मानसच्या वाटेवर:

मानसच्या वाटेवर:
गुवाहाटी रेल्वे स्टेशन. अगदी बेताचा गारवा. नामेरी-काझीरंगाच्या नीरव शांततेतून शहरात आल्यावर कमालीचा कलकलाट जाणवायला लागला होता. हॉटेल मधून स्टेशनकडे जात असताना शिलॉंग शिलॉंग करत काही टॅक्सीवाले उगीच गलका करत होते. पण तिकडे फारसं लक्ष न देता आम्ही प्लॅटफाॅर्मच्या दिशेनी चालायला लागलो. सकाळी चहा आणि टोस्ट बटर असं खाल्लं होतं पण ते पोटभरीचं नव्हतं. अगदीच काही नाही तर निदान बिस्किट्स तरी असावीत म्हणून प्लॅटफाॅर्मवरच्याच एका दुकानात बॉरबॉनची बिस्कीट मागितली आणि परत गप्पांत रंगलो. हा अजून का बिस्कीट देत नाही म्हणून मागे पाहिलं तर तो मनुष्य हातात दोन बन घेऊन हजर. आम्ही त्याच्या चेहेऱ्याकडे बघतच बसलो पण तो मख्ख. आम्ही विचारलं, ये क्या लाए हो आप? तर तो तोंडात शब्द घोळवत म्हणाला, साब आपनेही तो बॉन मांगा था ना? वो ले आया| आम्ही कपाळावर हात मारला. आमचंच चुकलं होतं. ब च्या जागी बॉ आम्हीच बोललो होतो बॉरबॉन म्हणण्यासाठी. त्यामुळे आम्ही आमची चूक सुधारली आणि दोन पुडे घेऊन नुकत्याच आलेल्या ट्रेन मधे चढलो.
सकाळी ७:४० ची गुवाहाटीहून निघणारी ट्रेन पुढे २ तासांनी बारपेटा रोडला पोचणार होती. आमचा शेवटचा टप्पा होता भारत-भूतान सीमेवरचं मानस अभयारण्य. मधोमध वाहणारी मानस नदी भारत आणि भूतान मधलं अभयारण्य दुभागत होती. नदीपलीकडच्या राॅयल मानस नॅशनल पार्कमधे आपल्यापेक्षा काही निराळ्या पक्षीप्रजाती पण दिसतात. इथे येण्यापूर्वी केलेलं वाचन किंवा प्रजातींचा केलेल्या अभ्यासाचा विषय परत एकदा ट्रेनमधे सुरु झाला. वाटेत लागलेला ब्रम्ह्पुत्रेचा पूल, मधूनच दिसणारी पाणथळ जागा, तिथे दाटीनं दिसलेली बदकं, धावत्या ट्रेनमधून जसे जमतील तसे काढलेले फोटो  आणि मग त्यांचे केलेले आयडी (नावं) या भानगडीत बारपेटा रोड कधी आलं ते कळलंच नाही. आमचा ड्रायव्हर सैफुल वेळेआधीच येऊन थांबला होता. इथून मानस फक्त २२ किलोमीटर होतं पण रस्त्याच्या दुर्दशेमुळे आम्हाला पोचायला दीड तास लागला. सगळ्यांना कडकडून भूक लागली होती. त्यामुळे गेट जवळच्या दोन असामी भगिनींकडून चालवण्यात येणाऱ्या एका लहानशा हॉटेलात शिरलो. आधी फक्त चहा मागवला. पण मग आतून फोडणीचे असे काही सुवास यायला लागले कि लगेच आम्ही एक थाळी मागवली. तिथे फिश सुद्धा मिळत होता पण मी शाकाहारी थाळी पसंत केलं. थाळी तयारच होती. बटाट्याची भाजी, पाऊण ताट भरून भात, अनलिमिटेड दाल, तळलेले वांग्याचे काप आणि भलामोठा पापड. तातडीनं अजून एक थाळी मागवली. तोंडी लावायला एक अॉम्लेट.. काय पाहिजे अजून. सडकून भात खाल्ला सगळ्यांनी. त्याचं माफक बील देऊन आम्ही 'गियातीगाव' मधल्या रमानाथ राय नावाच्या माणसाच्या 'राय होम स्टे' मधे येऊन पोचलो.
इथवर येईपर्यंत माझ्या डोळ्यावर जर पट्टी बांधली असती तर मला मुरुड किंवा दापोली अशा कुठल्यातरी ठिकाणी आणून सोडलं आहे असंच वाटलं असतं. हुबेहूब आपल्या कोकणात असतात असे लहानसे बोळ. दोन्ही बाजूला माड, सुपारी आणि केळीच्या बागा. तशीच छोटेखानी बैठी घरं. लोकांची वेशभूषा काय ती मात्र वेगळी. सुमोतून सामान उतरवलं तोच समोर स्वतः रमानाथ राय दोन्ही हात जोडून आमच्या स्वागताला उभे. आधी असामी भाषेत आणि मग लक्षात आल्यावर हिंदीत बोलायला सुरवात केली. दक्षिण भारतासारखी भाषेची अडचण पूर्वोत्तर भारतात कुठेही आली नाही. बोलल्यावर कळलं कि स्वतः राय फॉरेस्ट गार्ड होते. निवृत्तीनंतर आता शेती-वाडी सांभाळतात आणि त्यांची दोन मुलं जंगलात जिप्सी चालवतात. थोडक्यात आम्ही योग्य ठिकाणी आलो होतो. रूमचा ताबा घेतला आणि सगळी गॅझेट्स घेऊन मानसमधल्या पहिल्या वहिल्या सफारीला तयार झालो.
इथे सकाळी सात वाजता मेन गेट जे उघडतं ते दुपारी साडे तीन-चार पर्यंत उघड असतं. या दरम्यान तुम्ही कधीही आत जाऊ शकता अर्थात परमिट घेऊन. मेन गेट मधून आत गेलं कि सरळसोट २० किलोमीटरचा जंगलातला रस्ता जो लागतो तो तुम्हाला थेट भूतान मधे नेऊन सोडतो. असं सरळ जात राहिलं कि समोर आडवी मानस नदी दिसली कि समजायचं भारताची हद्द संपली. या २० किलोमीटरच्या रस्त्यात अधेमधे जे बोळ लागतात ते तुम्हाला जंगलाच्या अंतर्भागात घेऊन जातात. इथे येण्याचं खरं कारण म्हणजे मानसमधल्या माळरानात आढळणारा तणमोर ( Bengal Florican) नावाचा पक्षी. झपाट्यानं कमी होणाऱ्या माळरानामुळे जशी माळढोकची अवस्था झाली आहे, अगदी तशीच स्थिती तणमोरांची पण झाली आहे. महाराष्ट्रातही हा तणमोर काही ठिकाणी दिसतो पण तो वेगळा आणि हा वेगळा. महाराष्ट्रात जो दिसतो तो Lesser Florican आणि पूर्वोत्तर भारतात जो दिसतो तो Bengal Florican. महाराष्टातला तणमोर हा तुलनेनी इथल्यापेक्षा लहान आहे. सध्या हा पक्षी Globally threatened या प्रकारात मोडतो. त्यामुळे काहीही करून आम्हाला याचे दर्शन घडवून आणायचेच होते आणि गोष्टी त्याप्रमाणे छान जुळून पण आल्या. आमची आत्ता ज्या झोनमधे फिरत होतो तो बन्सबरी झोन होता आणि तणमोरासाठी आम्हाला भुयानपारा या झोनमध्ये जावं लागणार होतं. चौकशीअंती कळलं कि हे ठिकाण आमच्या निवासाच्या ठिकाणापासून खूप दूर आहे. त्यासाठी भल्या पहाटे म्हणजेच चारच्या सुमारास इथून निघावं लागेल. तिथल्या गेटपाशी पोचायला साधारण दीड-दोन तास आणि मग त्यापुढे तिथली सफारी. Bengal Florican च्या बरोबरीनं अजून बरंच काही बघण्याची संधी आम्हाला होती. त्यामुळे रात्रीचं जेवण झटपट उरकून आम्ही झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सव्वा चारच्या सुमारास आम्ही सगळे त्या गारठ्यात जिप्सीत जाऊन बसलो. देबू नावाच्या आमच्या ड्रायव्हरनी जिप्सीला हूड लावून आणलं होतं त्यामुळे टाररोडवरून जाताना जरा कमी गार वारा लागला असता. देबू सोडून प्रत्येकजण डुलक्या देत होता. जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही भुयानपारा झोनला पोचलो होतो. इथे चहा वगैरे मिळायची काही सोयच नव्हती त्यामुळे झटपट एन्ट्री करून आम्ही फ्लोरीकनच्या शोधार्थ निघालो. गाईडच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही अतिशय योग्य वेळेत आलेलो होतो, त्यामुळे कदाचित फ्लोरीकन रस्ता क्रॉस करताना सुद्धा आपल्याला दिसू शकतो. मी आपला मनात म्हणत होतो, नको रे बाबा फार अपेक्षा वाढवून ठेवुस. जे नशिबात असेल ते होईल. पण ती सकाळ आमच्यासाठी काही वेगळीच होती. फ्लोरीकनच्या दिशेनी जाता जाता वाटेत पिपिट, फोर्कटेल, बझर्ड, पॅरटबिल असे पक्षी बघत होतो. एक शिळ घालून एका वळणावर गाईडनी थांबायला सांगितलं आणि गाडी त्यादिशेला वळवायला लावली. डोळ्याला दुर्बीण लावत तो म्हणाला, सरजी सीट पर खडे रहिये, वो देखो दो फ्लोरीकन चल रहे है| एका तासाच्या आत दोन फ्लोरीकन नजरेला पडले होते. आमचा विश्वासचं बसेना यावर. सगळेजण कॅमेरा सरसावून त्यादिशेला बघायला लागले. अर्धवट जळलेल्या गवतातून दोन फ्लोरीकन डौलात चालत होते. दोन्ही नर पक्षी होते. चालता चालता ते मधूनच पूर्ण दिसायचे तर कधी परत गवतात गडप व्हायचे. आम्ही दुरून त्यांना न्याहाळत होतो. आसपास कुठेतरी मादी असावी कारण काहीच वेळात त्यांची आपापसात जुंपली. दोघंही एकमेकांवर चालून येत होते. एकप्रकारचा डीसप्ले दाखवत होते. त्यांची जुंपलेली असताना मागून अजून एक फ्लोरीकन आला. मग ते तिघंही आमच्या विरुद्ध दिशेनी चालायला लागले. अचानक त्या गवताच्या वरून एक कवड्या भोवत्या (Pied Harrier) उडत आला. लगेच या तिघांत चुळबुळ सुरु झाली. त्यातल्या एका फ्लोरीकननी हवेत झेप घेतली आणि ते दूरवर कुठेतरी जाऊन बसलं. शिकारी पक्ष्याचा धोका टळला असं जाणवताच ते उडालेले फ्लोरीकन परत या दोघांपाशी आलं. आम्ही आपले या ना त्या मार्गांनी फोटो कसे काढता येतील याचा प्रयत्न करत होतो. त्यांना आमची चाहूल लागली होती नक्कीच त्यामुळे ते बाहेर यायला काही तयार नव्हते. आम्ही त्या भागात चक्कर मारत असताना अजून तीन फ्लोरीकन बाहेर आले. असे एकूण तब्बल सहा फ्लोरीकन आमच्या नशिबात होते पण एकत्र सहा जणांचा फोटो काही मिळाला नाही. मग त्यांचा नाद सोडून आम्ही इतर भागात हिंडत राहिलो. नंतर बराच काळ त्याभागात फिरलो. एका वॉच टॉवर वर जाऊन नाश्ता केला आणि नंतर भूतानच्या मानस भागात संध्याकाळ होईस्तोवर फिरलो. दुपारी साडेतीन नंतर उन्हं ओसरायला सुरवात झाली. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. साधारण पाचच्या सुमारास अंधार पडायला लागल्यावर जंगलामधे काही ठराविक ठिकाणी आग लावलेली आम्हाला दिसली. पण ती controlled fire होती. अर्धवट पसरलेला अंधार आणि त्यात प्रखरपणे दिसणाऱ्या ज्वाळा हे दृश्य खरंच अवर्णनीय होतं. तिथे थांबून फोटो काढत होतो पण तिथल्या काही चौकीदारांनी फार वेळ न थांबण्याचा सल्ला आम्हाला दिला. जमतील तेवढे फोटो काढून आम्ही बाहेरच्या मार्गाला लागलो ते लवकरात लवकर परत येण्याचा निश्चय करूनच.

समाप्त
Powered by Blogger.