हुलकावणी पेंचची आणि स्वप्नपूर्ती कान्हाची

हुलकावणी पेंचची आणि स्वप्नपूर्ती कान्हाची: 

पेंच कान्हा ट्रीपची डेट जवळ आली आणि एकीकडे दोन्ही ठिकाणी पावसानी बरसायला सुरवात केली. माझं आणि पेंचचं काय नात आहे काही कळत नाही मला, नेहमी कसा मी यायच्या वेळेला पाऊस पडतो. फक्त माझ्याच नव्हे तर माझ्या काही मित्रांच्या सफारीच्या वेळेसही हा असाच पडला होता. पण यावेळेला वरुणराजानी मात्र खूपच कृपा केली होती. आमची ट्रीप जायच्या दोन दिवस आधी पाऊस थांबला होता. आम्ही हुश्श केलं. आमच्या पेंचला दोन सफारी होत्या. खुर्सापारला एक आणि टुरियाला एक. दुरांतोनी नागपूरला उतरून आम्ही टुरिया गेटजवळच्या एका रेसोर्टमधे उतरलो होतो. लंच करून आम्ही पहिल्या वहिल्या खुर्सापारच्या सफारीला तयार झालो. या गेटला बहुतेक रोजच बारस, बिंदू, दुर्गा आणि हँडसम (वाघांची नावं) असे आळीपाळीनी दिसत होते. त्यामुळे आपल्या पदरात यापैकी कोणाचं दान पडतं हे पाहायचं होतं. बाहेर जिप्सी आल्या होत्या. बाहेर गेलो तर जिप्सीशेजारी चक्क मोनू उभा. मोनू स्वतः आमच्या गाडीचा ड्रायवर म्हणून आला होता. तो आहे म्हटल्यावर काळजीच मिटली असं म्हणत आम्ही सफारीला निघालो. प्रचंड ऊन होतं. आम्ही एकेक पाण्याची तळी बघत बघत चाललो होतो. एके ठिकाणी सांबराचे alarm calls ऐकू यायला लागले, अगदी अर्ध्या तासाच्या आत. आम्ही कॅमेरा सरसावून बसलो. तळ्याच्या पलीकडे एका खड्यात कुणीतरी एक वाघ बसला आहे असं बाकीचे गाईड सांगत होते. तेवढ्यात एक रानडुक्कर घाईघाईनी विरुद्ध दिशेनी पळताना दिसलं. तरीही कॉल्स चालूच होते. एकंदर अंदाज घेऊन मोनू म्हणाला कि बहुतेक रानडुकराला बघून सुद्धा हे कॉल्स करत असतील, आपण जरा अजून पुढे जाऊन बघू आणि आम्ही निघालो. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा बऱ्याच गाड्या थांबलेल्या दिसल्या. एक टायगर रोड क्रॉस करून गेला होता.. लोक दुरवर झाडीत पाहत उभे होते. पण आम्हाला मात्र काही दिसलं नाही. मग आम्ही एकानंतर एक बरीच पाण्याची तळी पालथी घातली आणि शेवटी काहीच नजरेत पडत नाही असं दिसल्यावर मगाशी जिथे कॉल्स येत होते तिथे गेलो. तिथे गेल्यावर असं कळलं कि आम्ही गेल्यावर साधारण दहा-पंधरा मिनिटांनी त्याच तळ्यात दुर्गा आणि बारस पहुडलेल्या दिसल्या. आता काही उपयोग नव्हता. त्या दोघी पाणी पिऊन केव्हाच पसार झाल्या होत्या. आता काय करायचं? कुठे जायचं? असा विचार करत परत काही स्पाॅट्स चेक करून आलो. एका दुसऱ्या तळ्यापाशी तब्बल वीस मिनिटं थांबलो पण काहीच हालचाल नव्हती. तिथे आधीच काही सांबर आपल्या पिल्लांबरोबर पाणी पीत होती. कोतवाल (drongo), वेडाराघु (bee-eater) आणि टकाचोर (treepie) त्या पाण्यावर धुडगूस घालत होते. एकूणच इथे बाकी काही हालचाल नाही म्हटल्यावर आम्ही तिथून निघालो आणि मुख्य रस्त्याला जाऊ उभे राहिलो काही कॉल्स वगैरे येतात का ऐकायला. तिथेही पूर्ण शांतता. मग परत आम्ही ती सांबर पाणी पीत होती तिथे गेलो तर अगदी नुकतीच दुर्गा येऊन गेली होती. सगळे म्हणत होते कि तुम्ही अजून थोडा वेळ थांबायला हवं होतं. आता करायचं तरी काय? सफारीची वेळ संपत आली होती. सूर्य अस्ताला गेला होता. मी कॅमेरा होता तसा बॅगेत ठेवला आणि बाहेर पडलो.
आता दुसऱ्या दिवशी टुरियाला सकाळची सफारी होती. सकाळी साडे पाचला सफारी सुरु झाली. सकाळपासून मळभ आलेलं होतं. पण पावसाची तितकी चिन्हं दिसत नव्हती. आदल्या दिवशी एका वाघानी सांबराची शिकार केली असल्याची बातमी गाईडनी दिली म्हणून मग आम्ही त्यादिशेनी जायचं ठरवलं. ती जागा तशी बरीच लांब होती. तिथे पोचेपर्यंत पावशा, नवरंग, पिंगळा, मोर, जंगली कोंबडा, सर्पगरुड आणि अजून बरेच पक्षी बघत बघत आम्ही त्याठिकाणी पोचलो. वाळलेल्या पानांत सांबराचे शव स्पष्ट दिसत होते. वास्तविक वाघ त्याची शिकार पूर्णपणे खातो पण हि शिकार अजून बऱ्यापैकी शिल्लक होती. त्यामुळे याचं जागी वाघ परत येण्याची शक्यता दाट होती. त्या पडलेल्या शवावर अनेक रानकावळे बसले होते. काही जवळच्या फांदीवर बसून होते. खालचा कावळा उडाला कि त्याची जागा हे वर बसलेले कावळे बळकवायचे. अर्धा तास आम्ही तिथेच बसून होतो पण ना कुठले कॉल्स आणि ना कुठली हालचाल. जसंकाही ते शव त्या कावळ्यांसाठीचं होतं. इथे एकूणच वातावरण गपगार होतं. ना कॉल्स, ना हालचाल ना पाऊलखुणा. शेवटी आम्ही काय ओळखायचं ते ओळखलं आणि अजून काही नेहमीच्या वाटांवर सफारीची वेळ संपेपर्यंत चक्कर टाकून परत टुरिया गेटला आलो. तिथे तसंच थांबलेलो असताना आमच्या ग्रुपमधली दुसरी जिप्सी बाहेर आली. चेहरा एकदम टवटवीत. त्यातला एक आम्हाला तिथूनच विचारतो,' दिसली का तुम्हाला Langdi with cubs?'
Langdi with cubs??? आम्हाला काही कळेचना. आम्हाला असं काही दिसलं नाही हे कळताच त्यांचे चेहेरे पण पडले. त्यांना काही कळेना कि एकाच वाटेवर गेलेलो असताना यांना का दिसू नये बरं! अजून त्यावर खल करत बसण्यात काहीच अर्थ नव्हता. आमच्या पेंचच्या सफारीज संपल्या होत्या.
सगळं सामान आवरून आम्ही तडक कान्हाच्या दिशेनी निघालो. पोचल्या पोचल्या लंचला गेलो. चार वाजता सफारी सुरु होणार होती. आमची पहिली सफारी किसलीला आणि दुसऱ्या गाडीची मुक्कीला. बरोबर चार वाजता गेट उघडलं आणि आम्ही सालच्या त्या जंगलात प्रवेश केला. जंगलात प्रवेश केल्या केल्या एका मोठ्या जंगलात आल्याची खात्रीच पटली. खुर्सापार आणि टुरियाच्या जंगलापुढे हे जंगल खूपच दाट होतं. किसलीच्या आतल्या गेटमधून आत गेल्यावर डावीकडे एका तळ्यापाशी गेलो. काही दिवसांपूर्वी इथे येऊन गेलेल्या एका मित्राकडून असं कळलं होतं कि इथे सध्या brown hawk owl दिसतंय म्हणून, त्यामुळे तशी कल्पना मी गाईडला दिली. या तळ्यापाशी असलेल्या एका जांभळाच्या झाडावर हे घुबड बसलेलं आम्हाला दिसलं. मला कित्येक दिवसापासून याला पाहण्याची इच्छा होती ती कान्हात पूर्ण झाली. एरवी हे घुबड वेस्टर्न घाट मधे दिसतंच पण कान्हा मधे फार कमी लोकांनी पाहिलं होतं. या घुबडाचे यथेच्छ फोटो काढल्यावर आम्ही कराईघाटीच्या दिशेनी निघालो. या झोनमध्ये कराईघाटी (T2) आणि धामणगाव (T67) मेल अशा मातब्बर वाघांची टेरीटरी होती. या T2 ला पाहण्याची माझी खूप तमन्ना होती आणि सध्या तोच T2 याच भागात आला असल्याची बातमी मिळाली होती. त्यामुळे त्याला पाहण्याची आम्हाला घाई झाली होती. पण bad luck खराब म्हणतात ना तशातली काहीतरी गत झाली होती आमची. इथेही काही कोणी दर्शन द्यायला तयार नव्हतं. पण कराईघाटी मधून उलटे येत असताना आम्हाला एक अस्वलं अगदी अर्धा तास बघायला मिळालं. एरवी गाडीची चाहूल लागली कि लगेचच ते झाडीत गायब व्हायचं पण या अस्वलाला तिथे आमच्या असण्यानी तसा काहीच फरक पडला नव्हता. त्याला कारणही तसच होतं म्हणा. ते अस्वलं झाडालगतच्या एका मोठ्या वारुळाजवळ बसून त्यातल्या मुंग्या, वाळवी खाण्याच्या प्रयत्नात होतं. पुढच्या पायाच्या नखांनी त्यानी ते वारूळ खणायला सुरवात केली. थोडं खणून झालं कि आतमध्ये जोरानी हवा सोडत होतं. तो हवा सोडण्याचा आवाज आम्हाला आमच्या गाडीपर्यंत ऐकू येत होता. हे त्याचे प्रकार साधारण पंधरा मिनिटं चालले होते. त्यानंतर त्यात आता अजून काही शिल्लक नाही लक्षात येताच आमच्याकडे एकही कटाक्ष न टाकता सालच्या निबिड जाळीत गडप झालं. त्यानंतर आम्हाला दोन कोल्ह्यांचे दर्शन मात्र अप्रतिम झालं आणि फोटोही उत्तम मिळाले. किसलीचा बराचसा भाग पिंजून काढल्यावर शेवटी आम्ही परतीची वाट धरली. परतीच्या मार्गावर असताना गेटजवळच्या डांबरी रस्त्यावर सगळ्या गाड्या थांबल्या होत्या. त्यांचे टेल लँप लांबूनच आम्हाला दिसले आणि पोटात एकदम गार वाटायला लागलं. बहुतेक वाघ असणार आसपास. कारण याच मार्गावर वाघानी अनेकदा दर्शन दिलं होतं. आम्ही लगबगीनी पुढे गेलो. बघतो तर काय उजवीकडच्या पिवळ्या गवतात एक बिबट्या बसलेला होता. पावणे सात वाजायला आले होते त्यामुळे उजेड फारसा नव्हताच. मी लगेचच माझे फोटोग्राफीचे कसब वापरून त्याचे फोटो काढले. फोटो फार छान येणं अपेक्षितच नव्हतं..पण आले थोडेफार. बाहेर पडलो. मनानी थोडी उभारी घेतली. चला निदान वाघ नाही तर बिबट्या तरी दिसला. किसलीच्या सफारीला अस्वलं, कोल्हा आणि बिबट्या दिसला... म्हणजे अगदीच काही वाईट झाली नाही सफारी. रेसोर्टवर आल्यावर आम्हाला आमचा दुसरा ग्रुप भेटला. तर त्यांना मुक्कीला छोटा मुन्ना आणि त्याची फिमेल धवझंडी पाण्यात बसलेली दिसली आणि वर परत काय तर, 'अरे किती वेळ बसले होते ते दोघं शेवटी आम्ही निघालो तिथून'. हे म्हणजे जखमेवर मीठ झालं हो.. आम्ही आपले फक्त ऐकत होतो. मला आमच्या नशिबावर हसूच येत होतं. तीन सफारी झाल्या होत्या. आता चौथी सफारी कान्हाची होती. इथे सध्या नैना, नीलम या वाघिणी पिल्लांसोबत दिसत होत्या. झालंच तर बजरंग नावाचा मेल टायगर पण होता. आता काय हि नावं घ्यायची आणि वाट बघत बसायची अशीच वेळ आली होती खरी. दुसऱ्या गाडीला आत्ता किसली झोन मिळाला होता. सफारी सुरु झाली. कान्हा झोनची सुरवातचं झाली ती मुळी अंधारलेल्या आकाशानी. उन्हाचा कवडसा म्हणून नव्हता. चांगलं तास-दीड तास भटकल्यावर आमचा गाईड म्हणाला,' सर वो आज मौसम ऐसा है ना इसलिये कोई टायगर बाहर नही निकल रहा. नही तो नीलम यही पडी रेहेती है. आसानीसे दिख जाती है '. मी यावर काहीच बोललो नाही. सध्या काय... मौसम चांगला असला काय अन नसला काय आमच्या हाती काहीच लागत नव्हतं. सफारी संपेस्तोवर हे असंच वातावरण घेऊन आम्ही हिंडत होतो. सफारी संपली. आम्हाला अजूनही वाघ दिसलेला नव्हता. आमच्या दुसऱ्या गाडीला पण या वातावरणामुळे विशेष काही दिसलं नव्हतं.
पाचवी सफारी. यावेळेला आमच्या दोन्ही गाड्या सरही झोनला होत्या. लगेच डोळ्यासमोर T2 यायला लागला. सरहीला जायला किसलीचाच सगळा रस्ता तुडवत जावं लागतं. तसं करत करत आम्ही कराईघाटी ओलांडून पुढे सरहीला गेलो. तिथे एक वळसा घालून परत कराईघाटीच्या दिशेनी यायला लागलो तर अचानक सांबराचे जोरदार कॉल्स यायला लागले. पुढे आमच्या दुसऱ्या गाडीबरोबर अजून तीन गाड्या झाडीत पाहात उभ्या होत्या. आम्हाला त्यांनी लांबूनच हात केला आणि तिथेच थांबण्याचा इशारा केला. कॉल्स सतत चालूच होते. वाघ आत्ता बाहेर येईल... मग बाहेर येईल असा विचार करत असतानाच आतल्या झाडीतून जोराची डरकाळी ऐकू आली. खात्रीच पटली कि वाघ इथेच जवळ कुठेतरी आहे. पण दिसायला काही तयार नव्हता पठ्ठ्या. एव्हाना आमच्या दोन्ही गाड्या जवळ आल्या होत्या. आमच्या दुसऱ्या गाडीतला एक जण मला काहीतरी सांगू इच्छित होता. त्याच्या हातावरून आणि ओठांच्या हालचालीवरून कुठलातरी मोठा वाघ जोरात पळत त्यांच्या गाडीसमोरून गेला. तो धामणगाव मेल टायगर होता. बहुदा तो शिकारीच्या बेतात असावा. आम्ही परत अपेक्षेनी ओथंबलेले डोळे समोरच्या झाडीत खुपसून पाहात होतो. शेवटी कॉल्स थांबले आणि आम्ही खिन्न मनानी परत जायला निघालो. ज्याठिकाणी आम्ही ते brown hawk owl पाहिलं होतं त्याचं दिशेनी यायला लागलो असता परत तिथे काही गाड्या दाटीनी उभ्या असलेल्या दिसल्या. आता काय झालं विचारलं तर नुकतीच एक फिमेल रस्ता क्रॉस करून गेली असं कळलं. आता मात्र आमचा तोल गेला. पण तेवढ्यात आशेचा एक किरण मिळाला. समोरचा एक गाईड आम्हाला म्हणाला, सरजी बहुत दरसे एक मेल और एक फिमेल यहां तालाब मै बैठे थे| फिमेल उठकर चली गई लेकीन मेल अभीतक वही है, आप जल्दीसे वहा जाओ '. हे ऐकताच आमच्या चालकानी लगेच गाडी तिथे पिटाळली. बघतो तर तलावात काहीच नव्हतं. मग कळलं कि मेल पण उठून समोरच्या दगडात आराम करत पडलाय. हे कळेपर्यंत आमच्या गाईडनी टायगर स्पाॅट केला होता. दोन दगडाच्या एका बेचक्यातून त्याच्या अंगावरचे पट्टे दिसत होते. माझं टाळकचं फिरलं. एकतर इथे इतकं भटकून वाघ दिसायला तयार नाही आणि आता दिसतोय तर फक्त पट्टेच.. जे काही घडत होतं ते पटतच नव्हतं. तरी मी आपला माझी कॅमेरारुपी बंदूक त्या वाघाच्या दिशेनी रोखून उभा होतो आणि अचानक असं काही घडल कि जे कल्पनातीत होतं. माझ्या डोक्यातले विचार जसं काही त्याच्या पर्यंत पोचले असं वाटावं अगदी त्याप्रमाणे त्यानी हालचाल करायला सुरवात केली. त्यानी हळूच डोकं वर केलं. मग एकदा शेपूट वर केली. नंतर घरातल्या मांजराप्रमाणे पोट वर करून झोपला पण चुळबुळ सतत चालू होती आणि अखेर तो क्षण आला. त्यानी पाठीला एक हिसका दिला आणि आपलं पूर्ण डोकं वर काढलं. मी समोरचं गाडीत होतो. त्याचे डोळे डायरेक्ट माझ्या डोळ्यात. मी कुठलाही क्षण वाया न घालवता सटासट फोटो काढले. मनाला शांतता लाभली. तो सतत माझ्या दिशेनी कटाक्ष टाकत होता. पण तो उठला मात्र नाही. मनसोक्त फोटो काढून झाल्यावर माझं डोकं ठिकाणावर आलं. पण हा कोण टायगर आहे? कुठला मेल? याचं उत्तर मला खूप उशिरा मिळालं. तो वाघ पर्यटक क्षेत्राच्या बाहेरचा होता. तो पहिल्यांदाच याभागात दिसत होता. त्याचं नाव T11 म्हणजेच गणेरी दादर असं होतं. दिसायला अतिशय देखणा पण तितकाच आक्रमक होता. अखेर दिवस संपायची नांदी लागली आणि आम्ही प्रसन्न मनानी बाहेर पडलो.
आता आमची शेवटची मुक्की झोनची सफारी आणि दुसऱ्या गाडीची कान्हाची सफारी राहिली होती. आम्हाला वाघ दिसला होता पण फक्त चेहरा. आता बघू शेवटच्या सफारीला काय वाढून ठेवलंय ते. सकाळी साडेपाचला सफारी सुरु झाली. सहा पर्यंत पूर्णपणे उजाडलं होतं. आम्ही धवझंडी फिमेल आणि छोटा मुन्नाच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच बाबा ठेंगा तलावाच्या दिशेनी जात होतो. गेले अनेक दिवस धवझंडी फिमेल आणि छोटा मुन्ना याचं तलावात डुंबत होते आणि तेही आपल्या बछड्यांसह. छोटा मुन्ना कित्येकदा आपल्या या बछड्यांना खेळवत अनेक तास पाण्यात बसलेला असायचा. असे मनात खयाली पुलाव पकवत होतो. आम्ही चिमटा-धवझंडी मार्गानी जात होतो आणि अचानक पुढच्या तीन गाड्या झपाट्यानी मागे येताना दिसल्या. पाठोपाठ थोडी गडबड पण कानावर आली. त्यातले काही शब्द कानावर आदळले. ते शब्द होते,' छोटा मुन्ना रोड हि रोड सामनेसे चलके आ रहा है '. माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना. छोटा मुन्ना आणि तोही Head-on.. आणि हे विचार डोक्यात येईपर्यंत माझ्या नजरेनी समोरून येणारा भारदस्त, देखणा असा छोटा मुन्ना अचूक हेरला. दिमाखानी एकेक पावलं पुढं टाकत तो येत होता. समोर कोण आहे याची त्याला फिकीर नव्हती. इतक्यात आमच्या चालकानी चपळाई दाखवली आणि आमची गाडी अशा पद्धतीनी पुढे घातली कि आमची चौथ्या क्रमांकाला असलेली गाडी एकदम मुन्नाच्या समोर. बाकीच्या तिन्ही गाड्या झपाट्यानं मागे जायला लागल्या. मुन्ना पुढे पुढे येतंच होता. आमच्या चालकानी गाडी जोरात मागे घेतली आणि गाईड म्हणाला, सरजी जल्दीसे फोटो खिंचो| ये और आगे आनेवाला है|' अर्थातच मी माझं काम करत होतो. बघता बघता मुन्ना जवळ आला. एका झाडाजवळ येऊन त्याचा वास घ्यायला लागला. चित्रविचित्र चेहेरे करून एक भली मोठी जांभई दिली आणि माझ्या दिशेनी एक भेदक नजर टाकून आमच्या दिशेनी येऊ लागला. एक भलमोठं जनावर माझ्यापासून फक्त दहा फुट अंतरावर उभं होतं. आमच्या गाडीशेजारून तो गेला आणि आतल्या झाडीत कान टवकारून पाहू लागला. कसलातरी अंदाज घेत घेत तो आमच्या गाडीसमोर चक्क पाठ करून बसला. एक दोनदा त्यानी मान वळवून जांभया दिल्या. त्याच्या कानामागाचे पांढरे ठिपके फारच आकर्षक दिसत होते. त्याची तुकतुकीत त्वचा खुणावत होती. समोर मनसोक्त बघून झाल्यावर उठला आणि जवळच्या पळसाच्या झाडावर आपली लघवी उडवून आतल्या अरण्यात निघून गेला. गेला अर्धा ते पाऊण तास हे नाट्य घडत होतं. या अर्ध्या तासात त्यानी जो आनंद आम्हाला मिळवून दिला तो अवर्णनीय होता. सकाळच्या सात वाजायच्या आत आम्हाला या भविष्यातल्या राजाचं छोटा मुन्नाचं दर्शन झालं होतं. आमच्या गाडीसमोराचा त्याचा राजेशाही पदन्यास पाहून मला या छोट्या मुन्नाचे वडील आठवले. बरोबर सहा वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात मी मुन्नाला पहिले होते. फरक एवढाच होता कि तेव्हा मुन्ना गाडीपुढे पाठ करून चालत होता. सारखं वाटत होतं कि हा एकदा मागे वळून पाहील. पण तो चालतच राहिला आणि आज त्याच मुन्नाच्या मुलानी माझ्या जिप्सीसमोर येत मला स्वप्नवत दर्शन घडवलं.

Powered by Blogger.