डेझर्ट सफारी
डेझर्ट सफारी:
पिवळ्या रंगानी न्हाऊन निघालेल्या जैसलमेर शहरातून बाहेर पडल्यावर त्याच रंगाची दुलई अंगावर घेऊन फैलावलेल्या वाळवंटाच्या दिशेला आम्ही कूच केलं. हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वदूर पसरलेली माफक उंचीची उगवलेली झाडं आपलं लक्ष वेधून घ्यायला लागली. आम्ही भल्या पहाटे जैसलमेरहून सुदासरीच्या (Desert National Park) रस्त्याला लागलो होतो. त्यामुळे अस्ताला जाणारा चंद्र आणि क्षितिजाला अगदी चिकटून उगवणारा सूर्य यांचा मिलाफ बघत तसंच आकाशात दिसणाऱ्या निरनिराळ्या लालसर-नारिंगी छटांचा सुखद अनुभव घेत आम्ही मार्गक्रमण करत होतो. बाहेर कडाक्याची थंडी होती. अर्ध्या-पाऊण तासांत आम्ही बंजारा कॅम्पमधे दाखल झालो. रूम्समधे सामान टाकून कॅमेराची जुळवाजुळव केली आणि बाहेर आलो तर गरमागरम वाफाळता चहा आमची वाटच पहात होता. कधी एकदा तो चहा पिऊन डेझर्ट मधे जातोय असं झालं होतं सर्वांना. साहजिकच आहे म्हणा, इथे येण्यापूर्वी इथल्या स्थानिक पक्ष्यांचा केलेला अभ्यास आणि पाहिलेले लोभसवाणे फोटो पाहून डोळे आसुसलेले होते. सगळ्यात जास्त आकर्षण होतं ते इथल्या माळरानाच्या राजाचं... म्हणजेच माळढोक पक्ष्याचं. (Great Indian Bustard) अलीकडेच महाराष्ट्रातून याचं अस्तित्व संपुष्टात आल्यामुळे याला बघण्यासाठी डेझर्ट अभयारण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. रिसेप्शनमधून बाहेर आलो तर एक बोलेरो आणि एक जिप्सी उभी होती. नुसतीच उभी नव्हती तर स्टार्टर मारून चालू करून ठेवली होती. हि गोष्ट काही माझ्या पचनी पडली नाही. रिक्षा असो टेम्पो असो किंवा ट्रॅक्स असो आणि परत त्यात माणसं बसलेली असोत वा नसोत पण गाड्या मात्र सतत चालू. शेजारी उभं राहून रस्त्याच्या पलीकडच्या माणसाशी बोंबलून बोलावं लागलं तरी त्यांना ते मान्य होतं. पण गाडी तशीच चालू पाहिजे.. असो. तर अखेरीस नाश्ता, पाणी असं बरोबर घेऊन आम्ही निघालो. जरा आसपासची माहिती घ्यावी म्हणून ड्रायव्हरशी बोलायला सुरवात केली. अन्वर त्याचं नावं आणि दुसऱ्या गाडीत मुसा. डेझर्ट अभयारण्याचा परिसर म्हणजे जवळपास पाकिस्तानच. एकतर इथून पन्नास-साठ किलोमीटरवर पाक बोर्डर. त्यातून या लोकांचा पेहराव म्हणजे टिपिकल मुसलमानी. डोळ्यात सुरमा, पायात तशाच मोजड्या. अगदी सगळं सेम. अन्वरशी जरा दोस्ती करत विचारलं, अन्वरभाई आज कहां ले जा रहे हो हमें? त्यावर अन्वर म्हणाला, सर आज आपको गोदावन दिखायेंगे| उसीकी तरफ जा रहें है हम|
गोदावन... म्हणजे माळढोकचं (GIB) राजस्थानी अस्तित्व. याला हवा असलेला अधिवास इथे टिकून असल्यामुळे हा पक्षी इथे सुरक्षित आहे. पहिल्याच दिवशी GIB चं दर्शन होणार म्हटल्यावर सगळ्यांमध्ये एकदम चैतन्य निर्माण झालं. आमच्या दोन्ही गाड्या GIB च्या दिशेनी पण दोन वेगळ्या मार्गावरून निघाल्या. सुरवातच रस्त्याच्या शेजारी एका मृत उंटाजवळ बसलेली आणि मान आत घालून त्याचे लचके तोडत असलेली इजिप्शीयन गिधाडं दिसली. गाडीचा वेग कमी होताच ती उडली नाहीत पण आमच्यापासून दूर जायला लागली. ते अंतर वाढायच्या आतंच आम्ही पटपट त्यांचे पोर्ट्रेट फोटोग्राफ्स काढले आणि त्यांच्या मेजवानीत अजून व्यत्यय न आणता गाडी पुढे पिटाळली. पुढे जाऊन सुदासरीच्या गेटपाशी तिकीट काढलं आणि या वाळवंटी जंगलात प्रवेश केला. नुकताच सूर्य उगवला होता त्यामुळे पुढच्या तासा-दीडतासांतच कोर्सर, व्हिटीअर, बुशचॅट, लार्क, पिपिट, श्राईक, फिंच, रॅवन, ईगल, बझर्ड, केसट्रल, व्हलचर, फाल्कन अशा सत्तर टक्के प्रजाती बघून झाल्या होत्या. आपल्याकडे जसे चिमण्या-कावळे दिसतात ना तशी इथे कुठेही अगदी रस्त्यालगत सुद्धा इजिप्शीयन गिधाडं बसलेली दिसतात. पण अजून माळढोक काही दिसला नव्हता. आम्ही माळढोकच्या मैदानात आलेलो होतो. याभागात काही ठिकाणी चक्क कुंपण घातलेलं आहे. ते कशाकरता आहे असं विचारल्यावर कळलं कि आत GIB सुरक्षित राहण्यासाठी किंवा आत अंडी घालण्यासाठी म्हणून ते केलेलं आहे. सकाळच्या प्रहरी एक दोन जोड्या किंवा कधीकधी पाच ते सहा GIB सुद्धा त्या कुंपणाबाहेर येतात. त्यांना त्यावेळेला जर काही धोका जाणवला तर ते लगेचच भराऱ्या मारत आत निघून जातात. त्या कुंपणाच्या आत पर्यटकांना जायला मज्जाव केलेला आहे. जर दूरवर एखादा माळढोक आढळला तरी आपली गाडी एका ठराविक अंतरापलीकडे नेऊच शकत नाही. अर्थात आपण गाडीमधून उतरून जाऊ शकतो पण सरपटत जरी जायचं म्हटलं तरी फार जवळ आपण पोचूच शकत नाही. त्यामुळे दुर्बीण आणि टेलीफोटो लेन्स जवळ बाळगलेली उत्तम. एकंदरीतच हा एक संवेदनशील विषय असल्यामुळे खरे पक्षिमित्र त्यांची मर्यादा ओलांडत नाहीत. हे सगळं ऐकल्यावर आता आपल्याला GIB कसा दिसणार याची उत्कंठा लागून राहिली होती. आमचा गाईड कम ड्रायव्हर सर्वतोपरी प्रयत्न करून आम्हाला GIB दाखवायचा प्रयत्न करत होता. त्याच्या शोधात असताना आम्हाला एका टॉनी ईगलनी खूप सुंदर दर्शन दिलं. त्याच्या हळूहळू जवळ जात आणि फोटो घेत घेत आम्ही पुढे सरकलो. टॉनी ईगलचे मनसोक्त फोटो मिळाले होते त्यामुळे तेच विचार डोक्यात असताना एका जवळच्या केरूच्या झाडापलीकडून प्रचंड मोठं असं काहीतरी आकाशाकडे झेपावलं. आम्ही सगळे व्हलचर-व्हलचर असं बडबडत कॅमेरा डोळ्याला लावला. पण कुठच काय? क्लिक करेपर्यंत ते कुठच्या कुठे जाऊन पोचलं होतं. अगदी जवळचा फ्लाइंग शॉट मिस झाला. ती खंत चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत असतानाच अन्वरनी बॉंब टाकला, सरजी ये व्हलचर नही था, GIB था| आम्ही एकमेकांकडे बघतच बसलो. हाता तोंडाशी आलेला घास तसाच गेला होता. म्हणजे इतक्या जवळ आपण आलो होतो तरी तो आपल्याला दिसलाच नाही?? एवढा मोठा पक्षी आपल्या नजरेतून सुटलाच कसा? उडताना त्याच्या आकाराचा चांगलाच अंदाज आम्हाला आला होता. आता कधी त्याला जमिनीवर उभा पाहतोय असं झालं होतं. आत्ताची संधी आमच्या हातून निसटली होती. त्यामुळे मन थोडं खट्टू झालं होतं. आता ऊन चांगलंच वर आलं होतं. अंगातल्या जॅकेटमुळे आता गरम व्हायला लागलं होतं. तेवढ्यात आम्हाला आमची दुसरी गाडी दिसली आणि ब्रेकफास्टसाठी म्हणून त्यांच्याजवळ जाऊन थांबलो. तिथे गेल्यावर कळलं कि त्यांना पण GIB चा साधारण आमच्यासारखाच अनुभव आल्याचं कळलं. मग जरा इतर चर्चा करून आम्ही सगळे रिसोर्टकडे जायला निघालो. थोडक्यात काय आम्हाला अजून GIB साठी वाट बघायला लागणार होती. रेसोर्टवर फ्रेश झाल्यावर दुपारचं साधं जेवण घेतलं आणि साडेतीनच्या आसपास आम्ही परत GIB च्या शोधार्थ बाहेर पडलो. आजच्या तारखेला आमच्या नशिबात माळढोक नव्हताच बहुतेक. पण त्याच संध्याकाळी अधिवासाचा फटका बसलेला आणि माळढोक इतका नाही पण कमी प्रमाणात दिसणारा डेझर्ट फॉक्स आम्हाला दर्शन देऊन गेला. दिवस कारणी लागला होता. मग त्या रात्री जेवणाच्या वेळेला कोणाला काय काय दिसलं याचा अंदाज घेत दुसऱ्या दिवशीची आखणी करत रूममध्ये जाऊन सर्वांनी पडी टाकली.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सकाळचं सगळं आवरून आम्ही बाहेर पडलो. हवेत चांगलाच गारठा होता. आज सगळ्यांनी GIB चाच ध्यास घेतला होता. कालच्याप्रमाणे त्या कुंपणाच्या आसपास इतर पक्षी बघत जात असताना कळलं कि दुसऱ्या गाडीला GIB ची एक जोडी दिसली आहे म्हणून. आम्ही लगेच त्यादिशेनी गेलो. गाडी एका ठराविक अंतरावर जाऊन थांबली. दुर्बीण डोळ्याला लावली. समोर सकाळच्या कोवळ्या उन्हात एक जोडी मोठ्या डौलानं पदन्यास करत होती. समोरचा देखावा खरंच दृष्ट लागण्यासारखा होता. मागच्या कुंपणाच्या तारेवर आठ-दहाच्या समूहानी महालातल्या सदस्यांप्रमाणे बसलेले होले (Eurasian-collared Dove), इतर प्रजाजनाप्रमाणे इकडे तिकडे करत असलेले वेडेराघू (Green Bee-eater), सिमेंटच्या खांबावर पहारेकऱ्याच्या रुबाबात बसलेले दोन ससाणे (Laggar Falcon) आणि एखाद्या मंत्र्याच्या दिमाखात चरत असलेला चिंकारा (Indian Gazelle) हे सगळे जणूकाही या माळरानाच्या राजाला सकाळच्या न्याहरीसाठी संरक्षण द्यायलाच थांबले होते. अशा या गवताळ महालाच्या एका झाडाच्या सावलीतून राजा राणीची जोडी सोनेरी उन्हात आली आणि त्यांच्या पाठीवरची तपकिरी पिसं काहीशी चकाकली. मानेखाली असलेला काळा पट्टा एखाद्या नेकलेससारखा भासत होता. पांढरी स्वच्छ मान आणि त्यावर छोटीशी काळी मुकुटासारखी भासणारी टोपी. अतिशय सावध असणारी त्यांची चाल हि खरोखरंच माळरानाच्या राजाला शोभणारी होती. मधूनच आमच्या अस्तित्वाची जाणीव होताक्षणीच वरच्यावर थांबलेलं पाऊल आणि किंचित वाकडी मान करून आमच्या दिशेला टाकलेला कटाक्ष सारं काही भुलवण्यासारखं होतं. आमच्या गाड्या अतिशय मंद चालीनं पुढे सरकत होत्या आणि आम्ही जमेल तसा क्लिकक्लिकाट करत ते दृश्य कॅमेऱ्यात साठवत होतो. त्या दोन पक्ष्यातला एक पक्षी पुढे पुढे चालत राहिला आणि एकदम एकाच क्षणी ते दोघंही आपले अजस्त्र पंख फैलावत बघता बघता दूरवर निघून गेले. पंधरा ते वीस मिनिटं आम्ही या देखण्या राजाच्या सान्निध्यात होतो पण त्या काही मिनिटातच महाराष्ट्रानी काय गमावलंय याची पुरेपूर जाणीव झाली. इथे जरी माळढोक सुरक्षित असला तरी पुष्कळ म्हणता येईल इतक्या मोठ्या प्रमाणावर यांची संख्या इथे नक्कीच नाही. त्यामुळे या प्रजातीवर अजूनही टांगती तलवार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अजून पुढचा एक दिवस आमच्या हातात होता. पण उद्या परत GIB दिसेल याची शाश्वती कुणालाच नव्हती. गाडी कुंपणाच्या बाजुबाजुनी चालली होती. नजर सारखी त्या कुंपणापलीकडे GIB चा शोध घेत होती आणि तशातच माझ्या मनात विचार आला कि आज जसं माळढोकचं भवितव्य कठीण झालं आहे तसं याआधी अशा बऱ्याच प्रजातींचं भविष्य गंभीर होऊन त्या लुप्त झालेल्या आहेत. दुर्दैवानी आज वाघ सुद्धा याच मार्गावर आहे. जंगलात वाघ जसा कधीकधी दिसता दिसत नाही तसाच थोडाफार अनुभव आम्हाला माळढोकच्या बाबतीत पण आला. त्यामुळे माझं देवाकडे एक कळकळीचं मागणं आहे आणि ते म्हणजे कृपा करून या समस्त प्राण्यांना अविचारी मनुष्यप्राण्यापासून वाचव किंवा माणसाला तशी बुद्धी दे म्हणजे कुठल्याही घनदाट जंगलात वाघाच्या संरक्षणासाठी अशी कुंपणं लावायला लागणार नाहीत.