बिली अर्जन सिंगच्या जंगलात
बिली अर्जन सिंगच्या जंगलात:
यंदाच्या थंडीच्या मोसमामधे माझ्या शिरपेचात वेगवेगळी जंगलं अक्षरशः मानाचे तुरे खोवल्याप्रमाणे जमा झाली. भारत-पाक सीमेलगतचं डेझर्ट, भारत-भूतान सीमेलगतचं मानस, अरुणाचल सीमेलगतचं नामेरी आणि आता भारत-नेपाळ सीमेलगतचं दुधवा नॅशनल पार्क. यादरम्यान नेहमीची जंगल झाली ती वेगळीच. गेल्या तीन वर्षांपासून दुधवा भेटीची फक्त स्वप्न रंगवत होतो. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. अगदी तसंच झालं दुधवाच्या बाबतीत. एकतर हे नाव कुणी ऐकलेलं नव्हतं आणि त्यातून थोडा दूरचा प्रवास. पण अखेरीस माझ्यासारखे काही जंगलप्रेमी सापडलेच. मग काय विचारता.. ताबडतोब सगळी बुकिंग्स झाली आणि बघता बघता प्रवासाचा दिवस उजाडला.
लखीमपुर खेरी जिल्ह्यातल्या पलिया कलान नावाच्या एका छोट्या गावाबाहेरचा आसपासचा प्रदेश म्हणजेच दुधवा नॅशनल पार्क. इथूनच बावीस किलोमीटर अंतरावर अजून एक जंगल लागतं ते म्हणजे किशनपूर अभयारण्य. प्रवासाचा वेळ वाचवायचा असेल तर लखनौपर्यंत विमानानी येणं हे उत्तम. लखनौला सकाळी सुरवात झाली ती थोडी निराशेनंच. दुधवाच्या वाटेला निघाल्यापासून सतत पावसाची रिपरिप चालू होती. खुद्द दुधवामधे सुद्धा काल संध्याकाळी पावसानी हजेरी लावल्याचं समजलं आणि सगळा जमवून आणलेला खेळ बिघडणार कि काय असं वाटायला लागलं. पण आता जे होईल ते होईल.. आता बाहेर पडलोच आहोत ना तर मग सगळ्याची तयारी पाहिजे. सकाळी चांगलाच गारठा होता. लखनौ मधलं हॉटेल सोडताना फक्त चहा घेतला होता त्यामुळे तासाभरातच सगळ्यांना भूक लागली. मग हायवेवरच्याच एका ढाब्यावर मस्तपैकी आलू पराठा, प्याज पकौडी आणि अदरक कि चाय असं भरपेट खाऊन आम्ही लखीमपुरच्या दिशेनं निघालो. साधारण शंभर किलोमीटर नंतर अखेरीस सूर्यानी आम्हाला दर्शन दिलं आणि आमचा जीव भांड्यात पडला. पुढे चार तासांनी आम्ही पलीया जवळच्या एका रेसोर्टमधे पोचलो. आमची पहिली सफारी होती ती किशनपूरला. पोचल्या पोचल्या रूममध्ये बॅग्स टाकून लंचला गेलो आणि आपापले कॅनन/ निकॉन गिअर्स घेऊन किशनपूरच्या रस्त्याला लागलो.
ठिकठिकाणी शेतीची काम चालली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस आणि सरसो. किशनपूरच्या रस्त्यावरच एक मोठा साखर कारखाना लागला. दोन मोठी धुरांडी पांढरा शुभ्र धूर ओकत होती. निळ्याशार आसमंताच्या पार्श्वभूमीवर तो धूर फारच नजरेत भरत होता. रस्त्याच्या कडेला तोडणी केलेले ऊस भरून मोठाले ट्रॅक्टर्स कारखान्याच्या दिशेनी जात होते. इथला ऊस आपल्याकडे होणाऱ्या उसापेक्षा बराच लहान वाटला. शेतात असलेल्या उसाच्या टोकदार पानांवर कवड्या मैना आणि मनोल्या झुंडीनी दिसत होत्या. काही निष्पर्ण झाडं तर यांच्या प्रजेनी तुडुंब भरली होती. वाटेत लागणाऱ्या घागरा नदीपुलाच्या आसपास घारी आणि जंगली कावळे बऱ्याच संख्येनी होते. त्याचबरोबर रेल्वेलाईन शेजारच्या एका झाडावर दोन निराळ्या जातीच्या गिधाडांनी कब्जा केला होता. कदाचित आसपास काहीतरी मरून पडलेलं असावं. आम्ही मात्र अंगात तीन-तीन लेअर चढवून, डोक्यावर माकड टोपी घालून रस्त्यावर आणि झाडावर बसलेल्या वानरांकडे बघत होतो. मधूनच एखादा मोठा पोपटांचा थवा कर्कश्य आवाज करत झाडांमध्ये गायब होई. एखादा निमूटपणानी बसलेला पिंगळा चटकन माझ्या नजरेत यायचा आणि मग गाडी पुढे मागे करत सर्वांचे फोटो होत होत आमची जिप्सी चालली होती. पाण्यानी भरलेली छोटी छोटी डबकी काल रात्री पाऊस झाल्याचं सांगत होती. तिच्याकडे दुर्लक्ष करत सरतेशेवटी आम्ही जंगलात प्रवेश केला. हिरव्यागार साल वृक्षांनी आमच्या डोक्यावर छत्रचामरं धरली होती. त्यातून हवामान थोडं ढगाळ होतंच त्यामुळे उन्हं खाली पोचण्याचा प्रश्नच येत नव्हता. निरनिराळ्या आवाजांचा कानोसा घेत आम्ही एका मोठ्या तलावापाशी पोचलो. याठिकाणी जणू काही पाणथळीतल्या पक्ष्यांनी शाळाच उघडली होती. असंख्य छोटे आर्ली पक्षी (Small Pratincole) पाण्यावर अविरत समांतर उडत होते. त्यांना मुळी उसंतच नव्हती. काठावरच्या तुताऱ्या (Sandpipers) आमची चाहूल लागताच निषेधात्मक ओरडत थोड्या पुढे जाऊन बसल्या. त्यांच्या आसपासच काही कमलपक्षी (Bronze-winged Jacana) आपली चोच चिखलात खुपसून आपली भूक भागवत होते. काळी आणि जांभळी पाणकोंबडी (Moorhen & Swamphen ) किमान वीसच्या संख्येनी एकमेकींत घुसखोरी करत होत्या. काही वारकरी (Eurasian Coot) मात्र आपण बरे आणि आपलं काम बरं या वृत्तीनं आपापसांत जीव रमवत होते. मधूनच पाण्यावरून जाणारा कैकर (Osprey) आणि भोवत्या पक्षी (Harrier) या पाण्यातल्या मंडळींचा ठोका चुकवत होता. तलावाच्या मध्यभागी असलेल्या एका सपाटीवर असलेले चंदन (Lesser Adjuctant Stork) आणि मुग्धबलाक (Asian Openbill) पक्षी तटस्थपणानी आपले भक्ष्य टिपत होते. आमच्याचप्रमाणे पलीकडच्या बाजूनी बाराशिन्ग्यांचा (Swamp Deer) एक मोठा कळप हे दृश्य बघत उभा होता. त्यांच्या आजूबाजूला पाणकावळे (Cormorants) आपले पंख पसरून बसले होते. आम्ही सगळे तलावापाशी उभं राहून हे दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत होतो. मग तिथे फार वेळ न घालवता आम्ही पुढच्या वाटेला लागलो. दुपारची सफारी तशी अडीच तासांचीच होती आणि त्यावेळात आम्हाला बराच पल्ला गाठायचा होता. मग जंगलाचा अंदाज घेत आम्ही ती सफारी पूर्ण केली आणि अंधार पडायच्या आत बाहेरच्या वाटेला लागलो.
दुसऱ्या दिवसाची सुरवात स्वच्छ सूर्यप्रकाशानी झाली. परवा झालेल्या पावसामुळे आम्हाला दुधवा रेंजमधे फिरता आलं नव्हतं त्यामुळे आज सकाळी दुधवा-सोनारीपूर रेंजमधे जायचं ठरलं. या भागात चिकणमाती असल्यामुळे पाऊस पूर्ण थांबल्यावरच जाता येतं. नाहीतर गाडीची चाकं रुतून बसतात. ऐकीव माहितीनुसार सोनारीपूरचं जंगल हे किशनपूरपेक्षा खूप दाट होतं. आता प्रत्यक्ष अनुभव मात्र बाकी होता. सकाळी सातला सोनारीपूरचं गेट उघडलं गेलं आणि आमची एकमेव जिप्सी त्या दाट रानात शिरली. तराईच्या जंगलातला हा काही माझा पहिला अनुभव नव्हता. उत्तराखंडमधलं राजाजी, कॉर्बेट आणि आसाममधलं काझीरंगा यांचा अनुभव घेतला होता. पण हे दुधवाचं जंगल मनात घर करून बसलं. तुम्हाला आठवतंय का? लहानपणी ऐकलेल्या किंवा चांदोबा मासिकांत पाहिलेल्या राजवाड्यामागच्या जंगलाचं चित्र? चांदोबात सहसा अशी वाक्य असायची.. राजा रयतेच्या रक्षणार्थ राक्षसाच्या शोधात त्या निबिड अरण्यात शिरला... नि बि ड! बरोब्बर हाच तो शब्द. अगदी तसंच निबिड अरण्य. मैलोनमैल सरळ एका वाटेनी पुढे पुढे पसरलेलं. वाळवंटात जसं आपल्याला मृगजळ दिसतं ना तसं इथे जिप्सीतून जात असताना सतत आपण एका न संपणाऱ्या गुहेकडे जातोय असंच वाटत राहतं. दोन्ही बाजूंनी शाकारल्यासारखी सालची मोठीमोठी झाडं, काही झाडांच्या बुंध्यावर चढलेले मोठमोठे वेल, खाली सर्वदूर पसरलेली लहान-मोठ्या पानांची झुडूपं, त्या झुडुपांवर मुलामा केल्याप्रमाणे साचलेले दवाचे किंवा मधूनच वरच्या फांद्यांतून पडलेल्या पाण्याचे शिडकावे आणि नव्यानी आलेल्या वृक्षांच्या फटीत पिंजलेल्या कापसाप्रमाणे भासावं असं पडलेलं धुकं... सगळं कसं मंतरलेलं वाटत होतं. काही जुनी वठलेली झाडं हि वर न वाढता मार्गावर आडवी पसरली होती. मोगली सीरिअलमधला 'का' नावाचा अजगर जसा आडव्या फांदीवर पसरलेला असायचा अगदी तसंच झाड आठवा. एक-दोन किलोमीटरचा असा आच्छादलेला रस्ता आपण यापूर्वीहि पाहिला असेल हो.. पण बघू तिथे हे असंच पसरलेलं जंगल पाहून अक्षरशः तोंडात बोटं घालायची वेळ आली होती. कडाक्याच्या थंडीत आणखी गोठवून टाकणारं हे जंगल पाहून आम्ही स्तब्ध झालो होतो. मान वर करून बघितलं तर फांद्यांच्या फटीतून निळं आकाश तर दिसत होतं पण त्या फटीतून सूर्यकिरणांना खाली उतरायला बंदी होती. लांबवर कुठेतरी एखादी तिरीप महत्प्रयासांनी खाली यायची पण वारा काही ती तिरीप फार काळ टिकून देत नव्हता. आम्ही उन्हाखाली मिळणाऱ्या उबेसाठी तरसत होतो पण ती ऊब काही आमच्या नशिबात नव्हती. उबेच्या शोधार्थ जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला लावलेल्या काही तारा आम्हाला दिसल्या. मग कळलं कि त्या गेन्ड्यांनी मधे येऊन उपद्रव करू नये म्हणून लावण्यात आलेल्या आहेत. आधीच हे जंगल गूढ आणि तितकंच भीतीदायक.. त्यात समोरून एखादा जंगली हत्ती किंवा गेंडा किंवा वाघ आलाच तर बसलीच पाचावर धारण म्हणून समजा. या जंगलाची एक आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे या जंगलाच्या मधून एक रेल्वेलाईन जाते. नुसती लाईन जाते असं नाही तर ती प्रवाशांसाठी कार्यरत आहे. हि ट्रेन दुधवा, किशनपूर आणि कतरनियाघाट पर्यंत म्हणजेच 'मैलानी ते गोंडा' अशी जाते. आपल्या ताडोबामधून जशी एसटी जाते तशी इथे ट्रेन जाते. अर्थात यामुळे कधी कधी काही अप्रिय घटना पण घडतात, घडलेल्या पण आहेत. आमच्या गाईडनी अशा काही घटना सांगितल्या त्या ऐकवत नव्हत्या. काही वर्षापूर्वी इथली सालची झाडं तोडून या ट्रेनद्वारे नेली जायची. अशी अनेक झाडांची कत्तल झाल्यावर काही काळापुरती ती ट्रेन बंद करण्यात आली होती पण मग प्रवाश्यांची गैरसोय लक्षात घेता परत चालू केली. पण फक्त प्रवासी वाहतुकीसाठी. मनात सहज विचार आला कि झाडांची वाहतूक जर अशीच चालू ठेवली असती तर आत्ता समोर फक्त उजाड रान दिसलं असतं. दुधवा-किशनपूरच्या या सफारीमधे एकच गोष्ट मात्र बघायची राहून गेली. ती म्हणजे तराईमधला पट्टेरी वाघ. या इथल्या वाघांची ऐटच काही वेगळी आहे. आकारानी प्रचंड तर असतातच पण मध्यभारतातल्या वाघांच्या मानानी यांच्या अंगावरचे पट्टे हे पिवळट-नारिंगी भासतात. त्यातून ते सकाळच्या कोवळ्या उन्हांत दिसले तर मग तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच. मानेभोवती सिंहासारखी आयाळ असते, एकंदरीत अंगावर केस जास्तचं असतात. त्यामुळे हा वाघ अजस्त्र वाटतो. यामागे अजून एक कारण आहे. ते म्हणजे बिली अर्जन सिंग - अ मॅन ऑफ दुधवा.. आधी शिकारी म्हणून आणि त्यानंतर कॉझरवेशनिस्ट म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या माणसानी लंडनच्या एका झू मधून एक पट्टेरी वाघीण चक्क विकत घेतली होती. तिचं नाव त्यांनी तारा असं ठेवलं. हि आपल्या इथल्या बंगाल टायगरच्या मानानी बऱ्यापैकी मोठी. काहीचं म्हणणं आहे कि ती सैबेरीअन किंवा क्रॉसब्रीड असावी. या बिली अर्जन सिंगनी तिची उत्तमरित्या देखभाल करून तिला दुधवाच्या जंगलात यशस्वीरित्या सोडलं. तारा पण तिथे छान रुळली आणि कालांतरानी तिच्यापासून पुढे जन्मलेल्या वाघांत सैबेरीअन वाघाचे गुणधर्म दिसायला लागले. मोठं डोकं, मानेला आयाळ आणि जास्त पांढरट रंग. हेच मुख्य वैशिष्ट्य आहे दुधवामधल्या वाघांचं आणि ते बघण्याचं भाग्य मात्र आम्हाला याखेपेला लाभलं नाही.
अशी कल्पना करा.. जिथे सूर्यप्रकाश सहसा पोचत नाही, सकाळच्या प्रहरी वृक्षांच्या कानाकोपऱ्यात कापसासारखं धुकं पसरलेलं आहे, सर्वदूर हिरव्या पानांचं राज्य आहे, रस्त्याच्या कडेला भक्कम कुंपणाप्रमाणे भासणारी सालची खोडं दिसतायत आणि मधल्या पानगळी झालेल्या रानवाटेवर असा एखादा अजस्त्र, आयाळ असलेला वाघ समोर आला... तर.... किती भान हरपून जाणार दृश्य असेल ते! पण ठीक आहे. सगळं एकाच खेपेत बघायला मिळालं तर काय पाहिजे अजून! अखेरीस आम्ही त्या फसव्या गुहेतून बाहेर पडलो खरे पण मन अजूनही त्या वनराईच्या खबदाडीत घुसलेल्या धुक्यासारखं तिथेच घुटमळत होतं.