भग्न

भग्न :
लहानपणी दूरदर्शनवर पाहिलेल्या तेनाली रामा आणि कृष्णदेवरायाच्या विजयनगरला भेट देण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या आणि कधी एकदा हंपीला जातो असं झालं. गुगलमुळे तिथली मंदिरं, राजवाडे, हत्ती शाळा, राणी महाल यांचे फोटो पाहून झालेलेच होते पण शेवटी स्क्रीनवर फोटो पाहणं वेगळं आणि स्वतः तिथे जाऊन ते पाहणं यांतली मजा काय ती वेगळीच. कॉलेजमधे असताना कलेच्या इतिहासामध्ये यातले काही उल्लेख आलेले होते त्यामुळे ते पाहाण्याची इच्छा तर होतीच पण त्याबरोबरीनं अजून एक आकर्षण म्हणजे हंपीपासून जवळच असलेलं दारोजी अस्वल अभयारण्य. इथे फक्त अस्वलांच नाही तर काही विशिष्ठ पक्ष्यांचं पण आश्रयस्थान आहे. माझे दोन मित्र मुंबईहून निघाले, मला पुण्यातून पिकअप केलं आणि आम्ही कोल्हापूर-बेळगाव करत हुबळीला पोचलो. तिथे रात्री मुक्काम केला आणि भल्या पहाटे निघून हॉस्पेटला पोचलो. पोचल्या पोचल्या एका हॉटेलमध्ये मस्त दाक्षिणात्य नाश्त्याचा आस्वाद घेतला. मी एक कॉम्बो ब्रेकफास्ट मागवला. त्यात १ इडली, १ वडा, १ डोसा, १ उपमा, १ पायनापल शिरा, २ मोठ्या वाट्या सांबार आणि तीन ते चार प्रकारच्या चटण्या. सगळंच आवडीचं हो.. मग काय हाणायला सुरवात.. केवळ लाजबाब. पोट तुडुंब भरल्यावर त्यावर थोडी कडवटसर कॉफी हवीच. कॉफी संपते ना संपते तोच आमचा दारोजीमधला माणूस आम्हाला तिथे भेटायला आला. अंगानी हट्टाकट्टा, उन्हानी रापलेला आणि पांढरी स्वच्छ मिशी असलेला हा पोम्पय्या मालेमठ नावाचा माणूस गेली अनेक वर्ष दारोजीमधे अविरत काम करतोय. उगाच कसल्याही फुशारक्या नाहीत कि कधीही मुद्दा सोडून बोलणं नाही. तो आणि त्याचं काम. आमचा नाश्ता झाल्यावर त्यानी आम्हाला दारोजीच्या रेस्टहाउसवर नेलं. जरा फ्रेश झाल्यावर आम्ही त्याच्याबरोबर दारोजीमधे जायला निघालो. जाता जाता तुंगभद्रा कॅनलवर वास्तव्यास असणाऱ्या हुमा घुबडांचं दर्शन घेतलं आणि काहीच वेळात दारोजीला पोचलो. या शुष्क अशा जंगलात आपल्याला लपायला एक जागा केली आहे.त्यात बसून उत्तम अशी फोटोग्राफी करता येते. साधारण दोनच्या आसपास आम्ही तिथे बसलो असू. पुढच्या चार तासांत आम्हाला अस्वल, मुंगुस, मोर, रंगीत चकोत्री (Painted Spurfowl), तित्तीर (Grey Francolin), होला (Eurasian n Laughing Dove), बुलबुल (Yellow-Throated Bulbul), मनोली (Indian Silverbill), चीरक (Indian Robin) यांची मनसोक्त आणि अतिशय जवळून फोटोग्राफी करता आली. बसून बसून प्रत्येकाच्या पायाला रग लागली होती. वेळ संपत चालली तशी पोम्पय्यानी आम्हाला त्याचे काही अस्वलांचे अनुभव सांगितले. माझ्यामते वाघ किंवा बिबट्या यांच्यापेक्षा अस्वल मला जास्त धोकादायक वाटतं. अस्वलांच्या हल्ल्यात माणसं मोठ्या प्रमाणात जखमी तर होतातच पण विद्रूप जास्त होतात. त्यातून एखाद्या मादी अस्वलाला पिल्लं असतील तर मग तिचा आवेश हा थरकाप उडवणारा असतो. या चार तासात आम्ही अस्वल जवळ आल्याचा थरकाप अनुभवलेला होता. ते अस्वल आमच्या जवळ तर आलंच पण परत दगडाच्या गुहेत ना जाता आम्ही ज्या ठिकाणी लपलो होतो त्याच्या जवळून शेजारच्या झाडीत गडप झालं. त्यामुळे अंदाज येईना कि ते नक्की गेलं कुठे.. कारण आमची इथली वेळ संपली कि आम्हाला तशाच एका मार्गावरून आमच्या गाडीपर्यंत जायचं होतं. अर्थात आमच्याबरोबर स्वतः पोम्पय्या आणि इतर फोरेस्ट गार्ड होता. पण तरीही मनात शंका येऊन गेली ती गेलीच. संध्याकाळ झाली. आम्ही रेस्ट हाउसला परतलो. गप्पा मारता मारता बाहेर अंधार कधी झाला ते कळलंच नाही. जेवणाची वेळ झाली. मग काय वेगवेगळ्या प्रकारचे भात आमची वाटच बघत होते. सगळ्यात मला आवडलेलं जर काही असेल तर तो म्हणजे तळलेली मिरची चुरडून केलेला कर्ड राईस आणि भिजवलेली उडदाची डाळ त्यात इतर भाज्या चिरून केलेलं ड्राय सलाड. त्यानंतर फोडणी दिलेलं ताक. इथली हवा फारच कोरडी त्यामुळे लंच आणि डिनरला दही-ताक हे असायचंच. अतिशय चविष्ठ आणि निराळ्या धाटणीचं जेवण झाल्यावर आम्ही सगळे झोपेची आराधना करायला गेलो.

दुसऱ्या दिवशी दारोजी, तुन्गभद्रेचं पात्र आणि रेस्ट हाउसच्या आसपासचा परिसर हिंडून मग रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीवजा हॉटेलात नाश्त्याला गेलो. तिथलं एक स्थानिक कुटुंब ते चालवतं.आई, वडील आणि मुलगी आणि शेजारी त्याच्या भावाचं किरणाचं दुकान. 3 कोर्स नाश्ता आम्ही तिथे घेतला. एका केळीच्या पानात चार इडल्या, एक मेदुवडा, १ तळलेली मिरची आणि चटणी. ते झालं कि त्याच पानात पूडचटणी लावलेला डोसा त्याबरोबर कांदा बटाटा असलेली भाजी. पानातली मिरची संपली कि तो बाप्या लगेच मिरची हवी का म्हणून विचारत असे. अजून संपलेलं नाही... थांबा.. तो डोसा संपला कि त्याच पानात लेमन राईस आणि मग वर चहा. एवढं झाल्यावर कसलं आलंय हो बर्डींग? एकतर नऊ वाजताच ऊन डोकं वर काढत असे. पण तरी जिद्दीनी आम्ही अजून काही पक्षी बघत त्या आसपास भटकलो आणि दुपारच्या जेवणासाठी रेस्ट हाउसला गेलो. साधारण तासा-दीड तासानी आम्ही हंपीला जायचं ठरवलं. तोवर ऊन थोडं कमी झालं होतं. दोन दिवस आमच्या हातात होते त्यात आम्हाला काही जागा बघायच्या होत्या. त्यातलं प्रमुख म्हणजे विजय-विठ्ठल मंदिर, विरुपाक्ष मंदिर, लक्ष्मी-नरसिंह मंदिर, गणेश मंदिर, मातंग टेकडी, कमल महाल, हत्ती शाळा आणि कृष्ण मंदिर. यापैकी विरुपाक्ष हे असं एकमेव मंदिर आहे जिथे देवाची पूजा आणि इतर विधी केले जातात. विजय-विठ्ठल मंदिरासमोर जगप्रसिद्ध असा दगडी रथ पाहिला जो आताच्या नवीन पन्नासच्या नोटेवर आहे. त्याला Stone Chariot किंवा Golden Chariot असंही म्हणतात. या दगडी रथावर सोनेरी सूर्यकिरण पडली कि तो सोनेरी असल्याचा भास होतो. अक्षरशः डोळे दिपवून टाकणारा आहे. इथे फिरताना मार्गदर्शक घेऊन फिरणेच योग्य. नाहीतर नुसतंच या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेल्यासारखं होतं. इथला इतिहास थक्क करणारा पण मन विषण्ण करणारा आहे. इथे साधा पाच इंच बाय पाच इंचाचा दगड सुद्धा कोरलेला आहे. मुख्य दगडावर कोरीवकाम करण्याआधी निराळ्या ठिकाणच्या जागी असलेल्या दगडावर सराव केला जाई आणि त्यानंतरच अखेरच काम केलं जाई. विजय-विठ्ठल मंदिर म्हणजे कोरीवकामाचा एक अप्रतिम नमुना आहे. आपला पंढरपूरचा विठ्ठल अनेको वर्षांपूर्वी इथे होता म्हणे. आमचा मार्गदर्शक त्या मंदिराची सांगता सांगता आम्हाला गाभाऱ्यात घेऊन गेला जिथे विठ्ठल-रखुमाईच्या मुर्त्या होत्या. आता त्या गाभाऱ्यात फक्त दोन चौथरे आहेत. ते पाहताच माझ्या अंगावर सरकन काटा आला. खूप विचित्र वाटत होते ते रिकामे चौथरे पाहायला. इथवर येईस्तोवर ऐकलेला इतिहास आधीच मानसिक खच्चीकरण करून गेला होता. इथल्याच एका संग्रहालयात १८५६ साली एका ब्रिटीशानी काढलेले फोटो पाहायला मिळाले. काही मंदिरावरचे असलेले कळस आता अस्तित्वात नाहीत. त्याआधीच अनेक सुलतानांनी इथल्या मंदिरांची, राजप्रसादांची नासधूस केलेली होती. किल्लारीच्या भूकंपामुळे सुद्धा काही प्रमाणात हानी झाली होती. त्या भग्न अवशेषांकडे पाहून मान खिन्न होतं. आपण मनातल्या मनात विजयनगरची एक प्रतिकृती तयार करतो. कधी एके काळी इथलं हे साम्राज्य किती आणि कसं विस्तारलेलं असेल याचा विचार करून अचंबा वाटतो. इमारती बांधताना त्याकाळी केल्या गेलेल्या सोई सुविधा ह्या आजच्या इतक्याच प्रगत वाटतात. काय, किती सोसलं आणि पाहिलं असेल या भिंतींनी? काय अनुभवलेलं असेल? कधी काळी या प्रत्येक मंदिरांमध्ये होणारा घंटानाद ऐकला असेल, मोठ्या मस्तवाल हत्तींचा पदन्सास पाहिला असेल, विठ्ठल मंदिराच्या प्रत्येक खांबामधून येणारा ध्वनी ऐकला असेल, राजा कृष्णदेवरायाची कार्यकुशलता पाहिली असेल, तेनाली रामाचा न्यायनिवाडा पाहिला असेल, त्याच्यावर होणाऱ्या मत्सराचा भार झेलला असेल आणि या अशा सुखानी नांदणाऱ्या विजयनगरात क्रूरकर्मा सुलतानांचा जुलूम सहन केला असेल, त्याचे घाव सोसले असतील. या शतकांपूर्वीच्या इमारती आणि शिल्पं आपल्या नशिबात आजही आहेत पण भग्नावस्थेत....
Powered by Blogger.