बुडबुडी

बुडबुडी :

कडाक्याची थंडी, मनसोक्त पक्षीदर्शन, ध्यानीमनी नसताना दिसलेले डझनभर वाघ आणि एक हृदय हेलावून टाकणारा प्रसंग यामुळे ही कान्हाची ट्रिप कायमची लक्षात राहील. आम्ही कान्हा, किसली, मुक्की आणि सरही अशा झोनमध्ये एकूण सहा सफारी केल्या. त्यातल्या किसली झोन मधली घडलेली एक अंगावर काटा आणणारी घटना सांगतो.
दुपारी तीनला सरहीची सफारी सुरू झाली. सरहीला जायला किसली मधूनच जावं लागतं. आम्हाला पहिल्याच सफारीमध्ये तब्बल पाच वाघ दिसल्यामुळे तसे सर्वजण सुखावले होते. पक्षी बघणारा मी एकटाच होतो. वीसच्या वेगानी ड्राइवर गाडी चालवत होता. कडक ऊन पडल्यामुळे थंडी अजिबात वाटत नव्हती. सावलीत आल्यावर मात्र थोडा गारवा जाणवत होता. आम्ही कराईघाटीच्या दिशेनी जात होतो. अचानक काही जिप्सी डाव्या हाताला थांबलेल्या आम्हाला दिसल्या. सगळेजण गपचूप राहून काहीतरी ऐकत होते. डावीकडच्या काही झाडांवर कावळे कलकलाट करत होते. आकाशात खूप उंचीवर काही गिधाडे उडत होती. एक भीषण शांतता पसरलेली होती. साधारण पंधरा मिनिटं आम्ही तिथे होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात कावळे ओरडतायत म्हणजे नक्कीच आत शिकार झालेली होती. कोणी केली, कधी केली काहीच माहीत नाही. तिथे उभं राहून काही घडत नाही म्हटल्यावर आम्ही पुढे जायला निघालो. सरहीचा भाग फिरून आल्यावर परत त्याच कराईघाटीच्या भागात आलो तर परत तिथे दोन गाड्या दिसल्या आणि काहीतरी पाहात होत्या. काय दिसतंय म्हणून आम्ही पण त्यांच्या शेजारी गेलो तर त्या दुसऱ्या गाईडनी सांगितलं की शिकारीच्या बरोबर विरुद्ध दिशेनी एक वाघ (संगम मेल टायगर) आत्ता आत गेला, अगदी गाडी जवळून. आत झाडीत तो दिसत पण होता. फोटो काढायला जाणार तेवढ्यात तो उठला आणि आत गुडूप झाला. कदाचित तो केलेली शिकार खायला गेला असावा. सफारीची वेळ संपत आली होती. दुसऱ्या दिवशी आमची कान्हाची सफारी होती आणि संध्याकाळी परत किसलीची. दुसऱ्या दिवशी परत त्याच भागातुन जात असताना त्याच कराईघाटीच्या वाटेत एक गाडी दिसली. त्यांच्या अविर्भावावरून आम्हाला अंदाज आला की बहुतेक ते वाघच बघतायत. आमची गाडी पाहिल्यावर त्यांनी लगेच बोलावलंच आम्हाला. आमची गाडी थांबल्यावर तो गाईड म्हणाला,' आप इधर रुकिये. हम forest department को बोलके आते है की यहा एक बांघ मरा पडा है।' आमचा आमच्या कानावर विश्वासच बसेना. "बांघ मरा पडा है" हे वाक्य कानात घुमत होतं. ती पहिली जिप्सी परत गेटकडे जायला निघाली. आता आम्ही एकटेच होतो त्या शवाजवळ. शव अगदी काही फुटावर झाडीत होतं. ते खेचत आणल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. कुजलेल्या मांसाचा दर्प येत होता. शेजारच्या झाडावर एक गरुड ( crested hawk eagle ) बसला होता आणि एक विशिष्ट अंतर ठेवून कावळे बसले होते. ते शव जर अजून आत असते तर यांनी त्याचा फरशा पाडला असता. वास्तविक ज्या नर वाघानी ही शिकार केली होती त्यानी बराचसा भाग आधीच खाऊन टाकला होता. फक्त पाय आणि डोक्याचा काही भाग शिल्लक ठेवला होता. त्यात असंख्य माशा बसत होत्या. आजूबाजूच्या शांततेमुळे तो आवाज प्रकर्षाने जाणवत होता. प्रार्थमिक अंदाजानुसार नर वाघाने कुठल्यातरी वाघिणीच्या बछड्याला मारले असावे. कारण शव अर्धवट खाल्लेले होते त्यामुळे आकाराचा अंदाज येत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यानी मारलं आहे तो वाघ आसपास असण्याची शक्यता बरीच होती. एकदा शिकार केली की वाघ त्याच्या आजूबाजूलाच असतात. फारसे लांब जात नाहीत. इतर गाड्या येईपर्यंत मनात अनेक विचार येऊन गेले. कशावरून काल त्या संगम मेलनी याच वाघाला मारले नसेल आणि आत झाडीत बसून खात नसेल? तिथे कावळे ओरडतच होते की, पण वाघ तिथेच असल्याने कोणी खाली येऊ शकत नव्हतं. एका नरानी दुसऱ्या नराकडून झालेल्या बछड्याला मारून खाणं ही नवीन गोष्ट नाही. असे प्रसंग वारंवार घडतात. पण हा जो प्रसंग डोळ्यानी पाहिला तो खूप क्लेशदायक होता.
कान्हामध्ये घडलेली ही घटना वाऱ्यासारखी पसरली. अनेक तर्क वितर्क चालू झाले. Forest department कडून PM करण्यात आलं. पंजे शाबूत असल्यामुळे चोरटी शिकार नाही हे नक्की होतं. मग नक्की झालं काय असावं? काही तासानंतर पक्की आलेली बातमी अशी की शिकार झालेला वाघ हा बछडा नसून बुडबुडी (T83) नावाची मादी होती. सफारी दरम्यान कोणीतरी संगम या नर वाघाला तिचे मांस खाताना पाहिलं होतं. संगम या वाघानी कराईघाटी भागातल्या मादीशी मिलनाचा प्रयत्न करण्याच्या नादात तिचे प्राण घेतले होते. Department कडून तिच्यावर अंतिम संस्कार केले गेले. अशा प्रकारे किसली भागातल्या एकमेव मादीचा अंत झाला.
Powered by Blogger.