भुर्जीची गाडी

पुलंनी माझे खाद्यजीवन यांत म्हटल्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या चवीला आपण कुठे बसून खातोय याला जसं महत्व आहे, त्याबरोबरचं तो पदार्थ कुठे बनतो यालाही खूप महत्व आहे. किंबहुना मी म्हणेन की त्या जागेमुळे त्याला जी चव येते ना ती अन्यत्र येऊच शकत नाही. रस्त्यावरची पाणीपुरी छान जमून आली की कुणीना कुणीतरी बोलतंच की त्या भैय्याच्या घामाची चव आली असेल त्याला. हे असले चटकदार पदार्थ खाताना आपल्या डोक्यात असले विचार येतंच नाहीत किंवा आपण तिकडे दुर्लक्ष करतो.
पुण्यात नव्यानी चायनीज जेव्हा सुरू झालं तेव्हा पुणे विद्यापीठाच्या रस्त्यावर खाल्लेल्या फ्राईड राईस आणि चिकन मंचुरियनची चव आता कुठल्याही अन्य चायनीजच्या गाडीवर येत नाही. त्याचप्रमाणे टिळक रस्त्यावरच्या एका टपरीवजा बिग स्लाइस नामक हॉटेलातल्या बर्गरची चव कुठल्याही अमेरिकन आऊटलेटला नाही. दिवस पुढे पुढे गेले आणि ही सगळी ठिकाणं हा हा म्हणता बंद पडली. पण तशातही काही जागा काही ठिकाणं आणि काही चवी अजून जशाच्या तशा आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे झेड ब्रिजजवळची एक भुर्जीची हातगाडी. काही ठराविक जागांविषयी आणि मोजक्या लोकांशी कसे ऋणानुबंध जुळतात हे कळतंच नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १९९७ ची असावी. मी आणि माझा मोठा भाऊ तेव्हा टिळक रस्त्यावरच्या आमच्या बंगल्यात राहायचो. दर आठवडयाला अलका टॉकीजला किमान दोन चित्रपट तरी बघायचोच. तेव्हा अलकाला फक्त आणि फक्त इंग्रजी चित्रपटचं लागायचे, आता हे नमूद करावं लागतं. तर मुद्दा असा की दोन तासाचा इंग्रजी सिनेमा साधारण साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास संपायचा. बादशाहीत चापून जेवण झाल्यावर आम्ही एकदा साडे नऊच्या शो ला गेलो. नक्की आठवत नाही पण बहुतेक cliffhanger होता तो सिनेमा. शो संपल्यावर आम्हाला दोघांना लागली भूक. मग तिथून आम्ही थेट चालत आमच्या भुर्जीवाल्याकडे गेलो. डेक्कनवरच्या जी. जे. घैसासच्या दारात हा आपली गाडी उभी करायचा. तव्यावर अंडी परतल्याचा वास काही मीटर आधीपासूनच यायचा आणि त्या खरपूस वासानी भूक अजून चाळवायची. आम्ही नेहेमीचं गिर्हाईक असल्यामुळे त्यानी आम्हाला हात केला आणि म्हणाला, ' आज इतक्या उशीरा? ' आम्हाला वेळेचा अंदाज आला नव्हता. आम्ही चालत आल्यामुळे तसा उशीरच झाला होता. साडे बारा झाले होते. भुर्जीवाला आवरायला लागला होता. पण आम्हाला भूक लागल्याचं समजताच त्यानी भरभर भुर्जी करायला सुरुवात केली. आधीच दोन वेळा पोलिसांची गाडी दम देऊन गेली होती, त्यामुळे त्याला त्याचा बाड बिस्तरा आवरायला लागणारच होता. तरी त्यानी त्या परिस्थितीत सुद्धा प्रसंगी तवा फिरवत तर कधी एका हातानी गाडी पुढे ढकलत आम्हाला खायला घातलं. आम्ही भुर्जी खायला कायमचं येत होतो. शिक्षण चालू असेपर्यंत सारखंच येणं व्हायचं. नंतर टिळक रस्त्यावरचं घर विकलं आणि तसं हे भुर्जी खाणं पण कमी झालं. फार क्वचित येणं व्हायचं. काही दिवसांनी कळलं की घैसासच्या दारात उभी असलेली गाडी आता दिसत नाही. चेहेरा पडला आणि ती चव ओठांवर यायला लागली पण आता काही इलाज नव्हता.
असे बरेच महिने उलटले. माझा भाऊ अमेरिकेहुन महिनाभरासाठी आला होता. म्हणून एके रात्री आम्ही डेक्कनच्या बाजूला भटकायला बाहेर पडलो. घैसासच्या त्याच दुकानाबाहेर गप्पा मारत बसलो असता अचानक एक ओळखीचा वास आला. आम्ही अक्षरशः हुंगत हुंगत त्या झेड ब्रिजजवळच्या एका गाडीपाशी गेलो... खूप अपेक्षेनं. बघतो तर काय तिथे एक भुर्जीची गाडी तर होती पण दुसऱ्याच कुणाचीतरी. एक मिणमिणता दिवा, त्याखाली अंड्यांचा भरलेला ट्रे, आत गाडीत डावीकडे बारीक चिरलेला कांदा, शेजारी टोमॅटो. उजवीकडे काही अल्युमिनियमचे डबे.. ज्यात काय भरलंय हे वाकून पाहिलं तरी कळतं नव्हतं आणि मध्यभागी भणभणणारा स्टो.. हे सगळं चित्र परिचयाचं वाटत होतं पण तो आमचा नेहमीचा मामा नव्हता. तिथे एक बारकासा मुलगा तवा आपटत ऑम्लेट करत होता.
मी भावाला म्हणालो, काय रे घेऊन बघायची का एक भुर्जी? वास तर बरा येतोय. भावानी पण दुजोरा दिल्यावर एका भुर्जीची ऑर्डर दिली आणि आम्ही मागे एका कट्ट्यावर जाऊन बसलो. काही मिनिटांतच एक प्लेट भरून भुर्जी समोर आली. त्याचा वास भपकन नाकात गेला.. न राहवून आम्ही पावाचा तुकडा मोडला आणि त्यात थोडी भुर्जी घेत तोंडात टाकला. आपोआप डोळे मिटले गेले. ब्रह्मानंदी टाळी लागली. मन किमान १०-१२ वर्ष मागे गेलं. तोच रंग, तोच वास, तीच चव.. कोण आहे हा माणूस? कुठे होता इतके दिवस? असे मनात विचार येताच अजून एक धडधाकट मुलगा पुढे आला आणि त्या बारक्याला म्हणाला, 'ए त्यांना अजून कांदा हवाय का विचार'. आम्ही आमच्या विचारातून बाहेर पडलो. समोर तो मुलगा आमच्याकडे पाहात उभा होता. चेहऱ्यावर स्मित हास्य करून म्हणाला, ' काय दादा किती वर्षांनी? '
आम्ही न राहवून विचारलं, ' कोण तू आणि तू आम्हाला ओळखतोस?'
तो म्हणाला: हो दादा, मी कृष्णा. तुम्ही यायचात ना खूप पूर्वी? मी लहान होतो तेव्हा. माझे वडील करायचे तेव्हा भुर्जी. बरोबर ना?
आम्ही शुन्य नजरेनी त्याकडे पाहात होतो.
मी: हो बरोबर. पण तेव्हा करायचे म्हणजे? आता सोडलं का काम त्यांनी?
कृष्णा: दादा, माझे वडील गेले कधीच, आता मीच सांभाळतोय ही गाडी गेली दोन वर्ष.
कान आणि डोळे बधिर झाले होते ती बातमी ऐकून.  क्षणभर वाटून गेलं की ती आता भेटतील पण ते आता शक्य नव्हतं.
मी: तुझं फक्त यावर पोट आहे?
कृष्णा: नाही दादा, मी कॉर्पोरेशन मध्ये काम करतो आणि रात्री गाडी चालवतो. आता तसं बरं चाललंय आमचं. पण तुम्ही येत जावा आता पूर्वीसारखे.
आम्ही हसून होकार दिला. त्याला म्हटलं, अरे आम्ही किती वेळा तुझ्या बाबांच्या पद्धतीनी घरी भुर्जी करायचा प्रयत्न केला पण तशी चव येतंच नाही रे. पण तू मात्र जशीच्या तशी त्यांच्या हाताची चव उचलली आहेस रे. शाब्बास आहे तुझी.
त्या बारक्याच्या हातून सगळी सूत्र स्वतःकडे घेत तो म्हणाला, दादा खरं सांगू का तुम्हाला, ही चव या जागेची आहे. मी स्वतः माझ्या घरी हाच तवा आणि हेच मसाले घेऊन भुर्जी केलेली आहे पण इथल्यासारखी मजा नाही येत. आता बोला..
काय बोलणार आम्ही यावर? आम्ही पैसे विचारले पण त्यानी ते सांगायला नकार दिला, वर म्हणाला, तुम्ही परत याल ना तेव्हा घेईन.
नुसती हाताची चवच नाही तर बापाचे सगळे गुणही घेतले होते पठ्ठ्यानी. मगाशी घास तोंडात टाकल्यावर डोळे बंद केले होते ना तेव्हा भुर्जी करणारे मामाच डोळ्यासमोर येऊन गेले. ज्या घासामुळे हे सगळं पूर्वीचं आठवलं ती प्लेट आता थंडगार होऊन हातात तशीच राहिली होती.

Powered by Blogger.