पुनश्च तराई: दुधवा भाग ०२

पुनश्च तराई: दुधवा भाग ०२:
चार सफारी पार पडल्या होत्या पण अजून तरी तराईतल्या वाघानी काही दर्शन दिलं नव्हतं. आम्ही आदल्या दिवशीच्या घडामोडींचा अंदाज घेऊनच दुसऱ्या दिवशीच्या सफारीचं गेट ठरवत होतो. आत्तापर्यंतच्या झालेल्या फेऱ्यांमध्ये पगमार्क्स दिसले होते पण ते उमटवणारा प्राणी काही समोर येत नव्हता. पण का कुणास ठाऊक यावेळेस मनात कुठेतरी आशा मात्र नक्की होती. २५ तारखेला सकाळची फेरी झाल्यावर हॉटेलवर लंच करत असताना मला केवलचा (गाईड) फोन आला.
' सरजी कलसे किसीको किसीभी रूट पे सायटिंग नही हुई है| लेकीन आज सुबेरे किशनपूर रिंग रोडपर दो बांघोकि गुर्राहट सुनाई दि| काफी देर तक आवाजें आती रही, पर बाहर निकले नही | तो आज हम किशनपूर चलेंगे, आपं लंच करके रेडी रेहेना | गाडी ठीक अढाई बजे आ जाएगी | ' फोन ठेवला आणि चेहेऱ्यावर कसलीही एक्साईटमेंट न आणता समोर ठेवलेला थंड छांसचा ग्लास उचलला आणि मिशा पांढऱ्या झाल्यावरच खाली ठेवला. दुपारची सफारी किशनपुरला आहे याची कल्पना सर्वांना दिली आणि तिथपर्यंतचा रस्ता आठवून मंडळींचा घास घशातच अडकला. पण आता वाघ बघायचा म्हटल्यावर एवढा त्रास सोसावाच लागणार. पण कसलीही काचकूच न करता सगळे आधीच तयार होऊन बसले होते, गाडी आली आणि आम्ही किशनपुरला रवाना झालो.
बरोब्बर साडेतीनला आम्ही गेटमधून आत प्रवेश केला. आजच्या सफारीला आमची एकमेव जिप्सी आत चाललेली होती. दोन दिवस आधी याच ठिकाणी होळीच्या सुट्टीच्या दिवशी इथले स्थानिक लोक रंगीबेरंगी कपडे घालून, मस्तपैकी परफ्युम लावून 'सहलीला' आले होते आणि आज फक्त आम्ही. बहुतेक दोघांनाही एकांत हवा होता. आम्हालाहि आणि वाघालाही !
गेटवर येईपर्यंतच उन्हाचा काय तो त्रास होता. एकदा का सालच्या जंगलात प्रवेश केला कि मग पुढे काही नाही. रिंग रोडच्या दिशेनं आमची जिप्सी जात होती आणि अचानक ड्रायव्हरनी गाडी थांबवली. खाली मातीत अतिशय स्पष्ट अशा वाघाच्या पाऊलखुणा होत्या. अगदी नुकताच इथून गेल्यासारख्या. मग त्याच खुणांचा माग काढत आम्ही पुढे पुढे जात राहिलो. मग त्या खुणा आम्हाला एका चौकात घेऊन गेल्या. इथे खरी गंमत होती कारण या चौकात एकूण सहा रस्ते एकत्र होत होते. आता आली का पंचाईत! आता या सहापैकी हा वाघ कुठल्या दिशेला गेला असावा? बरं एखादा रस्ता पकडून आपण पुढे जावं तर वाघ नेमका दुसऱ्या वाटेनं पुढे गेलेला असायचा आणि परत मागे फिरावं तर तोपर्यंत तो कुठे आत शिरला तर?? गेलं मुसळ केरात. बरं त्या चौकात कुठेच पाऊलखुणा दिसत नव्हत्या. मग अंदाज करावा तरी कसा? केवल म्हणाला, ' सर आगे एक वाटरहोल है वो चेक करके आते है| ' मग वेळ न दवडता आम्ही ते बघून आलो पण तिथे कुणीच नव्हतं. मग कळलं कि इथून पुढे अजून एक वाटरहोल आहे. मग त्या दिशेनी गेलो तर तिथेही काही नाही. आपला चान्स गेला असा विचार करत आम्ही अजून एका चौकात पोचलो. तो गाईड आणि ड्रायव्हर दोघंही खाली वाकून वाकून खुणांचा अंदाज घ्यायला लागले. कोणालाच काही कळेना कि इतक्या फ्रेश पंजाचा माग काढत आपण आलो तर मग वाघ गायब झाला तरी कुठे? हताश तोंडं करून चौकाच्या मधोमध आमची गाडी थांबली. सगळ्यांची डोकी चौफेर फिरत होती. गवतात, झाडात, लांबवर दिसणाऱ्या वाटरहोलमधे कुठे काही पिवळट पट्टे किंवा तत्सम काही दिसतंय का? काही आवाज येतोय का? पण काही नाही हो. 
कल्पना करा, सव्वाचारचा सुमार. आम्ही चार रस्ते एकत्र येणाऱ्या एका चौकात उभे आहोत. डाव्या हाताला एक रस्ता, उजव्या हाताला एक रस्ता ज्याच्या टोकाशी किशनपूरचं रेस्टहाउस अंधुकस दिसत होतं. मागे एक रस्ता जिथून आम्ही आलो होतो आणि समोर अजून एक रस्ता ज्याच्या काही अंतरावर एक वाटरहोल, ज्यावर एकही जनावर नव्हतं असं. सगळीकडे स्मशान शांतता पसरली असताना एकदम गाईड आणि ड्रायव्हर आपापसात बोलायला लागले. त्या शांततेत आमच्या गाईडचा खर्जातला आवाज अजून गूढ वाढवू लागला.
' सर ये यही कही है | पंजे और कही नही है | ये जहां भी होगा इसी वाटरहोल पे जरूर आयेगा| हम यही इंतजार करेंगे |' कोणीच काही बोलण्याच्या तयारीत नव्हतं. अचानक अजून एका जिप्सीचा आवाज कानावर आला. ती डावीकडच्या रस्त्यानी आमच्या दिशेनी येत होती. आमच्या जिप्सीच्या जवळ येऊन सुद्धा ती थांबली नाही. आमच्या गाईडनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण काही न बोलता ती गाडी आमच्या शेजारून निघून गेली. त्याचं हे वर्तन बघून गाईडही चक्रावला. आम्ही त्याकडे फारसं लक्ष न देता तसेच वाट बघत बसलो. तोंडापाशी येणाऱ्या माशा आणि चिलटं वैताग आणत होती. त्याचं कानाशी येणारं गुणगुणणं नको होत होतं आणि तेवढ्यात ड्रायव्हर एक वाक्य पुटपुटला आणि एका क्षणात अंगावर सरकन काटा उभा राहिला.
' सरजी रेस्ट हाउसवाले रास्ते सें बीचो बीच एक बडा टायगर आगे आ रहा है | बिलकुल अपनी तरफ| '
त्याच्या या वाक्यावर विश्वासच बसत नव्हता. जरी वाघ चालत येत असला तरी तेव्हा तो बराच लांब होता. उजवीकडे पाहिलं तर दोन मोर अक्षरशः नाचत पुढे पुढे येताना दिसले. मी म्हणालो,' अरे नही छोटे, टायगर कहां वो तो मोर चल रहा है |
' अरे सर आपके कॅमरे से देखिये | काफी बडा टायगर है |
मी डोळ्याला कॅमेरा लावला आणि माझा माझ्याच डोळ्यावर विश्वास बसेना. आसपास अन्य कुठलीही जिप्सी नसताना किशनपूरच्या त्या सालच्या गर्द जंगलात एक मोठा नर वाघ शेजारी दोन बाउन्सर बाळगल्याच्या थाटात मोरांना घेऊन दिमाखदार पावलं टाकत थेट आमच्या दिशेनं येत होता. मधूनच एखादी तिरीप त्याच्या तोंडावर पडायची आणि तो हलकेच डोळे बंद करायचा. शेजारी असणाऱ्या मोरांनी उच्छाद मांडला होता. त्यातला एक मोर त्या वाघाच्या इतक्या पायात पायात येत होता कि त्याबद्दलची निराशा वाघाच्या तोंडावर स्पष्ट दिसत होती. एक दोनदा तो त्याच्या अंगावर गुरकावला सुद्धा. पण मोर बहुतेक आज ठरवून आला होता कि मला सहजासहजी फोटो काढू द्यायचे नाहीत म्हणून. माझ्या एका फोटोत चक्क समोर मोर आणि मागे वाघाचं शरीर असं आलं आहे. अखेरीस वाघानी आपली चाल वाढवली आणि मोरांना मागे टाकून तो आम्हाला सामोरा आला. त्याचं वर्णन मला करणं शक्यच नाही. डोळ्यात अतिशय बेदरकार भाव पण तरी तितकेच शांत, उभट चेहरा आणि चेहेऱ्याभोवती आयाळीसारखे भासणारे पांढरट पिवळे केस. अशा त्या देखण्या राजाची आणि माझी एक दोनदा नजरानजर झाली. पण कदाचित त्याला आमचं अस्तित्व आवडलं नसावं. त्यामुळे आम्ही उभं असलेल्या चौकात सरळ न येता त्यानी उजवीकडच्या गवतातला मार्ग स्वीकारला. आम्ही गाडी थोडी पुढे घेतली आणि समोर दिसणाऱ्या वाटरहोलकडे टक लावून बसलो. आत गवतात शिरल्यावर आसपासचे मोर कर्कश्य ओरडायला लागले. पण हा पठ्ठ्या बाहेर यायला काही तयार होईना. दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली. गाईडच्या म्हणण्याप्रमाणे तो वाटरहोलपाशी येणारंच आणि तेवढ्यात आतल्या गवतातून तीन-चार वेळा डरकाळ्या ऐकू आल्या. त्या ऐकल्यावर वाटलं कि आत अजून एक वाघ तर नाही ना? शेवटी तो बाहेर येण्याचा नाद आम्ही सोडला आणि रिंग रोडच्या दिशेनं वळलो.
काहीच वेळात ती मगाचची आमच्या शेजारून गेलेली जिप्सी समोरून येताना दिसली, जवळ आली तशी ती आपणहून थांबली आणि त्यातला गाईड आम्हाला खिजवत म्हणाला, ' हमने अपनी गाडी दाए घुमाई और सायटिंग हुई | आपं कहां रेहे गये ? ' असं म्हणून कॅमेरा आमच्याकडे फिरवत त्यानी टिपलेला वाघ आम्हाला दाखवला आणि अन्य पर्यटक चेष्टेनी हसले. लगेच त्याला तोडीस तोड उत्तर देत आमचा गाईड म्हणाला, ' अरे आपं दाए मूड गये और हमें बैठे बैठे सायटिंग हो गयी | अच्छा हुआ आप चल दिये | ' त्याला दुजोरा देत आम्ही सगळे कुत्सितपणे त्याकडे बघून हसलो. लगेच त्याचा चेहेरा बदलला. कारण त्याला दिसलेला वाघ हा पाठमोरा होता आणि ती एक मादी होती. मग क्षणाचाही विलंब न करता मी त्याला म्हणालो, ' अगर आपका फोटो दिखाके हो गया हो तो क्या मै अपना फोटो दिखाऊ? हमें हेड ऑन मेल टायगर दिखा है | ' मी असं म्हणताक्षणीच गाईडसकट सगळ्यांची तोंडं खरकन उतरली. मी आधीच कॅमेऱ्यातून मोबाईलवर फोटो ट्रान्स्फर केला होता. तो पाहिल्यावर त्यांचे डोळेच बाहेर आले. मग कब? कहां? कैसे? कितनी दर? असे प्रश्न यायच्या आधी आम्ही तिथून पळ काढला.
माझी अवस्था ' आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन ' अशी झाली होती. काल सकाळी 'मोकळ्या रस्त्यात धावून येणाऱ्या हत्तीचा फोटो निसटला' असं म्हणून हिरमुसणारा मी.. आज संधीप्रकाशात, सालच्या गर्द रानाच्या पार्श्वभूमीवर ऐटीत चालणारा नुसताच राजबिंडा जंगलाचा राजा नव्हे तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय पक्षी असे दोघं एकाच फ्रेममधे घेऊन तृप्त मनानी परत चाललो होतो.

समाप्त.
Powered by Blogger.