रणथंबोर डायरी

रणथंबोर डायरी :


रणथंबोर दिवस १:
दुपारच्या कडक उन्हातुन जंगलात सफारीला गेल्यावर अंगावर जॅकेट असल्यामुळे हायसं वाटलं. नुसतं उन्हात उभं राहिल्यावर मात्र चटके लागत होते पण जसा सूर्य अस्ताला गेला तसा थंडीनी जोर धरला. झोन 2 मधली पहिलीच सफारी फक्त अलार्म कॉल्सवरच संपणार असं वाटत असतानाच एका नर वाघानी अगदी जवळून म्हणजे जेमतेम 10 फुटांवरून दर्शन दिलं. पाणी पिऊन ओल्या निथळत्या  रस्त्यावरच्या ठशांचा माग काढत काढत पळसाच्या झाडीत बसलेला एक वाघ आम्हाला दिसला. जिप्सी ज्याजोमानी मागे घेतली त्याच जोमानी आम्ही चटकन मागे सरकलो. ते धुड आमच्या अगदी शेजारी होतं. आमची चाहूल लागताच त्यानी वरवर जायला सुरवात केली. काही मिनिटांतच त्यानी आमच्या अंगावर जे काही रोमांच उभे केले त्याला जबाब नव्हता. संध्याकाळ होत असल्यानं उजेड फार नव्हता. त्यामुळे फक्त रेकॉर्ड शॉट मिळाले. पण काही हरकत नाही पहिल्याच दिवशी नारळ तर फुटला...
रणथंबोर दिवस २:
आजचा दिवस हुलकवण्यांचा आणि काही नतद्रष्ट माणसांमुळे गालबोट लागणारा ठरला. सकाळच्या गोठवणाऱ्या थंडीमुळे बहुदा पक्षीदेखील गारठले असावेत. काही ठराविक पक्षांशिवाय अन्य काही दिसत नव्हतं आणि सातभाई (Babbler) आणि टकाचोर (Treepie) या पक्षांनी वॉशरूम जवळ येणाऱ्या लोकांना भंडावून सोडलं होतं. ते इतके माणसाळले होते की ते अक्षरशः मांडीवर बसायलाही तयार होते. पर्यटकांकडून देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी असं माझं मत आहे. असो. झोन 2 च्या एका पहाडीच्या टोकाला येऊन पलीकडच्या डोंगरालगत असलेल्या एका नाल्याच्या दिशेनी येणाऱ्या अलार्म कॉल्सकडे आम्ही डोळे लावून बसलो होतो. भल्या पहाटे हवाहवासा वाटणारा सूर्य आता नकोसा वाटत होता इतका तो डोळ्यावर येत होता. आमची ही नापसंती वाघानी बहुतेक हेरली असावी. ते सांबर कोकलत राहिलं पण तो काही झाडीतून बाहेर आला नाही आणि आमची वेळ संपत आली.
सध्या हॉट फेवरेट असलेल्या झोन 6 मधे आमची संध्याकाळची सफारी होती. झोन 2 च्या मानानी अतिशय रुक्ष असा हा झोन होता. इथे एक मेल एक फिमेल आणि दोन पिल्लं (जय- विरु) यापैकी कोणीतरी दोघंजण सतत दर्शन देत होते. सगळा परिसर पालथा घातल्यावर एका गवताळ भागात आम्हाला परत सांबरांचे अलार्म कॉल्स ऐकायला यायला लागले. चार कँटर्स आणि सहा-सात जिप्सी वाघाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत तिष्ठत उभ्या होत्या. सलग काही मिनिटं कॉल्स ऐकू आल्यावर समोरच्या झाडीतून किमान चार ते पाच वेळा सणसणीत डरकाळ्या ऐकू आल्या. त्यामुळे किमान दर्शन नाही पण डरकाळ्या ऐकून का होईना पण त्या केलेल्या प्रतिक्षेचं चीज झालं. व्याघ्रदर्शनापेक्षा त्याची डरकाळी ऐकायला मिळणं जास्त दुरापास्त आहे. काल ओझरत्या झालेल्या दर्शनानी डोळे तृप्त झाले होते आणि आज कानही...
डरकाळ्या संपल्यावर जशा गाड्या बाहेर पडायला लागल्या तेव्हा एका कँटरमधून एका माणसानी एक प्लास्टिक बाटली तिथेच खाली भिरकावून दिली. ज्यांना यांत चुकीचं जाणवलं त्यांनी याचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आणि काहींना याचं गांभिर्य समजण्याचा संबंधच नव्हता. आम्ही आमची जिप्सी तातडीनं मेन गेटवर पिटाळली आणि बाहेर असणाऱ्या गार्डला शौनकनी झालेली घटना सांगितली. मग काही मिनिटांतच त्या कँटरमधून त्या माणसाला बाहेर काढण्यात आलं, त्या माणसाकडून आणि त्या कँटरच्या गाईडकडून दंड वसूल केला गेला. त्यांना सर्वांची बोलणी खायला लागली ती वेगळीच. झाली ती गोष्ट फारच लज्जास्पद होती. ही घटना ज्या कँटरमधे घडली त्याच कँटरमधे दुर्दैवाने काही फिरंगी माणसं पण होती. पण एक बरं वाटलं की तक्रार केल्यावर त्या गार्डनी आपली जबाबदारी समजून घेऊन योग्य तो निर्णय घेतला.
रणथंबोर दिवस ३:
आदल्या दिवशीच्या हुलकावण्यांनंतर आजचा दिवस अगदीच नाट्यमय ठरला. आजची पहिली सफारी झोन 4 मधे होती. याभागातलं जंगल बरंच दाट होतं त्यामुळे साहजिकच थंडी खूप वाजत होती. कोअर भागात प्रवेश केल्यापासून प्रत्येक वाटांवर अक्षरशः मुद्दाम पाडल्यासारखे पगमार्क्स दिसत होते. खुणांची सुरवात बिबट्याच्या पावलांनी झाली आणि लगेचच दुसऱ्या एका जिप्सीला अलार्म कॉल्स नंतर लगेचच त्याचं दर्शनही झालं. लगेच त्या बाईनी आम्हाला खिजवल्यासारखे तत्परतेनं फोटो पण दाखवले आणि दात विचकत तिच्या वाटेला गेली. त्या झोनमधले बहुतेक सगळे वाघ आपापल्या टेरिटरी बाहेर पडल्यासारखे खुणा ठेवत होते. एकदा नाल्यातून अलार्म कॉल तर एकदा गवतातून, कधी माकडं झाडावरून तर कधी एखाद्या दिशेकडे बघून. इतकं होऊन समोर काहीच येत नव्हतं. सकाळची वेळ संपत आली होती पण कॉल्स काही संपत नव्हते. अखेरीस व्हायचं तेच झालं. घडाळ्यात दहा वाजले होते. आम्ही बाहेरच्या मार्गाला लागलो होतो. पण कुठेतरी मनात होतं 'सब्र का फल मिठा होता है।'
दुपारी आमची वारी परत झोन 6 ला निघाली. इथे आल्यापासून सगळेजण या झोनचं कौतुक करत होते पण आम्हाला अजूनतरी काही समाधानकारक दिसलं नव्हतं. आज नशिबात काय वाढून ठेवलं आहे हे आजमावायला आम्ही उत्सुक होतो. तुमच्या नशिबात त्यादिवशी जर काही विशेष घडणार असेल तर भोवतालच्या गोष्टी पण तशाच घडायला लागतात. म्हणजे असं बघा की तुम्हाला जंगलात योग्य प्रकारे जिप्सी चालवणारा ड्राइवर मिळतो. अद्ययावत माहिती असलेला गाईड मिळतो, त्याला डोकं चालवता येत असतं आणि महत्वाचं म्हणजे माग काढण्याचा उत्तम सराव असतो. अगदी असाच गाईड देवकृपेने आम्हाला मिळाला आणि सफारी सुरू झाल्या झाल्या अगदी पंधरा मिनिटांतच आम्हाला पहिला वाघ दिसला. तो सुद्धा उत्तम उजेडात. उन्हामुळे हिरव्या गवतात त्याचा पिवळट रंग चांगलाच चमकत होता. तो कदाचित आसपास असणाऱ्या सांबाराच्या शिकारीच्या विचारात असावा.. निदान त्याचे पवित्रे तरी तसेच होते. सावधगिरीनं हळुवार पावलं टाकत तो आमच्या समोर येत होता आणि अचानक कसलीतरी चाहूल लागताक्षणीच तो उभा होता तिथेच बसला. काहीच वेळात दोन निराळ्या दिशांनी अलार्म कॉल्स यायला लागले. आमच्या गाईडकडून कळलं की कदाचित याची आई आणि तिचं दुसरं मेल कब  दुसरीकडून येत असेल म्हणून कॉल येत असतील आणि तसंच झालं.. त्यांची आई नाही पण काहीच अंतरावर त्याचा दुसरा भाऊ गवतात निवांत पडला होता. तोवर त्याच्या आजूबाजूला गाड्यांची फौज तयार होती. त्या कँटरमधे असलेली माणसं 'इथे का आली होती' असा विचार मनात यावी अशी होती. एका जिप्सी मधला माणूस चक्क पिऊन टाईट होऊन आला होता. इतका प्यायला होता की लांबून त्याचा दारूचा भपकारा येत होता. असो याचा इलाज आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे. काही मिनिटांतच आपल्याला बघायला बाहेर भरपूर गर्दी जमली आहे याची जाणीव होताच त्यानी आमच्याकडे एक कंटाळवाणी नजर टाकली. त्या नजरेत ' काय शिंची कटकट आहे' अगदी अशी भावना होती. कँटरमधली लोकं आपल्या बडबडीनी हरप्रकारे त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. आम्हाला वाटलं की हा आता उठेल मग उठेल पण तो तसेच कटाक्ष टाकत सगळ्यांकडे बघत राहिला आणि परत मान टाकून झोपेची आराधना करायला लागला. मग मात्र त्याचा फार अंत न बघता आम्ही तिथून काढता पाय घेतला.
रणथंबोर दिवस ४:
तिसऱ्या दिवशी झोन 6 मधे चालू असलेलं नाट्य इतक्या तुटकपणे संपुष्टात येईल याची कुणालाच कल्पना नव्हती. काल संध्याकाळी जय-वीरू आळसावत पडलेल्या ठिकाणांवर उद्या सकाळी परत येण्याचं नक्की केलं. अंगावर थर्मल, दोन पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि त्यावरचं जाड जॅकेट असून सुद्धा भल्या पहाटेची थंडी कशालाच दाद देत नव्हती. तरीही काकडत आम्ही बरोब्बर पावणे सातला गेटवर येऊन पोचलो आणि सर्वप्रथम जंगलात प्रवेश मिळवला. गेटमधून आत जाताच संपूर्ण मार्गावर कुंभा नावाच्या मेल टायगरचे पगमार्क्स दिसले. मग त्याचा माग काढत काढत आम्ही झोन 6च्या टोकापर्यंत जाऊन आलो. पण तो काही दिसला नाही... मग त्याचा नाद सोडत आम्ही जय-वीरूच्या भागात शिरलो. जसजसे आत जात होतो तसा गारठा कमालीचा वाढत होता. सूर्य वर आला तरी थंडी काही कमी होईना. रिकामटेकड्या माणसांसारखे आम्ही रानात भटकत होतो. शेवटी कशाचाच मागमूस लागत नाही म्हटल्यावर आम्ही 'पटवा बावरी' ला  वॉशरूम ब्रेकसाठी आलो. पाठोपाठ इतर जिप्सी आणि कँटर पण हजर. सगळे गाड्या सोडून वॉशरूमकडे धावले तर काही उन्हाच्या दिशेनी. लगेच सगळे गाईड जमले आणि परिस्थितीचा आढावा घ्यायला लागले. त्यांच्यात काहीतरी कुजबुज चालू झाली आणि तेवढ्यात आमचा मुकेश नावाचा गाईड हातातल्या फोनकडे बघून 'अरे ये ससुरे झोन १० मै चले गये और हम यहां झक मार रहे है! और इतना ही नही उन्होने मेन रोडपे एक गाय मारी है। टेम्पो, ट्रॅक्टर ऐसी सभी गाडीयोकीं भीड हुई है।' हे ऐकल्यावर कोणाच्याही तोंडातून काहीच निघेना. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. योजिलेलं काय होतं आणि काय झालं! ना कुंभा ना जय-वीरू. हे म्हणजे लहानपणी ऐकलेल्या गोष्टीसारखं झालं. तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं  ....
रणथंबोर दिवस ५:
सलग सहा सफारीनंतर मधे एक ब्रेक घेतला, गरजेचाच होता. अतिथंडीमुळे पक्षीच काय पण प्राणी सुद्धा गारठले होते. त्यामुळे दर्शन होणं दुर्लभ झालं होतं. पण भटका स्वभाव कुठे एका जागी बसू देतोय!! मग आसपास कुठे जाता येईल याची चौकशी सुरू केली. सहा सफारींमध्ये पक्षीदर्शन विशेष झालं नव्हतं. त्यामुळे नदी, तलाव किंवा एखादी पाणथळीची जागा पक्की केली. आमच्या हॉटेलपासून वीस किलोमीटर अंतरावर सुरेवाल लेक असल्याचं कळलं. संध्याकाळची वेळ पक्की केली. मी आणि श्रीरंग आमच्याच हॉटेलची जिप्सी घेऊन निघालो. बाहेर पडल्या पडल्या आमची शोधक नजर जिप्सीला वेगच येऊ देईना. असेच ठिकठिकाणी थांबून फोटो काढत किंवा दुर्बिण डोळ्याला लावत आम्ही त्या लेक पाशी पोचलो. या लेकला अर्धवर्तुळाकार रिंग रोड आहे, अर्थात कच्च्या रस्त्याचा. त्या अरुंद रस्त्यावरून दुचाकीवरच्या लोकांच्या शिव्या खात आम्ही पक्षी पाहात होतो. अपेक्षेपेक्षा पक्षी कमी होते पण ते पण आम्ही एन्जॉय करत होतो. तिरावरती काही बदके ये-जा करत होती, त्यातच काही पाणकोंबड्या लुडबुड करत होत्या. गल्स आणि रिव्हरटर्न सतत घिरट्या घालत होते. पाणकावळे एका निष्पर्ण झाडावर पंख पसरून बसले होते. पेरूच्या झाडावर काही पोपट कर्णकर्कश्य आवाजात फळांवर ताव मारत होते. तळ्याच्या मध्यभागी एकमेव पेलीकन संथपणे वारा येईल त्यादिशेनी जात होता. सूर्य मावळायला लागला होता. त्यामुळे अजून वेळ न घालवता आणि हॉटेलच्या दिशेनी निघालो.
रात्री आठच्या आसपास आम्ही नवीन आलेल्या ग्रुपमधल्या काही लोकांबरोबर नाईट ड्राईव्हला निघालो. रणथंबोरचा मुख्य रस्ता ते सवाई माधोपुर यांच्या मध्ये असलेल्या परिसरात काही ठिकाणी निशाचर प्राण्यांचं वास्तव्य होतं. एक असा प्राणी जो बघायला गेलं तर तसा कुरुपच पण उकिरड्यावरचा जैव कचरा साफ करण्यामागे त्याचा मोलाचा वाटा. रात्रीच्या किर्रर्र अंधारात यांचा कळप जमला की त्यांचा आवाज अंगावर काटा आणतो. एखाद्या मुलाच्या खोडकर हसण्यासारखा त्यांचा आवाज असतो. असा हा कुरूप पण निसर्गाचा सफाई कामगार म्हणजेच तरस (Hyena) बघायला आम्ही अंधारात घुसलो. फार रक्त न आटवता त्यानी गावाबाहेरच्या एका उकिरड्यावर आम्हाला दर्शन दिलं. एका नाल्यावर असलेल्या पुलावर आम्ही उभे होतो. गावकऱ्यांनी टाकलेल्या पोल्ट्री वेस्टवर हे तरस ताव मारत होते. फोटो काढण्यासाठी म्हणून गाडीचा हेडलाईट त्यादिशेनी फिरवला, तसे ते सावध झाले पण त्यामुळे फोटो मात्र चांगले मिळाले. त्या गर्दीतच एक जंगल कॅटपण घुसण्याचा प्रयत्न करत होती. पण तरस तिला फारशी दाद देत नव्हते. गाडी थोडी पुढे आल्यावर एक तरस विरुद्ध दिशेनी पळू लागले. पण त्याच्या मागच्या आखूड पायांमुळे त्याला फारसं वेगात पळताही येत नव्हतं. आम्ही त्याचा पाठलाग करण्याच्या भानगडीत पडलो नाही. जमतील तेवढे फोटो काढले आणि दुसऱ्या दिवशीच्या सफारीचे आराखडे बांधत हॉटेलवर पोचलो.
रणथंबोर दिवस ६:
थंडीचा कडाका प्रत्येक दिवसागणिक वाढत होता. आमचा दुसरा अठरा जणांचा ग्रुप आला होता. यासगळ्या लोकांना एकत्र सफारीला घेऊन जायचं होतं, त्यामुळे आजच्या दोन्ही सफारी कँटरनी करायच्या ठरल्या. आधीच्या ग्रुपबरोबर सफारी करत असताना इतर कँटरचे आलेले अनुभव फारसे बरे नव्हते. पण आता तशाच कँटरमधे आम्हाला त्या ग्रुपला घेऊन जायचं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही आमच्याकडून सगळ्या सूचना आधीच देऊन ठेवल्या होत्या. झोन ६ ला सफारी सुरू झाली. पण आधीच मिळालेल्या माहितीनुसार जय-वीरू आणि त्यांची आई 'लाडली' झोन १० मधून परत आलेले नव्हते त्यामुळे सायटिंग बद्दल साशंकता होतीच आणि झालंही तसंच. ना कॉल्स ना पगमार्क्स अशा प्रचंड शांततेत पहिली सफारी पार पडली.
दुपारची सफारी झोन ४ मधे होती. कँटरमधे चढता चढताच गाईडनी ड्रायव्हरला एका जागेच नाव सांगत गाडी तडक तिथेच घ्यायला सांगितली. आज सकाळी त्याच ठिकाणी कृष्णा आणि तिची पिल्लं दिसली होती. त्या गाईडला ९५% खात्री होती ती परत दिसण्याची. लगेच ग्रुपमधल्या मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. फार वेळ न दवडता आम्ही मोजके थांबे घेत घेत आज सकाळी झालेल्या ठिकाणी येऊन पोचलो. बऱ्यापैकी वरच्या ठिकाणावर आम्ही पोचलो होतो. अगदी टोकाशी आमचा कँटर आणून टेकवला होता. पण त्याठिकाणाहून तिनी आपल्या पिल्लांना हलवलं होतं. एक जरी कॉल त्यावेळेला आला असता ना तरी वाघाचा माग काढणं सोपं गेलं असतं. आमचा गाईड अक्षरशः जंगजंग पछाडत होता. आम्ही बऱ्याच वाटा उलटसुलट जाऊन तपासल्या पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. शेवटी आम्ही परतीची वाट धरली. वाटेवर असताना अचानक सांबरांचे कॉल्स यायला लागले पण आता थांबणं शक्य नव्हतं. बहुतेक कृष्णा तिच्या पिल्लांबरोबर बाहेर पडली होती..
रणथंबोर दिवस ७:
झोन ४ मधला हातातोंडाशी आलेला घास निसटल्यानंतर रणथंबोरला आत्तापुरता रामराम केला. सवाई माधोपुर पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर राजस्थान-मध्य प्रदेश बॉर्डरजवळ चंबळ नदीचं पात्र लागतं. ह्या चंबळच्या पात्रात मगरी आणि सुसरींचं वास्तव्य आहे. तशा मगरी बऱ्याच ठिकाणी पाहिल्या आहेत पण सुसरी मात्र कधीच पाहिल्या नव्हत्या. त्यामुळे टायगर सफारीनंतर सुसरी पाहण्याचा योग्य आम्ही जमवून आणला. सफारीसाठी झोन ६ पर्यंत आम्ही जातच होतो, त्याच झोनच्या पुढे झोन नंबर ७, ८, ९ आणि १० संपल्यानंतर हाच रस्ता चंबळला जातो. सुसरींच्या बरोबरीनं काही स्थलांतरित पक्षी मुख्यत्वे बदकं पण आलेली असण्याचा संभव होता. नवीन काहीतरी पाहायला मिळणार म्हणून सर्वांचा उत्साह वाढला होता. पण तो उत्साह तिथवर नेणाऱ्या रस्त्यानी पूर्णपणे घालवला. कधी एकदा घरीयाल  संचुरीला जाऊन पोचतो असं झालं होतं. रस्ताची जरी बिकट अवस्था असली तरी आजूबाजूचा प्रदेश उत्साहवर्धक होता. दोन्ही बाजूस सारसों आणि गेहूची शेतं. पिवळ्याधमक फुलांनी फुललेल्या सारसोंच्या शेताचा फोटो काढण्याचा मोह कुणालाच टाळता आला नाही. शेवटी दीड तासानी आम्ही चंबळच्या बोट राईड पाशी आलो. दोन बोटीत समसमान माणसं विभागून आम्ही निघालो. लगेचच आम्हाला मगरी दिसायला लागल्या आणि त्याही बोटीच्या जवळ. काही तीरावर ऊन खात पडल्या होत्या तर काही पाण्यातच होत्या. त्यांचे फोटो काढत असतानाच चालकानी त्याचं स्वतःचं बोट आणि पाण्यातली बोट असं दोन्ही एकाच दिशेला फिरवलं. दोन सुसरी एका दगडावर सुस्तावत पडल्या होत्या असं वाटत असतानाच आमची बोट जवळ येते म्हटल्यावर त्या विजेच्या चपळाईनं पाण्यात घुसल्या. मला साधा रेकॉर्ड शॉट सुद्धा मिळाला नाही. मग तिथून पुढे निघालो तर परत त्या चालकानी पाण्यात आडवी चाललेली सुसर दाखवली. वर असंही म्हणाला की 'ये मेल अलिगेटर है, सबसे बडीवाली। ये ज्यादा कभी दीखती नही।' म्हणजे थोडक्यात आम्ही नशीबवान आहोत असं त्याला म्हणायचं होतं. त्या सुसरीचा फोटो मात्र मस्त आला. लांबच लांब एखादा लाकडाचा ओंडका पाण्यात वाहत जावा तशी ती दिसत होती. मधूनच वर आलेले बटबटीत डोळे आणि परत काही अंतर सोडून वर आलेलं तिचं नाक. एकंदरीत मजा आली पण फोटो काढताना. पण ती सुसर पण आमची चाहूल लागताच खाली पाण्यात गेली. बोंबला... पूर्ण सुसर दिसणार आहे की नाही?? मी मनात म्हणालो आणि इतक्यात आमची बोट एका छोट्याशा वाटणाऱ्या बेटाच्या दिशेनी निघाली. संपलं बहुतेक सगळं.. आज आपल्या नशिबात फोटो नाही असं वाटतंय ना वाटतंय तोच समोर तीन ते चार सुसरी पडलेल्या दिसल्या. लांबून जे बेट वाटत होतं ते बेट नव्हतंच. काही पाणवनस्पती आणि या सुसरी यांना एकत्र पाहिल्यामुळे तसं दिसत होतं. आम्ही जवळ येत गेलो तशी लगेच त्यातली एक पाण्यात गेली, तरी तीन होत्या. त्यात पण दोन पिल्लं होती आणि शेजारी त्यांची आई. त्यांना आमचा काही त्रास होत नव्हता. फोटोसाठी त्यांनी खूप सहकार्य केलं. अथक परिश्रमानंतर जंगलात वाघ दिसल्यावर कसं होतं अगदी तसाच अनुभव होता हा. आम्ही तृप्त मनानी आणि भरलेलं SD CARD घेऊन नदीतून बाहेर पडलो.
हॉटेलवर आलो तर इथे ख्रिसमस आणि नववर्षाप्रीत्यर्थ रोषणाई केली होती. काही राजस्थानी लोकं त्यांचा लवाजमा घेऊन खास त्यांच्या शैलीतले गायन वादन करणार होते. दोन मोठ्या शेकोट्यांची तयारी केली होती. जेवणात पण नक्कीच  काहीतरी खास असणार. आता ही आजची इथली शेवटची रात्र. रणथंबोरचा हा सात दिवसांचा प्रवास आज संपला. इथून पाय निघत नाही असं लिहून टिपिकल शेवट करणार होतो पण खरं सांगू!... घरची आठवण..वगैरे!! काही नाही हो... थंडी सहन होत नाहीये इथली !
धन्यवाद

Powered by Blogger.