ४ पोळ्या (गोपी ५ वी सुद्धा कधी कधी वाढायचा), भरपूर ताक आणि नंतर भाताचा आग्रह. रविवार सकाळ आणि गुरुवार रात्र feast असायची. तेव्हा तर परात घेऊनचं फिरायचे हे सगळे. वाढा मग भरपूर भात. मग काय... एवढे बकासुरा सारखे जेवल्यावर बाहेर footpath गप्पा मारायला तयार.
स्वच्छ पांढरा लेंगा त्यावर पांढरा सदरा आणि हातात पाटी हा त्यांचा रोजचा पेहराव असायचा. खिशात कायम एक पेन असायचे. शांत चेहरा असायचा. मागे वळवलेले पांढरट केस. असा संपूर्ण श्वेत पेहराव असलेल्या आमच्या वामनरावांची दुचाकी मात्र लाल भडक (Sunny) रंगाची होती. मंडईत जाताना ते त्यावरून जायचे. मी त्यांना ह्या खेरीज वेगळ्या वेशात कधीही पाहिलेले नाही. आजही बादशाहीत गेल्यावर एक हात वर करून रेडीओ चा आवाज कमी करणारी त्यांची मूर्ती डोळ्यासमोरून जात नाही. जेवायला जायला उशीर झाला आणि खूप भूक लागली असेल तर वामनरावांना ते लगेच कळायचे. त्यामुळे आमचा जेवायला जायचा क्रमांक लगेच लागायचा. कुणालाही न कळता आम्ही पानावर बसलेले असायचो.
एखादी भाजी आवडीची नसेल तर न सांगता बटाटा भाजी आणि ताजे कैरी लोणचे पानात यायचे. कधी कधी fruit salad सुद्धा.. ज्यांना भात जास्त खाता येत नसे त्या लोकांनी तर बादशाही चे “भातशाही” असे नामकरणही केले होते.
एकदा एक गम्मत झाली. तिथे एकदा नवलकोल ची भाजी होती. म्हणून मी शांतारामला सांगितले कि मला हि भाजी आवडत नाही. तर तो कोणालाही न विचारता बटाटा भाजी आणि लोणचे घेऊन आला आणि वाढू लागला. तेव्हा समोर एक जण जेवत होता. त्यानेही हे पहिले आणि लोणचे वाढायला सांगितले. तर शांताराम त्याला म्हणाला “ हे लोणचे तुमच्या साठी नाही. बापटासाठी आहे. “ काय बोलणार हो तो माणूस यावर? गप गुमान समोर आहे ते जेवू लागला. कोण होती हि माणसे माझी? कोणीही नाही.. रक्ताची तर मुळीच नाही.. ओळख म्हणाल तर फक्त काही वर्षांची. माझा भाऊ पुण्यात आला तेव्हापासून बादशाही ला जात होता. माझ्या साधारण ३ वर्षे आधीपासून.
या बादशाही च्या अगणित आठवणी आहेत. चौकर आजोबा, वामनराव, राम भाऊ, शांताराम, रघु, गोपी, सुरेश, अर्जुन काका किती नावं घेऊ अजून. चौकर आजोबा आणि वामनराव सोडले तर हि सर्व माणसे आजही तिथे काम करतात. याच बादशाही नि मला खूप माणसे दिली, ओळख दिली, आवड दिली.
चौकर आजोबा हे देखील एक आगळवेगळ व्यक्तिमत्व. वय वर्षे ९०. तरीही ते counter वर बसून coupons द्यायचे. काही क्षुल्लक डोकी सोडली तर इतर लोकांशी ते अतिशय फटकून वागायचे. typical पुणेरी... ते जेव्हा नसायचे तेव्हा मी किंवा माझा भाऊ counter सांभाळायचो. माझ्याशी ते कायम खांद्यावर हात टाकून गप्पा मारायचे. एरवी ते कधी फारसे हसले नाहीत. पण जेव्हा हसायचे तेव्हा चक्क खळी पडायची.. आता हि दोन्ही माणसे इतिहास जमा झाली आहेत. नशिबाने न मागता हि माणसे दिली होती तशीच ती न विचारता परत घेतली. आता बादशाही मध्ये गेल्यावर दारात उभे असलेले वामनराव आणि counter वरचे चौकर आजोबा दिसणार नाहीत.... कधीही दिसणार नाहीत.
कधी कधी वाटत... आम्ही बापट बंधू, सोमण, आपटे, लेले, जोशी, जोग, भाटे बंधू, या सर्वांनी एकत्र येऊन बादशाहीत जावं. कदाचित आमच्या सर्वांच्या प्रेमापोटी वामनराव येतील आणि म्हणतील.... “अरे भात द्या रे इकडे कुणीतरी भात”