जिया भोरेली
जिया भोरेली:
आसाम म्हणताक्षणी डोळ्यासमोर उभी राहते विस्तीर्ण समुद्रासारखी भासणारी ब्रह्मपुत्रा. इथे फिरताना का कोण जाणे पण आपण अजस्त्र अशा भागात फिरत आहोत असं सारखं वाटत राहतं. तीन तीन देशात फैलावलेली ब्रह्मपुत्रा, तिच्या दोन्ही बाजूला पसरलेलं काझीरंगाचं घनदाट जंगल आणि त्याला साजेसे बलाढ्य गेंडे आणि जंगली हत्ती. सगळं कसं भारदस्त. अशा या भारदस्त प्रदेशात आम्ही तीन मोठ्या अभयारण्यांना भेट देण्याचं ठरवलं. त्यापैकी पहिलं होतं ते म्हणजे आसाम-अरुणाचलच्या सीमेवरचं नामेरी अभयारण्य.
ब्रह्मपुत्रेच्या तुलनेत लहान पण अतिशय नितळ अशी एक जिया भोरेली नावाची नदी ओलांडून पलीकडे जावं लागतं. इथपर्यंत पोचलं कि साम्राज्य सुरु होतं ते जंगली हत्तींचं आणि कर्कश्य ओरडणाऱ्या धनेश पक्ष्यांचं. इथे वाघ पण आहे बरका. नुसता वाघच नाही तर त्याच्या इतर दुर्मिळ जमाती पण आढळतात. ( Leopard, Black Panther, Clouded leopard, Jungle Cat, Leopard Cat ) मात्र इथे सगळा प्रवास हा पायी करावा लागतो आणि तोही सावधगिरीनं. कधी कधी वाटेत हत्ती किंवा वाघ सुद्धा येऊ शकतो पण त्यात काळजी करण्यासारखं काही नाही कारण आपल्याबरोबर जो गार्ड असतो त्याजवळ बंदूक असते. जर तसा काही प्रसंग आलाच तर क्वचित प्रसंगी त्याचा वापर करावाही लागतो. या संदर्भातली माहिती मिळवताना एक गंमत झाली. इथल्या लोकांशी बोलताना खूप लक्षपूर्वक ऐकावं लागतं. नाहीतर ते काय बोलले याचा पत्ताच लागत नाही. आमचा मिनाराम नावाचा गाईड होता. बोलता बोलता त्याला सहज विचारलं, मिनारामजी इसमें गोलीयां कितनी होती है? त्यावर मिनाराम उत्तरला, साबजी दॉस.
मी ऐकलं दो आणि म्हणालो 'अरे सिर्फ दो गोलीसे क्या होगा? और उनसे काम नही हुआ तो? मिनारामला माझा गोंधळ कळला आणि म्हणाला, ना ना साबजी दो नही.. दॉस दॉस| त्याला दस (दहा) म्हणायचं होतं. काय करणार? यांना अ ब क ड शिकवताना अॉ बॉ कॉ डॉ असं शिकवलेलं असतं. असे हलकेफुलके विनोद करत आम्ही रानात शिरलो. बोटीतून उतरल्यावर थोडंस मळभ आल्यासारखं वाटत होतं. पण हळूहळू सूर्यनारायणानी वर्दी दिलीच आणि सोनसळी किरणं अंगावर पडली. रानपाखरांचा चिवचिवाट कानावर यायला लागला. नदीपलीकडे पाऊल ठेवल्यापासून नजर झाडांचा आणि पाण्याचा अदमास घेत होती. काहीतरी नवीन बघायला मिळेल याची उत्कंठा होती. उत्कंठा तशी बऱ्याच गोष्टींची होती पण इथे ती लगेचच पूर्ण होईल कि नाही याची शाश्वती नव्हती. ती म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या बदकाची... White-winged Wood Duck. किंबहुना हे पाहण्यासाठीच आम्ही नामेरीला आलो असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याचं वैशिष्ट्य म्हणजे हि बदकं अख्ख्या भारतभरात फक्त इथेच आढळतात आणि ती सुद्धा उघड्यावर किंवा नदीत दिसत नाहीत. तर दाट जंगलामध्ये कुठल्याशा साठलेल्या पाण्याच्या डबक्यात किंवा एखाद्या नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतात आढळतात. कधी कधी एखाद्या झाडाच्या फांदीवर सुद्धा बसलेली दिसू शकतात. एकंदरीत अवघडच मानलं जातं यांचं दर्शन. रानातले इतर पक्षी बघत बघत पुढे जात असताना एकदम मिनारामनी आम्हाला थांबवलं आणि म्हणाला, साबजी अब यहांसे आगे कोई बांत नही करेगा| इधरसे काफी आगे चलने के बाद वो डॉक (Duck) दिख सकता है| वो बहोत शाई (Shy) होता है, मामुली आवाज होने पर वो भाग खडा होगा| तो थोडा संभलकर चलेंगे|
आमची दहा जणांची फटावळ मिनारामच्या मागे मांजरीच्या पावलांनी आगेकूच करत होती. बरंच अंतर चालून गेल्यावर त्यानं आम्हाला खुणेनीच थांबायला सांगितलं आणि हलकी शीळ घालत आम्हाला दिशा दाखवली. आम्ही सगळे डोळे फाडून त्यादिशेला पाहायला लागलो पण पुढं काहीच नव्हतं, म्हणजे आम्हाला दिसेना. नक्की पाहायचं आहे तरी कुठे याची दिशाच सापडेना. मिनाराम पुढे सरकला, परत एका झाडाच्या जाळीतून दाखवायला लागला पण तरी कुणाला काही दिसेना. आता मात्र शर्थ झाली. मिनारामच्या चेहेऱ्यावर थोडी नाराजी दिसली. नाराजी आम्हाला दिसत नव्हतं म्हणून नाही तर ती उडून गेली तर.. याबद्दल होती. कारण हाच तो क्षण होता. समजा तेवढ्यात त्यांना चाहूल लागली तर सगळं मुसळ केरात. फक्त उडताना दिसली असती आम्हाला. अखेरीस दबकत दबकत पुढे गेल्यावर एका सुकलेल्या आडव्या पडलेल्या झाडाच्या खोडावर ती दोन बदकं आम्हाला दिसली. त्यांच्या पंखांच्या तपकिरी रंगानी सगळा घोळ केला होता. मातकट खोडाच्या आणि खालच्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबात ती एकरूप झालेली होती. कसब वापरल्याशिवाय त्यांचे बरे फोटो काढणं शक्यच नव्हतं. त्यातल्या त्यात बरे फोटो मिळाल्यावर अचानक त्यांना कसलीतरी चाहूल लागली आणि क्षणाचाही विलंब न करता दोन्ही बदकं दूर कुठेतरी उडून गेली. ती नक्की कुठे उडून गेली याचा सहजी पत्ता लागणं शक्य नव्हतं. त्यामुळे आता परत त्यांच्या मागे लागून ती हुडकण्याचा उत्साह कुणालाच नव्हता. त्यापेक्षा अजून काही निराळं नजरेस पडतंय का याच प्रयत्नात सगळे होते. नॉर्थ-इस्टच्या कुठल्याही जंगलात फोटोग्राफी करणं हे खरंच खूप अवघड काम आहे. त्यामुळे बरीचशी लोकं गळ्यात दुर्बीण घालून पक्षीनिरीक्षण करत भटकणं पसंत करतात. 'लेकीन इतनी दूर आने के बाद एक रेकॉर्ड शॉट तो बनता हि है ना|'
सकाळी सहा ते साडे अकरा पर्यंत आमचा specie count ८४ वर गेला होता. नुसतेच पक्षी नाही तर एका झाडावर एक गेको बघत असताना एक मोठासा टस्कर (जंगली हत्ती) अगदी आमच्या समोरून गेला. एक भेकर (Barking Deer) चरत चरत रस्त्यात आडवं आलं. झाडाच्या फांदीवर इकडून तिकडे लगबग करत नाचणाऱ्या मलायन जायंट स्क्वीरल दिसल्या. एका क्षणी त्या आम्हाला पाहून थबकल्या आणि तोच वेळ आम्हाला फोटो काढायला पुरेसा ठरला. अंगावर चढवलेले जॅकेटचे थर आता हळूहळू निघायला लागले. तरी एलीफंट ट्रीच्या सावलीत उभं राहिलं कि गारवा जाणवत होता आणि मधूनच त्याच्या पूर्ण पिकलेल्या फळाचा गोड वास दरवळत होता. रानातून बाहेर पडलो आणि नदीच्या जवळ एका ठिकाणी बसून नाश्ता केला. हाताच्या तळव्यावर घेतलेले आलू के पराठे, त्यावरच वाढलेलं मिक्स आंबटढाण लोणचं आणि एक-एक उकडलेलं अंड. पराठे फार काही छान नव्हते पण लोणच्याबरोबर बरे लागत होते. या अशा वेळेला उकडलेलं अंड मला कायम आधार वाटतो. नेहमी ग्रुपमधला एकतरी मला अंड नको असं म्हणतोच आणि तेच आपल्या पथ्यावर पडतं. सगळी अंडी संपली असं कधीच होत नाही, अर्थात हा माझा अनुभव झाला. असो.. तर अशा तऱ्हेनी आमची पांढऱ्या पंखांच्या बदकाची शोधमोहीम संपली. नुसतं तेवढंच नाही तर त्याशोधात असताना न योजिलेले पण काही पक्षी दिसले, अनुभवले आणि कॅमेऱ्यात बंदिस्त पण केले. आमचा नामेरीतला हा छोटासा मुक्काम संपला होता. दुपारच्या जेवणात परातभर भात, पातळ भाजी, एखादी सब्जी, पापड आणि सहजासहजी पिळता न येणारी पण चवीला अप्रतिम असणारी मोठाली लिंबं असं पारंपारिक आसामी जेवण घेऊन आम्ही काझीरंगाच्या वाटेला लागलो.