टिपेश्वर
टिपेश्वर :
एप्रिलमधे एका मैत्रिणीचा फोन आला आणि म्हणाली माझ्या मुलाला फक्त वाघ बघायचाय आणि तोही याचं सुट्टीत. आता ताडोबाला जाऊ सांगावं तर बुकिंग मिळणं अवघड होतं. मग म्हणालो तुला वाघ बघायचा आहे ना तर मग तू फक्त तारखा नक्की कर, बाकी सगळं माझ्यावर सोड. मे महिन्यातली तारीख ठरली, नशिबानी ट्रेन आणि सफारी बुकिंग पण मिळालं आणि मे मधल्या कडाकण्या उन्हात आम्ही विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर अभयारण्यात जायला निघालो.
धामणगावला उतरल्या बरोबरच आम्हाला तिथल्या उन्हाच्या चटक्याची जाणीव झाली. इतके तास एसी मधून प्रवास केल्यामुळे तो तडाखा चांगलाच जाणवत होता. यवतमाळ शहरात गेल्यावर तिथल्या एका दुकानातून नुकत्याच कढईतुन काढलेल्या खव्याच्या जिलब्यांवर ताव मारला आणि टिपेश्वरच्या वाटेला लागलो. तिथे पोचेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले होते. दुसऱ्या दिवशीपासून सफारी सुरु होणार होत्या. संध्याकाळचा चहा घेत असताना तिथला एक माणूस म्हणाला, इथून अद्यापतरी एकही माणूस वाघ न बघता गेलेला नाही. त्यामुळे त्याचं दर्शन अगदी १००% धरा तुम्ही. सूर्य खाली गेला होता तरी हवेतला उकाडा काही कमी व्हायला तयार नव्हता.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सफारीला आमची सुरवात झाली. दीडशे स्क्वे. किमीचं हे जंगल. सध्या तरी बहुतेक झाडांची पानगळ झालेली होती. पण जंगलात तेंदू, महुआ, पळस, सालई, मोई, धावडा, सागवान अशा झाडांची रेलचेल होती. सुरवातीला हवा जरा बरी वाटत होती पण अगदी थोडाच वेळ. साडे आठ-नऊच्या सुमारास हवेतला गरमा परत वाढायला लागला. वास्तविक इतक्या गरमीमधे वाघ पाण्यात बसून राहतात पण पहिल्या सफारीला आम्हाला फक्त एका वाघीणीचं मुखदर्शनचं झालं. ती बरेच तास पाण्यातच बसून होती. फोटो मिळाले खरे पण जरा लांबूनच. खरी मजा आली ती मात्र दुसऱ्या सफारीला.
आम्ही दुपारी तीन वाजता सफारीला निघालो. त्यानंतर सुमारे दीड तास आम्ही फक्त इकडून तिकडे भटकत होतो. त्या दीड तासांत घुबडं, रातवा आणि जंगल कॅटचं सुरेख दर्शन झालं. साधारण पावणे पाचच्या आसपास कुठल्याशा पक्ष्याच्या बाबतीत बोलत असताना अचानक समोरून एक वाघ रस्ता ओलांडून जात असताना आम्ही पाहिला. कुठलाही अलार्म कॉल नसताना समोर आलेला वाघ बघून सगळेजण ताड्कन उभे राहिले. पण तो वाघ फार काही वेळ थांबला नाही, फोटो मिळाले पण ते मागून. ' श्या.. टायगर मिस झाला!' असे उद्गार प्रत्येकाकडून आले. मग टायगर जिथून क्रॉस झाला तिथे गाडी थांबून आम्ही कॅमेरा आणि दुर्बीण घेऊन बघायला लागलो. आमच्या डाव्या हाताशी एक पाणवठा होता. कदाचित तो वाघ शिकारीच्या नादात आत गेला असावा कारण तिथून पुढे झालेली हरणांची पळापळ आम्ही पाहिली होती. आता काही हा परत येत नाही असं आम्ही म्हणत असताना मात्र गाईड आणि ड्रायव्हर त्याच्या परतण्याकडे डोळे लावून बसले होते. या काही रोमांचकारी क्षणांनंतर परत शोधकार्य सुरु झालं आणि उजवीकडच्या गवतात गेलेला वाघ परत येईल याची शाश्वती नसल्यामुळे झाडून सगळे त्या पाणवठ्याकडे बघत बसले. आत्ता येईल मग येईल असं वाटण्यात काही मिनिटं गेली आणि अशा शांततेत वाट बघत असतानाच तो आत गेलेला वाघ आमच्या जिप्सीच्या उजव्या बाजूला हजर आणि आम्हाला कोणाला काहीच पत्ता नाही. ड्रायव्हरनी सहज मान फिरवली तर शेजारच्या गवतात वाघ.. त्यानी अधीरतेनं आम्हाला सांगितलं,' ओय तेरी, ये देखो ये यहांसे आ गया | मैने कहा था ना ये वापस आयेगा .' सगळ्यांच्या माना बाटलीच्या बुचासारख्या उजवीकडे वळल्या. बघतो तर काय, आमच्यापासून काही फुटांवर येऊन तो वाघ आमच्यावर गुरकावत उभा होता. कारण आमची गाडी बरोब्बर त्याच्या आणि त्या डबक्याच्या मधोमध उभी होती. मग तो तसाच फिसकारत आमच्या गाडीला वळसा घालून त्या डबक्यात जाऊन पहुडला. हे दृश्य फक्त आणि फक्त आमच्या नशिबात होतं. आमच्या व्यतिरिक्त अन्य एकही जिप्सी तिथे नव्हती. मग गाईडकडून असं कळलं कि जंगलातल्या मारेगाव गावच्या परिसरात वावरणाऱ्या एका मादीच्या तीन बछड्यांपैकी हे एक होतं. साधारण अठरा महिन्याचं. दोन वर्षांच्या आसपास जरी वय असलं तरी चेहऱ्यावरच्या अवखळ भावांवरून ते पिल्लू आहे हे सहजी कळत होतं. त्यानंतर पुढे एक ते सव्वा तास आमच्या समोर मनोरंजनाचा जणू काही पेटाराच उघडला गेला होता. अठरा महिन्याचा तो बछडा पाण्यात यथेच्छ डुंबत होता. आपल्या घरातलं पाळीव मांजर जितका बावळटपणा करून दाखवेल तितकाच हा वाघ पण करून दाखवत होता. कधी तो पाण्यात कोलांटीउडी मारत होता तर कधी उगाचच दबा धरत होता. नाकात पाणी गेल्यावर जोरात मानेला हिसडा देऊन नाक मोकळं करत होता, मधूनच पाठीवर उताणं पडून स्वतःचेच पंजे चाटत होता, डबक्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत होता, मधूनच आमच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता. पण त्या डोळ्यात कुठेही जरब नव्हती.. होती ती फक्त मस्ती. स्वतःच्याच दुनियेतली. आम्ही मनसोक्त फोटो काढत असताना एकदम त्यानं दबा धरला आणि शक्य तितका चपटा होऊन आपलं शरीर पाण्यात दाबू लागला. नजर एकटक समोरच्या गवतात. आम्ही पण त्या दिशेला बघायला लागलो तर त्या गवतात अजून एक वाघ. मग तो पाण्यातला वाघ हळूच उठला आणि दबकत दबकत पुढे जायला लागला. अपेक्षित असलेलं अंतर गाठल्यानंतर त्यानं त्या दुसऱ्या वाघावर उडीच घेतली. मग दोघंही दंगा करायला लागले. पण तो दुसरा वाघ जरा बुजरा होता किंवा त्याला आमची उपस्थिती मान्य नव्हती. तो काही पुढे सरकेचना. मग तेवढ्यात त्या आधीच्या वाघानी कुठूनतरी एक पाणकोंबडी पकडून आणली आणि टबमधे असलेल्या खेळण्याप्रमाणे त्यानी त्याच्याशी खेळ सुरु केला. अर्थात त्याचा खेळ त्या पाणकोंबडीच्या जीवावर बेतला होता. त्यानी तिला त्या पाण्यात घोळवली. ती खाली गेली कि उगाच एक दुडकी मारायचा. या सगळ्या बाळलीला चालू असताना तो दुसरा वाघ दबकत का होईना पुढे झाला आणि परत एकमेकांवर उड्या मारणं चालू झालं. असं वाटत होतं कि हे कधी थांबूच नये. शेवटी आम्ही आमचे कॅमेरे चक्क खाली ठेवले आणि डोळ्यात ते सगळं साठवू लागलो. काही मिनिटं हा खेळ चालू असताना मागून एका जिप्सीचा आवाज आला आणि एक तास पाण्यात खेळणारे ते दोन बछडे मागच्या झाडीत दिसेनासे झाले. दिसेनासे म्हणजे इतके आत गेले कि त्या नुकत्याच आलेल्या जिप्सीला आम्ही एक तास यांचा खेळ बघत होतो हेही खरं वाटेना. सफारीची वेळही संपत आली होती. आमच्या अजून तीन सफारी बाकी होत्या पण दुसऱ्याच सफारीत इतकं एक्सक्लूसिव्ह सायटिंग झालं होतं कि आता पुढच्या सफारींमध्ये काय दिसेल याचे ठोकताळे लावत आम्ही गेटच्या बाहेर पडलो.