गोल्डी

गोल्डी
बाप जन्मात कधी वाटलं नव्हतं कि मी कधी मांजर पाळीन. काय पण योग असतात पहा, एके काळी मांजर दिसलं कि त्याच्या मागे इतक लागायच कि परत त्यांना माझ्या घराच्या आसपास येताना दहावेळा विचार करावा लागेल. मग तो माजलेला बोका असो किंवा लहान पिल्लू असो. या प्रजातीवर माझा तसा राग काहीच नसायचा, पण उगाच चाळे. अल्लड वय.. दुसरे काय.. माझ्या बाबांना मात्र भयंकर लळा होता मांजरांचा. फक्त मांजर नव्हे तर संपूर्ण प्राणी जातीचा. त्यामुळे आम्ही कोणीही घरात नसताना बाबा दुपारी मांजराना दुध पाज, मारीची बिस्कीट दे असले प्रकार करायचे. तेव्हा समजा तिथे मी आलो कि मीपण प्रेमाने हात लाव, कान ओढ, शेपूट पिरगाळ असे उद्योग करायचो. तेव्हा बाबा म्हणायचे “ अरे नको रे नको त्रास देऊन त्यांना “ मग मलाही वाटायचा कि आपण हे उगीच केल. उभ्या आयुष्यात त्यांनी कधी हात उगारला नव्हता आमच्यावर. आता वाटत कि माझी आत्ताची हि आवड ( प्राणी, पक्षी, झाडे, फुले ) आहे ती थोडी आधी बाहेर आली असती ना तर बाबांना धन्य धन्य झालं असत. हे सगळं सांगायच कारण एवढंच कि आमच्याकडे घरी प्राणी पाळणे हा प्रकार अस्तित्वात नव्हता. पुढे मी पुण्यात स्थायिक झालो, लग्न झालं. छान चालू होतं आमचं. आठवड्याचे पाच दिवस खूप काम करायचं आणि शनिवार रविवार मस्त धमाल करायची. रविवारचा तर प्लान ठरलेला असायचा. सकाळी pattice खायचे TV बघत बघत. नंतर निवांत आवरून बाहेर जे गायब व्हायच ते संध्याकाळीच यायच. कारण घरी वाट बघणार कोणीच नव्हतं.
असाच एक रविवार. १३ मे २००७. ठरल्याप्रमाणे pattice आणायला सकाळी सकाळी बाहेर पडलो. कायम bike घेऊन जाणारा मी काहीही कारण नसताना car घेऊन बाहेर पडलो. ना तेव्हा पाऊस होता ना bike नादुरुस्त होती. सगळा नशिबाचाच खेळ. दुसरं काय म्हणणार... बेकरी मध्ये पोचलो, pattice घेतले आणि निघालो घरी जायला. मस्त सकाळ होती. मी माझ्याचं धुंदीत गाडी चालवत होतो. अचानक माझ्या गाडीखाली काहीतरी येतंय असं मला वाटलं. मी करकचून ब्रेंक मारला. खाली उतरून बघतो तर काय... पुढच्या चाकाच्या खाली एक मांजराचे पिल्लू येता येता वाचले होते. मी खाली वाकून ते पिल्लू हातात घेतले. इकडे तिकडे पाहिलं कि त्याची आई कुठे आहे का.. काही खाणाखुणा सापडतात का.. पण काही सापडेना. तिथे काही मुली खेळत होत्या त्यांना विचारावं तर त्याच माझ्या तोंडाकडे पाहात उभ्या. बर हे पिल्लू सोडावं तर कुठे सोडावं.. काहीच कळेना. बर आहे तिथेच सोडावं म्हटलं तर ते जमेना आता. आत्ताच गाडीखाली येता येता वाचलंय. त्यातून ते इतकं मरतुकड होतं कि तिथेच ठेवून गेलो असतो तर ते नक्कीच मेलं असत. आता आली कि पंचाईत. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत झाली माझी. एक होतं बाकी मरतुकड असलं तरी देखण होतं. मस्त सोनेरी रंगाचं होतं. मग विचार केला कि आपण सध्या तरी त्याला घरी घेऊन जाऊ. नंतर बघता येईल काय करायचं ते.. तसंही ऋजुताला मांजर फार फार आवडायची. car होती बरोबर त्यामुळे न्यायच कसं हा प्रश्न नव्हता. bike असती तर नेता आलंच नसत. मग मी अजून तिथे वेळ न दवडता त्याला घरी घेऊन आलो. Doorbell वाजवली तर ऋजुता किंचाळलीच ते मांजर पाहून. माझ्या एका हातात pattice आणि दुसर्या हातात मांजर. तिला ते पिल्लू खूपच आवडलं. होतच ते आवडण्यासारखं.... घरी या आधी कुठलाही प्राणी न आल्यामुळे खायला काय द्यायच हा प्रश्नचं होता. मांजर दुध पीत हे माहित असल्याने दुघ देऊन पहिल. पण बहुतेक ते बरेच दिवस उपाशी होतं म्हणून ऋजुतानी droper नी त्याला गरम पाणी घालून पातळ करून दुध पाजलं. त्यानंतर ते झोपलं. आणि मग पुढचे दोन दिवस आम्ही सतत त्याच्याच मागे. ते पण आमच्या बरोबर रमू लागलं. रात्री बेरात्री ते भूक लागली कि ओरडत असे. मग रात्री परत तोच droper चा उद्योग. पण माहित नाही का कोण जाणे आम्ही हे सर्व enjoy करत होतो. पण हे असं कुठवर चालायचं. आपण त्याला कायम सांभाळणार आहोत का? तो पर्यंत आम्हाला दोघांना त्या मांजरांनी इतकं लळा लावला होता कि तेव्हा तरी त्याला कुठेतरी सोडून द्यावे हा विचार सुद्धा मनाला चुटपूट लावणारा होता.
अचानक आम्हाला एक छान कल्पना सुचली. आमचा एक मित्र होता. त्याचे घर कोकणामध्ये होते, राजापूर मधे. त्याला विचारलं कि तुला हे मांजर हवे आहे का म्हणून. जर हवे असेल तर त्याला राजापूर पर्यंत सोडायला पण आम्ही येऊ. तो एका पायावर तयार झाला आणि म्हणाला आपण जर याला गाडीनी घेऊन जाणार असू तर माझ्या इथल्या पुण्याच्या वाड्यात अजून ३ मांजरे आहेत. त्यांनाही घेऊन जाऊ. मी म्हटलं ठीक आहे. दिवस ठरला. पहाटे निघायचं ठरलं. आम्ही पण असा विचार केला कि या पिल्लाला पण चांगल घर मिळेल. आम्हालाहि कुठेतरी परक्या ठिकाणी सोडल्याचा त्रास होणार नाही. तर अस ठरवून आम्ही तिघंजण निघालो. तीन माणसे आणि ४ मांजरे.
साधारण ७ तासांनी आम्ही राजापुरला पोचलो. चारही मांजरांना एका खोक्यामध्ये ठेवलं होतं. पूर्ण प्रवासामुळे ती मरगळली होती. सर्वांना दुध आणि पोळी दिल्यावर ती ताजीतवानी झाली. एकमेकांशी मस्त खेळू लागली. मनात आले कि बर झालं यांना सुद्धा सोबत झाली. आमचा मुक्काम फार दिवसांचा नव्हता. जेमतेम एक रात्र राहून आम्ही निघणार होतो. म्हणून आदल्या दिवशी पाय मोकळे करायला म्हणून आम्ही तिघे बाहेर पडलो. आठवड्याच्या बाजारात फिरलो. नंतर मिसळ खायला एका हॉटेलात गेलो. असं मस्त फिरून तीन साडे तीन तासांनी घरी परत आलो. चप्पल काढून जरा टेकलो असेल तोच आमचं ते मांजराच पिल्लू आतून कुठूनतरी धावत आलं आणि अक्षरशः पायाशी लोटांगण घातलं. माझ्या डोळ्यात चटकन पाणी आलं. जणू काही त्याला कळल कि मी उद्या पहाटे पुण्याला जाणार आहे. एखादं लहान मुल जसा हट्ट करत ना.. अगदी तस्सच.. शेवटी मी त्याला उचलून हातात घेतलं आणि घेतलं ते कायमचंच. मी सांगून टाकलं आता मी याच्याशिवाय राहू शकणार नाही. आपण याला परत पुण्याला घेऊन जाणार आहोत. नक्कीच करून टाकलं. बायको पण माझ्याकडे पाहताच राहिली. कारण हे तिला माझ्याकडून अजिबात अपेक्षित नव्हतं.
किती विचित्र आहे बघा न विचार करून.. रस्त्यात एक मांजर मिळते काय... त्याला घरी घेऊन येतो काय... त्याला चांगलं घर मिळावे म्हणून काही हजाराचं पेट्रोल खर्च करून इतक्या लांब येतो काय.. आणि आता काय.. इतक्या लांब येऊन त्याला परत पुण्याला घेऊन जायचं. मग एवढी खटपट केली कशाला?? पण या सगळ्या गोष्टी धुडकावून लावल्या. मला फक्त एकच कळत होतं कि आता मला याच्या शिवाय जगणं अशक्य आहे. तीन पिल्लं तिथे ठेवून दुसर्या दिवशी परत पहाटे पुण्याच्या दिशेनी निघालो. दर दोन तासांनी ते पिल्लू दुधासाठी ओरडत असे. आम्ही सर्व तयारीनिशीच निघालो होतो. त्यामुळे येताना काहीही त्रास नाही झाला. पुण्यात आल्यावर ऋजुता म्हणाली आधी याला आपण डॉक्टर कडे घेऊन जाऊ. मग एका मित्राकडून Veterinary doctor चा पत्ता घेऊन तिथे गेलो. doctor नि पाहिल्या पाहिल्या एकचं प्रश्न विचारला. कितीला घेतलंत हे पिल्लू? मी म्हटलं, छे हो विकत कुठलं घेतोय. गाडीखाली येता येता वाचलंय ते. त्यांचा आधी यावर विश्वासच बसेना कि हे पिल्लू रस्त्यात सापडलं म्हणून. शेवटी त्यांना सगळं सांगितल्यावर त्यांचा विश्वास बसला. ते म्हणाले “ तुम्ही नशीबवान आहात म्हणून हे असलं Breed cat तुम्हाला मिळालं. बाहेर विकत घ्यायला गेलात तर किमान दहा ते बारा हजारा शिवाय मिळायचं नाही. आवड असेल तर खरंच तुम्हीचं पाळा हे. “ आम्ही दोघंही ताड्कन उडालोच हे ऐकून. काय करावं काही कळेना. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे ते फारतर २० दिवसाचं होतं. बरेच दिवस उपाशी होतं. इतकं बारीक कि हाडे दिसायची त्यावेळेस. मग सगळे सोपस्कार उरकून आम्ही घरी आलो. इथे आल्यावर त्याचे “ गोल्डी “ असे नामकरण झाले. पुण्यातले घर गोल्डी ला ओळखीचे होतेच. त्यामुळे त्याला रुळायला वेळ नाही लागला.
पहिले वीस दिवस हालाखीचे काढल्यावर मात्र गोल्डी च्या आयुष्यात राजयोग होता म्हणायचा. खायला imported फूड, झोपायला छान गाडी आणि भरपूर लाड. पण खरच काय नशीब घेऊन जन्माला आला होता गोल्डी कुणास ठाऊक. त्याकडे पाहिलं कि कायम मला काही प्रश्न पडतात. मला ज्या दिवशी हा भेटला त्या आधी यानी काय काय भोगले असेल, सोसले असेल. काय खाल्ले असेल. याची आई कोण असेल.. आता या प्रश्नांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. माझ्या नशिबात गोल्डी आणि गोल्डी च्या नशिबात मी हे विधीलिखित होतं का... मी भेटलो नसतो तर याचं काय झालं असतं... नक्कीच हा माझा मागच्या जन्मीचा कोणीतरी आहे. आता फॅमिली  मेंबरच म्हणा ना.
गोल्डी सापडला तेव्हा मला मांजर कुळातल्या इतर जमातींची फारशी आवड नव्हती. पण आता मी जेव्हा जंगलामधून घरी परत येतो तेव्हा वाटतं देवानी या करताच मांजर घडवले असावे म्हणजे वाघ पाळण्याची आवड त्यातल्या त्यात पूर्ण करता येईल. दुधाची तहान ताकावर... दुसरं काय.
Powered by Blogger.