ताडोबा २५ डिसेंबर १७

ताडोबा कोलारा गेट. जामनी लेक जवळचा परिसर. आधीच्या दोन्ही सफारीनी हातावर नारळ ठेवल्यामुळे खातोडा गेट वरून जामनीला जाताना आमच्या खूप अपेक्षा होत्या. दुसऱ्या ग्रुपला पहिल्याच सफारीला वाघ आणि बिबट्या नी दर्शन दिलं होतं त्यामुळे त्यामुळे आपल्याला वाघ कधी दिसेल याचेच विचार सगळ्यांच्या मनात होते. लेकच्या दिशेनी जात असताना आमचा गाईड सांगत होता कि छोटी तारा आणि तिची पिल्लं सध्या इकडेच आहेत. कालच्या सफारीला तारा आणि पिल्लं दिसली पण होती. संध्याकाळचा साडे चारचा सुमार. सोनेरी उन्हं पसरायला लागली होती. एका पाठोपाठ एक अशा पंधरा गाड्या कडेला उभ्या होत्या. काही जण शांतपणे आणि आतुरतेने डोळे लावून बसले होते तर काही लोकांना कसलीच जाणीव नव्हती. तिथेही काही लोकं फालतूपणा करण्यात रमले होते. कधी मोठ्यांदि हसण्याचे आवाज यायचे तर कधी लहान मुलाचं रडणं ऐकू यायचं. या सगळ्याकडे जमेल तितकं दुर्लक्ष करून आम्ही समोर पाहात बसलो होतो. आज मी नेमकी दुर्बीण घ्यायची विसरलो होतो. त्यामुळे मी लेन्स मधून बघत होतो. आमच्या मागे मोहरली गेटची एक गाडी होती. इतका वेळ ते शांतपणे उभे होते. ते अचानक वाघ वाघ असं काहीतरी बोलायला लागले. आम्हाला वाटलं कि उगाच काहीतरी चाललं आहे. पण त्यातल्याच एकानी माझी झूम लेन्स बघून लांबवर बोट केलं आणि मला सांगितलं कि अहो त्या पांढऱ्या पक्ष्याच्या उजव्या बाजूला बघा. एक वाघ गवताबाहेर पाय काढून झोपला आहे. मी लगेच कॅमेरा डोळ्याला लावून पाहिलं तर खरंच एका शराटी (Black headed ibis) पक्ष्याच्या उजवीकडे वाघाचा एक पाय दिसत होता. मनात म्हटलं ‘पाय तर पाय’ फोटो तर काढून घेऊ. पण आमचं नशीब जोरावर होतं बहुतेक त्यादिवशी. मी तसाच कॅमेरा रोखून उभा होतो. बघता बघता त्यानी डोकं वर उचललं आणि जांभया देऊन तो वाघ टेहळणी करायला लागला. जसा तो सोनेरी उन्हात चमकायला लागला तशा सगळ्या गाडीतल्या लोकांच्या आशा वाढल्या. एकेक दमदार पावलं टाकत तो खुल्या मैदानाच्या दिशेनी जायला लागला. पाठोपाठ हरणांचे alarm calls यायला लागले. पदन्यास करत तो परत गवतात गडप झाला. मोहरलीच्या गाड्या ‘ चलो अब वो बाहर आनेवाला नही है| वैसेभी पांच बज चुके है|’ असं म्हणत जायला लागल्या. आम्ही कोलारा गेटवरून आलेलो असल्याने आम्हाला अजून वेळ होता. एव्हाना बऱ्याच gypsy गेल्या होत्या आणि अचानक तोच वाघ त्या गवतातून पलीकडच्या मैदानात जाताना दिसला. आमची तोंड खरकन उतरली कारण तो बराच दूर निघून गेला आणि पलीकडे एका छोट्या डबक्यात जाऊन बसला. दिसत होता पण खूप दूर. इतका वेळ सीटवर पाय ठेवून उभे राहिलेले आम्ही सर्व गपगुमान खाली बसलो. पण लगेच दुसऱ्याच क्षणी अगदी जवळच्या गवतात चुळबुळ झाल्यासारखी वाटली आणि बघतो तर तिथे अजून एक वाघ काहीतरी शोधत होता. आधी फक्त भिरभिरणारी शेपुटच दिसत होती. हळूहळू त्याच्या हालचालींमुळे तो पुढे येऊ लागला. हा वाघ अक्षरशः त्या मैदानात बागडत होता. खाली एका खड्यात सतत पाय घालून काहीतरी बाहेर काढायच्या प्रयत्नात होता. त्याची हि लगबग त्या पलीकडच्या वाघानी पहिली. तो डबक्यातून उठला आणि झपाट्यानं या वाघाच्या दिशेनी यायला लागला. या आमच्या जवळच्या वाघाच्या बाळलीला चालूच होत्या. अखेरीस बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला त्याची शिकार गवसली होती. त्याच्या हाती एक मुंगुस सापडला होता. एखाद्या चेंडूप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागला. याचे चाळे चालू असताना तो डबक्यातला वाघ हळूच दबा धरून याच्या दिशेनी झेपावला आणि त्या मुन्गुसावरून त्या दोघांची चांगलीच जुंपली. नंतर आलेला वाघ तो पकडलेला मुंगुस पकडू पाहात होता. या दोघांच्या खेचाखेचीत, दात आणि नखं लागून मुंगुस आधीच गतप्राण झाला होता. त्यामुळे त्या शवाबरोबर त्यांची मस्ती चालली होती. सूर्य मावळला होता. आहे त्या प्रकाशात कॅमेऱ्याची विविध settings करून त्यातल्या त्यात बरे फोटो काढण्याची माझी धडपड चालूच होती. फोटो काढू कि ते क्षण डोळ्यात साठवू हेच कळत नव्हतं. मला ते ठरवताचं येत नव्हतं. मग शेवटी सुर्यानीच ते मनावर घेतलं, होता नव्हता तो उजेड पण कमी झाला. आता फोटो काढण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून मी कॅमेरा खाली ठेवून तो नजारा डोळ्यात साठवू लागलो. असं वाटत होतं कि हे जे समोर नाट्य चालू आहे ते कधी संपूच नये. खेद एकाच गोष्टीचा वाटत होता तो म्हणजे या दोन वाघांच्या खेळामध्ये त्या मुंगसाच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती. शेवटी आमच्या चालकानी गाडी सुरु केली. गाडी पुढे जात होती पण मन त्या मैदानातून बाहेर यायला तयारच नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी कोलाराहुनच आमची सफारी होती. सफारी सुरु केल्यापासून अगदी तासाभरातच calls यायला लागले होते. ताडोबा लेक ते पंचधारा या भागात एका male tiger मटकासुरचे pugmarks दिसत होते. त्यामुळे सगळ्या gypsy त्याचं भागात जात येत होत्या. नेहमीच्या मत्स्यघुबडाच्या पंचधाराच्या चौकात काही गाड्या आपापसात बोलत उभ्या होत्या. आमचा अमर नावाचा गाईड होता. त्याला एकानी विचारलं कि तू hilltop भागात pugmarks चेक केलेस का? अमरनी नकारार्थी मान डोलावली आणि त्यादिशेनी गाडी वळवली. तोपर्यंत आम्ही ऊन खात बसलेल्या घुबडाचे फोटो काढत होतो. इथे या मत्स्यघुबडाचं (Brown fish owl) हमखास दर्शन होतं. आम्ही ताडोबा तलावाच्या दिशेनी निघालो. आमच्या डाव्या हाताला तलाव होता. तिथे एक मोठी मगर निवांतपणे पहुडली होती. आणि अचानक अमर लेपर्ड लेपर्ड म्हणून ओरडला. एक मध्यम आकाराचा बिबट्या चक्क रस्ता क्रॉस करून चढावर चढत होता. काही मिनिटांचा उशीर झाला म्हणून उदास झालो आणि पुढे तलावाच्या दिशेनी गेलो. तिथे काही पक्षी बघत उभे होतो. इतक्यात मागून अजून एक गाडी आली. त्यांनी काही चौकशा केल्या आणि आपल्या मार्गाला लागले. आम्ही u turn घेऊन परत पंचधाराला निघालो. जास्त नाही फारतर २०० मीटर गेलो असू तर डाव्या हाताला एक छोटा चढ चढून काहीतरी येताना दिसलं. आमच्यातला अद्वैत म्हणाला, इथे माणूस कसा काय आला? असे तो म्हणतोय तोच आम्हाला स्पष्ट दिसलं कि तो बाकी कुणी नसून तोच मगाचचा बिबट्याचं होता. तोंडात मुंगुस पकडून फरपटत घेऊन जात होता. आम्ही आहे तिथेच गाडी थांबवली आणि आता तो काय करतो ते पाहायला लागलो. तो आपली शिकार घेऊन अजूनच झाडीत शिरला. आम्ही अनुमान लावला कि त्यांनी आधीच शिकार केली असणार आणि मगाशी आपली चाहुल लागली म्हणून शिकार तशीच टाकून तो गवतात किंवा झाडीत लपून बसला असावा. आम्ही पुढे आल्यावर तो आपली शिकार घ्यायला परत आला आणि रस्त्यावरून खेचत परत झुडपात जात असावा. अगदी त्याचं वेळेला तो आम्हाला शिकारीसकट दिसला. फोटो जास्त नाही काढता आले पण नेत्रसुख मात्र खूप छान मिळालं. हे exclusive sighting बघण्याचं भाग्य फक्त आमच्या गाडीच्या नशिबात होतं. पंचधारा जवळ जमलेल्या इतर गाड्यांमधल्या लोकांना आम्ही जेव्हा हे सांगितलं तेव्हा त्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली होती. सगळे माझ्या आणि माझ्या लेन्सकडे बघून ‘ फोटो मिला.. फोटो मिला?’ असं विचारत होती. मग एकदाचा फोटो दाखवल्यावर परत सर्वांची तोंड पडली. अशा वेळेला उगीचच आपल्याला वाटत कि आपणकाहीतरी भारी काम केलं म्हणून. वास्ततिक त्यात आपलं कौतुक काहीच नसतं. आमची गाडी सोडून इतर सर्व गाड्या मटकासुर बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच आमच्या पदरात मात्र चांगलंच दान पडलं होतं.
Powered by Blogger.