काझीरंगा भाग २
काझीरंगा भाग २:
वेस्टर्न झोनच्या अडीच तासाच्या सफारीमध्ये काझीरंगाचं मुख्य आकर्षण म्हणजेच एकशिंगी गेंडा मनसोक्त दिसल्यामुळे त्याबद्दलची अधीरता संपुष्टात आलेली होती. तसं पाहायला गेलं तर काझीरंगाच्या कुठल्याही झोनमधे गेंडा दिसतोच पण त्याला जरा जवळून पाहिल्याशिवाय त्याच्या अजस्त्रपणाचा अंदाजच येत नाही. गेंडा पाहण्यातली खरी मजा तेव्हा कळते आणि जर गेंडा आपल्यावर धावून आला तर त्यासारखा दुसरा थरार नाही.
सकाळी सातच्या सुमारास आमची इस्टर्न झोनमधली सफारी सुरु झाली. इथे खास आकर्षण होतं ते म्हणजे थंडीच्या दिवसांत येणाऱ्या स्थलांतरित बदकांचं. रस्त्यालगतच्या मोठ्या वृक्षापासून ते झुडपांपर्यंत आणि दलदली चिखलापासून ते अगदी आतवर गेलेल्या आणि दृष्टीपथास पडणाऱ्या पाण्यापर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या हालचाली दुर्बिणीतून अगदी स्पष्ट दिसत होत्या.
उजाडून तसा तास झाला होता पण उन्हं अजून भाजत नव्हती. त्यामुळे नुकतेच ढोलीतून बाहेर आलेले पिंगळे एक डोळा बंद करून आमच्याकडे पाहात होते. तिथेच खाली पट्टकदंब (Bar-headed Goose) आपल्या भल्यामोठ्या थव्यासोबत जमिनीत चोच खुपसून पुढे पुढे चालत होते. गाडीची चाहूल लागताच त्यांच्या चोची बाहेर आल्या, आमचं निरीक्षण करून परत आपल्या कामात व्यग्र. पट्टकदंबांच्या या जथ्यात कलहंस (Greylag Goose) पण आपल्या कबिल्याबरोबर किडे-मुंग्या टिपण्यात मग्न होते. एका उन्मळून पडलेल्या झाडाच्या काळसर फांदीवर बलाकचोच धीवर (Stork-billed Kingfisher) ध्यानस्त बसला होता. याची गडद गुलाबी लांबसडक चोच पाहिली कि वाटतं कि या चोचीत भक्ष पकडल्यावर हा स्वतःच पुढे तोंडावर तर पडत नसेल ना? कॅमेऱ्याच्या आवाजांनी त्याची साधना भंग होण्याआधी आम्ही पुढे निघालो आणि सहजच माझं लक्ष एका निष्पर्ण झाडावर गेलं. त्याच्या टोकाला एक कैकर (Osprey) कुठेतरी टक लावून बसला होता. तरी रस्त्यावर थांबलेली गाडी त्यानी बरोब्बर हेरली. हळूहळू आम्ही जंगलाच्या अंतर्भागात प्रवेश करत होतो. दोहो बाजूंनी तांबट ओरडत होते. मधूनच करड्या डोक्याचा मत्स्यगरुड आपल्या धारदार आवाजात जंगल जागं करत होते. मध्यभारतातल्या जंगलांमध्ये जशा टिटव्या दिसतात तशा इथे पण होत्या. फक्त त्या टिटव्यांची जागा वेगळ्या जातीच्या टिटव्यांनी घेतली होती. इथे राखी डोक्याची टिटवी (Grey-headed Lapwing), नदी टिटवी (River Lapwing) आणि तुरेवाली टिटवी (Northern Lapwing) प्रामुख्यानी दिसतात. यामध्ये तुरेवाली टिटवी खूप भाव खाऊन जाते. एकतर डोक्यावर लांबसर तुरा असतो आणि पंखांवर हिरवा, निळा, लालसर गुलाबी अशा अनेक रंगांच्या छटा असतात. पण हि बया उन्हात नीट उभी राहिली तर.. नाहीतर लांबून फक्त हलणारा तुरा दिसतो. मोठ्या वृक्षांच्या सावलीतून आम्ही बाहेर पडत होतो. त्यामुळे गारव्याचं प्रमाण कमी होत होतं. उजवीकडचा पाण्याचा प्रदेश लख्ख उजेडात समोर येत होता. त्या पाण्यात असंख्य प्रकारचे पक्षी डुंबत होते, खात होते, पंखात चोच घालून बसले होते, काही एकाच जागी स्तब्ध उभे होते.. काही विचारू नका. मला या जागी एक दुर्बीण, कॅमेरा, एक एक्सट्रा बॅटरी पॅक आणि एक हाईड बांधून दिली ना तर सलग एक-दोन दिवस बसायची तयारी आहे माझी. हा आता सारखा चहा लागेल तो भाग वेगळा! पण तुम्हाला सांगतो ते समोरचं दृश्य बघून कॅमेऱ्यात नक्की काय टिपायचं??.. असं झालं होतं. मासे टिपणारे करकोचे टिपू का उन्हांत चकाकणारे बदकांचे रंग टिपू, पाण्यावर समांतर उडत घिरट्या घालणारे गरुड (Pallas's fish eagle & Grey-headed fish eagle) टिपू का पंख पसरून बसलेले तिरंदाज (Oriental Darter) टिपू? पक्षी जमातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझी हि वाक्य जशीच्या तशी पटतील. बरं थोड्या वेळासाठी पक्ष्यांकडे दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी प्राण्यांमध्ये विविधता होतीच की. काझीरंगा मधे एकंदर साठ प्रकारचे सस्तन प्राणी (Mammals) आढळतात. काहींची नावं पण आपल्याला माहित नसतील. आता समोर दिसत असलेले प्राणी बघायचे झाले तर गेंडे तर अविश्रांत चरतचं होते. अशा पृष्ठभागावर जिथे आपण साधं उभंपण राहू शकणार नाही तिथे हे गेंडे चिकटून बसल्यासारखे दिसत होते. अंगभर चिखल.. उन्हांत येऊन उभं राहिलं कि अंगावरच्या चिखलाचे पोपडे पडायचे. या पाणथळीमधे जंगली हत्ती सुद्धा आपल्या कुटुंबकबिल्यासह चिखलात यथेच्छ डुंबत होते. काही मड-बाथ घेत होते. या सगळ्या गलक्यात पाड्यांचा एक समूह (Hog Deer) त्यातल्या त्यात कोरडी जागा बघून रवंथ करत बसला होता. एखादं दुसरं सांबर दिसत होतं. दलदली बारासिंघा आपल्या नवीन आलेल्या मखमली शिंगांना घासत होते. मधूनच आडदांडासारख्या वाढलेल्या जंगली म्हशी आपली न संपणारी शिंग घेऊन एकमेकींना ढुशा देत होत्या. रानडुकरं आपल्या पोरा-टोरांना घेऊन तुंबलेल्या पाण्याच्या दिशेनं जात होती. इथल्या रानडुकरांचं आकारमान आपल्या कडच्या डुकरांपेक्षा मोठं वाटलं. एखादा मुंगुस आपलं लक्ष नसताना उगीच रस्ता ओलांडून जात होता. पाणवठ्याच्या कडेला काही हुदाळे (Smooth Coated Otters) खूप अस्वस्थ दिसत होते. या प्राण्याला मी कायम घाईतच बघितलं आहे. पाण्यात जायचं.. खाली बुडी मारायची आणि तोंडात मासा पकडून परत वर यायचं. हा नित्याचा उद्योग. हुदाळे पाण्यात गेले कि कॅमेरा डोळ्याला लावून तयारीत राहायचं. क्लिक करायची वेळ आली कि ते हमखास पाण्यात बुडी मारतात आणि आपल्याला 'डुबुक' झाल्याचा फोटो मिळतो. हे ठरलेलं आहे. स्वस्थ बसलेला हुदाळा मला अजून बघायचाय. पण यावेळेस पाण्याबाहेर मी त्याला बराच वेळ बघितलं. दुर्बीण लावून बघितल्यावर कळलं कि तिथे काठावर त्यांची पिल्लं आहेत म्हणून. हे एकदम खासंच झालं. बास झाले प्राणी.. आता झाडावर काही आहे का असं बघायला वर पाहिलं तर दोन वेगळ्या प्रकारच्या खारी दिसल्या. तिथेही मॅमल्स. एक होती Hoary-bellied Squirrel आणि दुसरी होती Malayan Giant Squirrel. अर्थात या दोन्ही एकाच वेळेस दिसल्या नाहीत. या उगीचंच पाठीमागे आग लागल्यासारख्या पळत होत्या. पण फोटो मात्र काढता आले.
कूर्मगतीनी जिप्सी पळवत आम्ही पाणथळीपासून दूर होत होत कधी दाट रानात पोचलो ते कळलंच नाही. इतका वेळ दूरून दिसणारे पाडे जवळ येत होते. त्यांचे क्लोजअप काढत असताना अचानक एक अवाढव्य गेंडा झुडपातून बाहेर आला. आम्ही जिप्सी थांबवली. कदाचित तो रस्ता ओलांडून गेलाही असता. पण याचे तेवर काही वेगळेच दिसले. तो बऱ्यापैकी पुढे येऊन आमच्याकडे रोखून बघायला लागला. तेवढ्यात मागून एक जिप्सी आली. माझ्या अंदाजानी तो आमच्या मागून जाणार असावा.. पण अचानक मागून जिप्सी आल्यामुळे त्याला त्याचा मार्ग रोखला असल्यासारखं वाटलं असावं. तो कमालीचा अस्वस्थ झाला. आमची जिप्सी बंद होती. मला मागच्या घटनेची आठवण झाली. बघता बघता त्या गेंड्याची मान ढुशी मारत पुढे धावून येण्याची चिन्हं दिसली आणि ते धूड हा हा म्हणता वेग धरणार तेवढ्यात बिक्रमनी गाडी सुरु केली आणि तिथून पसार झालो.
एव्हाना मध्यान्नीचा सूर्याचा लालबुंद गोळा आता गवताच्या पात्यावर समांतर दिसायला लागला होता. दिवस कलायला सुरवात झाली होती. होले आणि पोपटांचे थवे आपल्या विश्रामाच्या जागी परतायला लागले होते. पिंगळ्यांचे चित्कार कानावर यायला लागले होते. थोडक्यात काय तर काझीरंगाला निरोप द्यायची वेळ आली होती. आजचा इथला शेवटचा दिवस होता. संध्याकाळी गुवाहाटीला जायला निघायचं होतं. जिप्सी परतीच्या मार्गाला लागली होती पण मन तिथंच पाणथळीतल्या काल्पनिक हाईडमधे रमलं होतं.
क्रमशः