पुनश्च तराई: दुधवा भाग ०१

पुनश्च तराई: दुधवा भाग ०१ :
आपल्या सर्वांच्या बाबतीत असं अनेकदा होतं कि एखाद्या विशिष्ट कारणाकरता आपण त्या ठिकाणी जातो पण हाती काही लागतंच नाही. पण योग असे काही जुळून येतात कि काहीच दिवसांत आपल्याला त्याचं ठिकाणाहून बोलावणं येतं आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडलं असं काहीतरी हाताला लागतं. ज्याचा आपण कधी विचारचं केलेला नसतो. दुधवाच्या बाबतीत अगदी तसंच झालं माझं. पहिली ट्रीप झाल्यानंतर लगेच महिन्याभराच्या आतच मला परत तिथेच जाण्याचा योग आला. दुधवा च्या पहिल्या टूरच्या लिहिलेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे त्यावेळेस तराईतल्या वाघाचं काही दर्शन आम्हाला झालं नव्हतं. तो योग आत्ताच्या सफारीमधे जुळून आला. फारशी ओळख नसताना केवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून पेंच किंवा ताडोबाला न जाता दुधवा ला आल्याबद्दल काळे कुटुंबाचा मी आभारी आहे.
मागच्या ट्रीपप्रमाणे यावेळीही सहा सफारींचं म्हणजेच दुधवा-सोनारीपूर, सतीयाना आणि किशनपूर अशा प्रत्येकी दोन सफारी याप्रमाणे नियोजन केलं होतं. फेब्रुवारी पेक्षा आता हवेतला उष्मा वाढायला लागला होता तरी सकाळी ओपन जिप्सीतून जाताना कानाला लागणारा गार वारा सहन होत नव्हता. त्यामुळे सकाळच्या प्रहरी बाहेर पडताना पूर्ण पॅकबंद होऊनच बाहेर पडायला लागत होतं. आमच्या हॉटेलपासून किशनपूरचं गेटचं मुळी बावीस किलोमीटर दूर आणि त्यातून कहर म्हणजे तिथंपर्यंत पोचवणारा रस्ता. एकतर या रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात कोल्हे आणि बिबटे आहेतच, कधी कधी गावातल्या गाई-गुरांवर ताव मारायला वाघ पण अधूनमधून येतंच असतो; त्याबरोबर या रस्त्याला शेतातून साखर कारखान्यात ऊस वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रक यांची इतकी वाहतूक चालू असते कि हा रस्ता गुळगुळीत होण्याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे उत्तर प्रदेश पर्यटन मंडळानी हा सगळा रस्ता जंगल सफारीला जोडून घ्यायला हरकत नाही. असो. या गोष्टी आपल्या हातात नाहीत.
पहिल्या तीन सफारींमध्ये अप्रतिम पक्षीदर्शन झाल्यानंतर आता आस लागली होती ती जंगली हत्ती आणि तराईतल्या वाघाची. चौथ्या सफारीला सोनारीपूर झोनमधून जात असताना लागोपाठच्या दोन जिप्सीनी आम्हाला लाईट दाखवून थांबवलं आणि त्यातला गाईड म्हणाला, 'इसी रोड पे रहो, एक टस्कर (जंगली नर हत्ती) अपनीही मस्ती मै तेहेसनेहेस करते आगे बढ रहा है| इधरही रुको वो आयेगा सामनेसे|'  असं म्हणून त्या दोन्ही गाड्या निघाल्या. कारण त्या गाड्यांना आधीच तो टस्कर दिसला होता आणि गाडीतल्या अन्य लोकांनी परत तो टस्कर बघण्याची इच्छा न दर्शवल्यामुळे त्या धूळ चारत मागच्या मागे निघून गेल्या. समोरचा नजारा फारच रम्य होता. उन्हाळा चालू झाल्यामुळे सालची पान चांगलीच गळली होती. दोन्ही बाजूला सालच्या लालसर-तपकिरी पानांचा सडा, मागे मोठमोठे सालचे वृक्ष आणि मधे पसरलेलं लख्ख ऊन. आता टस्कर आला कि कचाकच फोटो काढत सुटायचं. मी पूर्ण तयारीनिशी कॅमेरा सरसावून वाट बघत होतो. दहा मिनिटं गेली - वीस मिनिटं गेली. हाताला जड लेन्स मुळे रग लागायला लागली होती. पण टस्करचा काही पत्ता नव्हता. ना आतून त्याच्या पावलांचे आवाज येत होते ना झाडं मोडून टाकण्याचे आवाज येत होते. शेवटी त्या टस्करनी त्याचा मार्ग बदलला असं समजून आम्ही त्याचा नाद सोडला आणि पुढे निघालो. एक उत्तम फ्रेम निसटल्याची रुखरुख मनाला लागली. एक चांगला फोटो मिळाला नव्हता हि गोष्ट खरी पण आजचा दिवस आमचा होता याचं सुतोवाच सकाळी सकाळी दिसलेल्या बंगाल फ्लोरीकननी आधीच केलं होतं. खास त्या फ्लोरीकनसाठी म्हणून आलेल्या एका ग्रुपला तो दिसला नाही पण आम्हाला विनासायास दिसला. तेव्हा अजिबात वाईट वाटून न घेता आम्ही पुढे सरसावलो.
पानगळी जरी सुरु झाली असली तरी जंगलाचे फोटो काढण्याचा मोह काही सुटत नव्हता. जंगल कात टाकत होतं. आधी गच्च अशा वनराईतून सूर्यकिरण आत येऊ शकत नव्हते आणि आता गळलेल्या प्रत्येक पानाच्या बेचक्यांमधून तेच किरण वाट काढत धुक्यात मिसळत होते. मोठा रम्य देखावा होता. हे असे जागोजागीचे फोटो काढत जात असताना परत समोरून येणाऱ्या एका गाडीनी आम्हाला ' उसं तरफ हातियोंका एक बडा झुंड झाडीयो के बीच चल रहा है| ' असं सांगितलं. लगेच जिप्सीत एक नवचैतन्य निर्माण झालं. आता यांना सोडायचं नाही, बघायचचं अशा अर्थाचं बोलून गाईड पुढच्या सीटवरून सगळ्यात मागे स्टेपनीच्या जागी जाऊन उभा राहिला. लांबवर नजर टाकून अंदाज घेता यावा म्हणून. एक मोठा वळसा घेऊन आमची गाडी दाटीनं वाढलेल्या झुडुपांच्या दिशेला वळली. दोन्ही बाजूला अगदी अंगाला चिकटतील अशी झुडुपं. तेव्हा मनात विचार आला कि जर हि अशी वळणं घेत असताना अचानक समोर जर हत्ती आला तर आपलं काय होईल? कदाचित हा विचार सर्वांच्या मनात येऊन गेला असावा. कुणीच तोंडातून अवाक्षरही काढत नव्हतं. आवाज होता तो फक्त वाळलेल्या सालच्या पानांवरून जाणाऱ्या जिप्सीच्या चाकांचा आणि अचानक शेजारच्या झाडीतून एक झाड कडाडकन मोडल्याचा आवाज आला. दिसत काहीच नव्हतं पण आवाज मात्र येत होते. मागे उभा राहिलेला आमचा गाईड एकदम म्हणाला, 'छोटे, गाडी घुमाके लो |' इतका वेळ आम्ही रिव्हर्स मधेच होतो. पण अचानक गाईडनी असं का सांगितलं हे कळेना. मग आमच्या ड्रायव्हरनी मागे जाऊन गाडी वळवली आणि परत त्याच ठिकाणी जिथून आम्ही मागे वळलो होतो तिथेच गाईडनी गाडी थांबवायला सांगितली आणि म्हणाला, यहां बाएं तरफ बिलकुल नजदीक एक टस्कर खडा है| तो यहांसे गाडी तेज भगाव और उसके आगे जाकर रुक | पेहेले देखते है कि वो किस मिजाज मै है| ' मग ड्रायव्हरनी गाडी थोडी रेज केली आणि एकदम अक्सिलरेटर वाढवला. जिप्सी वेगानी पुढे गेली. आमचा विश्वास बसेना. छातीची धडधड वाढली. हात कितीही नाही म्हटलं तरी थरथरत होते. मी फार हालचाल न करता कॅमेरा आणि लेन्स जिप्सीच्या टपाच्या फ्रेमला टेकवून आणि झूम अॅटजेस्ट करत फोटो काढायला लागलो. आमच्या समोर अगदी काही फुटांवर फिकट करड्या रंगाचा एक मदमस्त टस्कर उभा होता. आसपासच्या झाडा-झुडपांवर सूड उगवल्याप्रमाणे त्या मोडून एखाद्या दैत्यासारखा त्यावरचं उभा होता आणि त्याच झुडपांचे लचके तोडल्याप्रमाणे आपल्या सोंडेनी पानं ओरबाडून तोंडात ढकलत होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची मस्ती दिसत होती. त्या हिरव्याकंच रानात त्याचे पांढरेशुभ्र सुळे उठून दिसत होते. मोठ्या मस्तीत तो त्याची सोंड झाडात खुपसून ती कडाकड मोडत होता आणि इतक्यात त्याच्या लक्ष्यात आलं कि त्याचा एकांतवास कुणीतरी भंग केलाय. अर्थात त्याची करडी नजर आमच्या जिप्सीवर होती. आमची जिप्सी थांबली होती पण बंद केलेली नव्हती. त्यामुळे तिचा आवाज या गजराजाची तंद्री मोडायला पुरेसा होता. आत्तापर्यंत त्यानी त्याचं लक्ष्य आमच्यावर पूर्णपणे केंद्रित केलं होतं. या काही मिनिटांच्या काळात मी जमतील तसे फोटो काढून घेतले. तेवढ्यात आमचा गाईड म्हणाला, 'छोटे, तैयारी मै रेहेना, अब ये कभीभी चार्ज कर सकता है| अगर चार्ज किया तो गाडी भगानी है क्योंकी पिछे पुरा झुंड खडा है| ' त्याची हि वाक्य संपतात न संपतात तोच त्यानी धावून येण्याचा पवित्रा घेतला आणि काही अंतर पुढे येणार तेवढ्यात ड्रायव्हरनी बुम्म करून जिप्सी वेगानी पुढे पिटाळली आणि आम्ही त्याच्या तडाख्यातून वाचलो. एवढा मोठा अजस्त्र प्राणी पापणी लवते ना लवते तोच वेगानी धावून येऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण होतं. काझीरंगामधे असाच एक अनुभव गेंड्यानी दिला होता, आता हत्तीनी दिला. आत्ता तरी हा एकटाच होता पण समजा तो धावून आल्यावर त्यामागचा कळपही मागे लागला असता तर... पण आपण काही त्यांना त्रास द्यायला किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालायला आलेलो नाही. खरंतर मला त्या हत्तीचा रस्त्यात आल्यावर फोटो घ्यायचा होता पण हे बोलायला ठीक आहे. कारण तो नुसताच रस्त्यावर येऊन थांबला नसता. त्यानंतर त्यानी जे काही केलं असतं ते फक्त बघत राहण्यापलीकडे आपण काहीच करू शकलो नसतो.
जिप्सी पुढे नेऊन सुरक्षित अंतरावर थांबवली. हत्तींचा कळप मागे पडला होता. परत एकदा गूढ शांतता पसरली. एका पावशाचा आवाज सोडला तर जंगलात इतर कसलाच आवाज येत नव्हता. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडल्याचं समाधान आणि नकळत काहीतरी साहसी कृत्य घडल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मी मात्र मान खाली घालून हत्तींचे फोटो नीट आलेत कि नाही बघत होतो आणि तेव्हा लक्षात आलं कि सालवृक्षांच्या त्या निबिड अरण्यात मधोमध हत्ती असलेली फ्रेम परत एकदा निसटली होती.

क्रमशः
Powered by Blogger.